
आदरणीय दादासाहेब, सा. न. सध्या मध्यावधी निवडणुकांबद्दल ऐकू येऊ लागले आहे. हे काय मध्येच उपटले? महाराष्ट्रात वातावरण अगदीच बिघडले आहे.
ढिंग टांग : लाख दुखों की एक दवा..!
आदरणीय दादासाहेब, सा. न. सध्या मध्यावधी निवडणुकांबद्दल ऐकू येऊ लागले आहे. हे काय मध्येच उपटले? महाराष्ट्रात वातावरण अगदीच बिघडले आहे. मी कालच ठाण्याला जाऊन आलो. तिथले वातावरण तर फारच बिघडले आहे. लोक मिसळ खाताना दिसले! असो.
सत्ता गेल्यानंतर आता अडीच वर्षे मस्त आराम करायचा, असे ठरवले होते. पण अचानक ही मध्यावधीची आवई उठली! त्यासंदर्भात निश्चित काही कळल्यास मलाही कळवावे. असल्या गोष्टी आपल्या पक्षात मला सर्वात शेवटून कळतात, असा माझा अनुभव आहे. पण माझी त्याबद्दल तक्रार नाही. मध्यावधी निवडणुका लागल्या तर, थोडीफार हालचाल करावीच लागेल. (म्हणून) कळावे. आपला. जयंत्राव.
ता. क. : मध्यावधीची मागणी आपणच करायची का? राष्ट्रपती राजवटीची केलीच आहे. कळावे. ज. पा.
मा. जयंत्राव, माझ्या कानावर तर काहीही आलेले नाही. मी परदेशात होतो. ते राऊतसाहेब ‘बाहेर’ आल्यानंतर काहीही सांगत सुटले आहेत. त्यांना ही बातमी कुठे लागली? मध्यावधी वगैरे काहीही होणार नाही. तुम्ही आराम करा, मीही करतो.
कळावे. दादासाहेब बारामतीकर.
मा. नानासाहेब (पटोलेजी) मध्यावधी निवडणुकांच्या हालचाली दिल्लीत सुरु असल्याचं समजलं. आपण काय करायचं आहे? कळावे. बाळासाहेब जोरात.
मा. बाळासाहेब, जय हिंद. मी ‘भारत जोडो’ यात्रेत आहे. आज माझ्याकडे बघून आदरणीय राहुलजी किंचित हसले!! कळावे. नानासाहेब प.
माझ्या तमाऽऽम हिंदू भगिनीन्नो, बांधवान्नो, आणि मातान्नो, जय महाराष्ट्र. सध्या घशाला आराम देतोय. म्हणून बोलत नाही. जानेवारीत निवडणुका लागतील, मग भोंगे वाजवायचेच आहेत. तोवर कामाला लागा. जमत नसेल तर सोडा! सोडणार नसाल तर मी बघीनच ! साहेब.
मा. नानासाहेब यांसी शतप्रतिशत जय महाराष्ट्र. पत्र लिहिण्यास कारण की राज्यात सारे काही सुरळीत चालू असताना आणि आपले सरकार सक्षमपणे कारभार करत असताना अचानक मध्यावधी निवडणुकांची भाकिते येऊ लागली आहेत. काळजी वाटली! शिवसेना (उ. बा. ठा.) नावाच्या एका किरकोळ पक्षाच्या नेत्याने (त्याचे नाव ‘र’ पासून सुरु होते व सदर नेता गुवाहाटीच्या गँगमध्ये नव्हता!) मध्यावधी निवडणुकीची तयारी दिल्लीत सुरुदेखील झाली असल्याचे परवा म्हटले. खरे आहे का? तसे असेल तर मला पंधरा दिवस आधी तरी कळवावे ही विनंती. आपल्या सूचनेनुसार मी रोज अठरा तास काम करत होतो, आता साडेबावीस तास काम करतो. मध्यावधीबाबत दिल्लीत हालचाली झाल्या तर त्या मला आपोआप कळतीलच. कारण त्या हालचालींसाठी तुम्ही पुन्हा वेषांतर करुन रात्री-अपरात्री जाणार. (आणि मी जागाच असल्याने ते मला कळणार!) त्यामुळे फार काळजी करत नाही.
आपला विनीत. कर्मवीर. (बा. शि.)
माननीय कर्मवीर, शतप्रतिशत प्रणाम. काहीही चिंता करु नका, मी परत आलो आहे! मध्यावधी निवडणुका आपण ठरवू तेव्हा होतील, हे उघड आहे. म्हणजेच, तुमच्यातच पुन्हा कुणी ‘सुपर कर्मवीर’ निघाला तरच ते शक्य आहे. सगळे ठीक चालू आहे. दिल्लीत काहीही हालचाली नाहीत. वेळ आली की बोलूच. आपला. नानासाहेब फ.
ता. क. : मध्यावधी निवडणुका ही ‘लाख दुखों की एक दवा’ आहे. अगदीच वेळ पडली तरच हे औषध घ्यावे!! असो.