ढिंग टांग : आरारारा… एक ‘नाटू’स्तुती ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

जमेल तितकी कलेची सेवा करावी, आणि या कानाचे त्या कानाला कळो देता कामा नये, या इदम् न मम वृत्तीने आम्ही कालक्रमणा करीत आलो आहो!

ढिंग टांग : आरारारा… एक ‘नाटू’स्तुती !

जमेल तितकी कलेची सेवा करावी, आणि या कानाचे त्या कानाला कळो देता कामा नये, या इदम् न मम वृत्तीने आम्ही कालक्रमणा करीत आलो आहो! कुणासाठी काही केले तर त्याचा उच्चार करो नये, केलेले दान विसरोन जावे, हे तर आमच्या अंगवळणी पडले आहे. ‘मेहनत कर दरिया में डाल’ असे कुणीतरी म्हटलेच आहे. माणसाने निरपेक्ष भावनेने कष्ट करावेत, आणि जमेल तितकी जनसेवा करावी, हे आम्ही आमचे परमगुरुंकडून शिकलो. नमो नम: नमो नम: नमो नम:

आमचे परमगुरु श्रीश्री नमोजी यांना काय अशक्य आहे? ते जे काही करतात, त्याला मास्टरस्ट्रोक असेच म्हटले जाते. कारण त्यांची प्रत्येक कृति ही अमोघ असते. तथापि, त्यांच्या या अफाट कर्तृत्त्वावर अनेक लोक जळ जळ जळतात, याचे आम्हाला दु:ख होते. एसेस राजमौली नामक एका दाक्षिणात्य निर्माता दिग्दर्शकाने मध्यंतरी ’आरआरआर’ अशा अगम्य नावाचा चित्रपट निर्माण केला होता. त्या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे तितकेच अगम्य आणि भावमधुर गीत जगभर गाजले. बघावे तिकडे ‘नाटू नाटू’ झाले! हे गीत इतके गाजले, इतके गाजले की, त्यास ऑस्करची बाहुली देऊन सन्मानित करावे लागले. काही इलाजच नव्हता.

दोन दाढीधारी तजेलदार युवकांचा तो मदमस्त पदन्यास, विजेच्या भारलेले ते नृत्यमग्न चार पाय! (खुलासा : दोन तजेलदार युवकांचे प्रत्येकी दोन पाय धरावेत…आय मीन जमेस धरावेत!! असो. ) तो दिलचस्प ठेका, आणि स्वरकल्लोळातही रंगांची उधळ करणारा तो वाद्यमेळ…अहाहाहा!! ते ‘नाटु’गीत बघितल्या (व ऐकल्या) नंतर आम्ही आमचे राहिलोच नाही. जमिनीवर पाय ठरत नव्हता! एका हुशार बेकरीवाल्याने तेवढ्यात आमच्याकडून पावाची कणीक तिंबून घेतल्याचे नंतर क़ळले! पुन्हा असो.

‘आरआरआर’ चित्रपटातील गाण्याला ऑस्कर बहुमान मिळाल्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र ‘नाटू नाटू’ झाले!! परंतु, याचे श्रेय कोणाला द्यायचे, याची कल्पना कुणाला तरी आहे काय? ‘आरआरआर’ या शीर्षकाचा फुलफॉर्म तरी कोणाला माहीत आहे काय? नाही, नाही, नाही!! ‘आरआरआर’ हा चित्रपट जुलमी ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा पुकारणाऱ्या दोघा क्रांतिकारकांच्या कामगिरीवर आधारित आहे, असे सांगितले जाते. परंतु, मूळ चित्रपटकथा गुजराथी होती व तिचे पूर्ण नाव ‘रमकडा रमता राजा’ (पक्षी : खेळण्याशी खेळे राजा) असे होते, हे कोणाला ठाऊक आहे? एवढेच नव्हे तर ‘नाटू नाटू’ हे द्वंद्वगीत मुळात श्रीश्रीनमोजी आणि त्यांचे पट्टशिष्य मा. मोटाभाई यांच्यावरच चित्रित होणार होते. (पहा : ‘नाटू’गीतातील दोन दाढीधारी तजेलदार युवक! ) त्यातील दिलखेचक पदन्यास या निष्णात नर्तकांनीच ठरवला होता, हेदेखील कुणास माहीत नसावे! सांप्रतकाळी भारतीय राजकारणात उत्तम पदलालित्याबाबत या दोघांचा हात कोणीही धरणार नाही, (पण पाय धरतील!) हे कोणीही मान्य करील!

याउप्पर सदरील ‘नाटू’गीतास ‘ऑस्कर आपो’ असा फोन खुद्द श्रीश्रीनमोजी यांनी थेट अमेरिकी मित्र ज्योभाई बायडेन यांना केला होता, त्यात ‘नाटो’ची स्तुती असल्याचे वाटून बायडेन यांनी ऑस्करचा आदेश काढला, ही खुफिया माहिती आम्हाला सीआयएनेच दिली! आता सांगा, ऑस्करचे श्रेय कुणाचे?

पण काही जळ जळ जळणाऱ्यांनी भर सभागृहात ‘कमळवाल्यांनो, आता तरी याचे श्रेय घेऊ नका’ असे सांगून सर्व यशोगाथेला नाटू की हो लावला. (नाटु : नाट, नर्पती…) हे योग्य झाले नाही. ही लोकशाही नव्हे! पण कुणीतरी म्हटलेच आहे, मेहनत कर, दर्या में डाल!!