ढिंग टांग : आइए मेहेरबां, बैठिये जानेजां...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : आइए मेहेरबां, बैठिये जानेजां...!

ढिंग टांग : आइए मेहेरबां, बैठिये जानेजां...!

कालपुरुषाने कूस वळवली, आणि किंचित डोळे उघडले. त्याच्या समोरुन दोन मैना डावीकडून उजवीकडे उडाल्या. त्याने आणखी डोळे उघडले. एक गोमाता आपल्या कालवडीस दूध पाजीत होती. कालपुरुषाने टक्क डोळे उघडले. बारा गवळणी माथ्यावर हंडेकळश्या घेऊन समोरुन चालत गेल्या. कालपुरुष हरखला! एकदम तीन-तीन शास्त्रोक्त शुभशकुन घडले!! आज काय शुभंकर घडणार आहे? सटवाई काय लिहून ठेविले आहेस, माझ्या महाराष्ट्राच्या भाळी, अं?

कालपुरुष निरखून पाहू लागला. त्याची सर्वव्यापी दृष्टी मलबार टेकडीवरील ‘वर्षा’ बंगल्यावर पडली. (खुलासा : कालपुरुषाकडे ड्रोन टाइप एक यंत्र असते. तो वरुन सगळे काही पाहू शकतो.) तिथे लगबग होती. गाड्यांचा ताफा सज्ज होत होता. अचानक शिट्ट्या फुंकल्या गेल्या. साक्षात मास्कधारी सीएमसाहेब प्रकटले. इकडे तिकडे न बघता सरळ गाडीत बसले, आणि निघालेच...आँ? हे काय आक्रित?

सीएमसाहेबांनी गाडीत मॅप लावला होता. मंत्रालयाचा आड्रेस टाकला होता. गुगलबाईने सांगितल्या रस्त्यावरुन गाडी अचून मंत्रालयाशी आली.

‘अरे, इथं कुठे आलो? मंत्रालयात जायचंय आपल्याला!,’ सीएमसाहेबांनी चालकाला दरडावले.

‘मंत्रालयच आलं, साहेब!,’ चालक हादरला!

‘होक्का? बराच बदल झालेला दिसतोय! मागल्या वेळेला आलो होतो, तेव्हा जरा परिसर वेगळा होता. बरीच डेवलपमेंट झालेली दिसते...,’ सीएमसाहेब इकडेतिकडे पाहात म्हणाले. ही इमारत मंत्रालयासारखी दिसते खरी, हीच असणार! समोर पोलिस दिसताहेत.

मंत्रालयाच्या गेटशी गाडी थांबली. पोलिसाने ‘कुठे जायचंय?’ असे तंबाकुयुक्त मौनाने विचारले.

‘सहावा मजला!’ सीएमसाहेबांनी काच खाली करुन उत्तर दिले. (खुलासा : मास्क खाली केला नाही. ते तुमच्यासारखे बेजबाबदार नाहीत!) पोलिस शिपाई चमकला.

‘आस्सं का? तिथं कुटं काय आहे?,’ पो. शि.

‘मीच आहे स..स..सीएम...साहेब!’ साहेब.

‘है शाब्बास! साहेब का? व्वा! निघा घराकडं!,’ पो. शि. हसून म्हणाला. मास्कमुळे घोटाळा झाला होता. पण तरीही, साहेबांनी तिथल्या तिथे त्या शिपायाला काढून टाकण्याचे ठरवले. बऱ्याच झकाझकीनंतर गाडी आत सोडण्यात आली. लिफ्टमधल्या कर्मचाऱ्यानं सवयीनं पाचव्या मजल्याचे बटण दाबले. तेव्हा साहेब म्हणाले, ‘सहावा...सहावाच बहुतेक!’

त्यांनाही खात्री नव्हती. मागल्या खेपेला आलो होतो, तेव्हा कुठल्या मजल्यावर उतरलो, हे आता कसे आठवणार?

‘‘सहावा माळा? हाय काय थितं? म्येलेलं झुरळ बी न्हाई,’ लिफ्टमन म्हणाला. साहेब गोरेमोरे झालेले त्याला दिसले नाही. (मास्क होता, मास्क! कितीवेळा आठवण करुन द्यायची?) मजल दरमजल करीत साहेब सहाव्या मजल्यावर पोचले.

सहाव्या मजल्यावर गडबड उडाली. तिथे बसलेल्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी विचारले, ‘काय म्हंटे तब्येत?’ तो कर्मचारी च्याट पडला.

‘आमच्या तब्बेतीला काय धाड भरलीये? सीएमच्या दालनातले दिवे तपासून घ्या आधी! वाइरिंग वगैरे चेक करा! आज-उद्या सीएम येणार अशा अफवा उठल्यात! कोणीही येत नाही इथं? पण कोण घेईल रिस्क? उगीच आमच्या डोक्याला त्रास...’ कर्मचारी अंगावर ओरडला. या माऱ्याने साहेब आक्रसून गेले. हे काय भलतंच? पण कुटुंबप्रमुखाने रागावून चालत नाही. शेवटी काहीही झालं तरी महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यांवर आहे...

मंत्रालयात सहाव्या मजल्यावरचे वायरिंग नीट चेक करुन इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा माणूस येऊन गेला, अशी नोंद कर्मचाऱ्याने दैनंदिन बुकात केली, आणि अशा रीतीने माननीय साहेबांचा सुप्रसिद्ध ‘मंत्रालय दौरा’ सुफळ संपन्न जाहला.

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 16th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top