ढिंग टांग : फुटाळ्याची भेळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे कंकण मनगटी बांधोन विदर्भभूमीकडे निघालेले राजे मजल दरमजल करत नागपुरी पोहोचले.

ढिंग टांग : फुटाळ्याची भेळ!

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे कंकण मनगटी बांधोन विदर्भभूमीकडे निघालेले राजे मजल दरमजल करत नागपुरी पोहोचले. वेशीवरोन सांडणीस्वार त्वरेने रवाना जाहला, त्याणे महालावरील गडकऱ्यांसी सांगावा दिधला : ‘रा. रा. कमळनिवासी सडकसम्राट मा. गडकरीसाहेब यांसी कृतानेक नमस्कार. ठरल्याप्रमाणे किल्ले नागपुरी पावलों आहों. भेटींचे ठिकाण व समय कळवावा. आपण दोघेही भव्यदिव्य स्वप्ने पाहणारी भव्यदिव्य मनुष्यें...आमचे दिव्य तुमच्या भव्यास भिडण्याचा योग केव्हा येणार? कृपया कळावे. आपला.

साहेब. (शिवाजी पार्क.)’

किल्लेदार गडकरींनी हातातला खलिता फडकवत म्हटले : ‘अबे, काह्यचं भव्यदिव्य घेऊन बसले? सांजेला फुटाळ्याले या म्हणा! दाखवतो भव्यदिव्य...आमच्या फुटाळ्याच्या चौपाटीची पावभाजी खाऊन तं बघा!! जुहू-गिहू विसरुन जाल!!,’ गडकरीसाहेबांच्या मोकळ्याढाकळ्या वऱ्हाडी स्वागतसंदेशाने बिचारा दादरचा सांडणीस्वार गोंधळला. तोंडी निरोप घेऊन वापस चाल्ला गेला...

सांगाव्यानुसार, गोरजमुहूर्तावर राजेसाहेबांनी फुटाळा गांठले. पाहतात तो भीषण गर्दी. दिल खुश जाहला. ते म्हणाले, ‘अंबलदार अविराज, आमच्या दर्शनासाठी जनलोक तिष्ठताती. त्यांस मुखदर्शन द्यावे, ऐसे मनीं आहे. कार्यवाही व्हावी!’

अंबलदार अविराजांस काय बोलावे हे कळेना. तरीही मनाचा हिय्या करोन ते म्हणाले की, ‘साहेब, ही गर्दी आपल्यासाठी नसोन फुटाळ्याचा कारंजा पाहण्यासाठी जमली आहे. आपण स्थानापन्न व्हावे, ही विनंती!’

थोडक्या वेळात साक्षात किल्लेदार गडकरीजी गडबडगुंडा करीत आले. ‘सुरु करुंद्या बरं ती बच्चनसाहेबांवाली टेप! रेहमानचं संगीत वाजवा, पाहू बरं, तुमचा कारंजा!,’ आल्या आल्या त्यांनी आज्ञा सोडली. जनलोकांनी टाळ्या वाजविल्या. कारंजा सुरु जाहला.

...अंधाऱ्या आभाळाच्या पार्श्चभूमीवर जलधारांचे नर्तन सुरु जाहले. रंगीत दिव्यांच्या झोतांनी त्यांस नवनवे वस्त्रपरिधान चढविले. सुरेल वाद्यमेळ आणि मेलडीच्या सुरांवर पाण्याचे फव्वारे विविध मुद्रा धारण करो लागले. मागल्या बाजूने (पक्षी : पार्श्वनिवेदन!) बच्चनसाहेबांचा आवाज घुमत होता. ते नजारा पाहात हॉटसीटवर होते साक्षात राजेसाहेब आणि शेजारी किल्लेदार गडकरीसाहेब!!

‘संपूर्ण देशात मी असं कारंजं पाहिलं नाही...बरं का! जे काही पाहिलंय ते परदेशात! कमाल आहे!!’’ राजेसाहेबांनी स्तुतीसुमनांची एकच फुलपुडी जपून उलगडली.

‘मागल्या बाजूला चार माळ्याची इमारत दिसते, ती खरं तर अकरा माळ्याची आहे बरं! गरीबान्ले स्वस्त दरात पावभाजी, पिझ्झा, भेळपुरी असं मिळतं बरं तिथं!! त्याच्याही पल्ल्याड गुलाबाचं गार्डन होऊन ऱ्हायलंय, साडेपाच हज्जार गुलाब आहेत बरं! खा लेको गुलकंद खाता तेवढे! काय? हॅ हॅ हॅ हो होहो...’

गडकरीसाहेबांनी धडाधड रोडरोलर फिरवल्यासारखी माहिती दिली. राजेसाहेब गोंधळले. आता हा गुलकंद कुठून आला मध्येच, आं?

‘आपण दोघं स्वप्नं फार भव्यदिव्य पाहातो! असला कारंजा मला नाशकात उभा करायचा होता...,’ खंतावलेल्या स्वरात राजेसाहेब म्हणाले. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे भव्यदिव्य स्वप्न पुन्हा एकदा त्यांच्या नेत्रांसमोर तरळले. आहा! जागोजाग कारंजी, फुलबागा, उद्याने...

‘हे तं काहीच नाही, तलावाच्या मध्यभागी तरंगतं हाटेल काढतोय! तिथली भेळ तं एक नंबर इन द वर्ल्ड!! बघालच तुम्ही!,’ गडकरीसाहेबांनी आणखी एक भव्य स्वप्न पुढ्यात टाकले.

‘भेळ?’’ एवढेच उद्गार साहेबांच्या मुखातून बाहेर पडले.

चपळाईने भेळेचा पुडा पुढ्यात धरुन गडकरीसाहेब म्हणाले, ‘राजेहो, घ्या, हे खरं नवनिर्माण! आमच्या फुटाळ्याच्या चौपाटीची भेळ खाऊन तं पहा!!’

...नवनिर्माणाची भेळ चाखत चाखत फुटाळ्याची सायंकाळ अधिकच रंगीन जाहली.

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 20th September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..