ढिंग टांग : काही बिघडत नाही..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. काय बोलू? हा प्रश्नच आहे. पण तरीही बोलणार आहे. काळ मोठा कठीण आला आहे. किंबहुना एवढा कठीण काळ कधी आलाच नव्हता.

ढिंग टांग : काही बिघडत नाही..!

माझ्या तमाम बंधून्नो, भगिनीन्नो आणि मातान्नो,

बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. काय बोलू? हा प्रश्नच आहे. पण तरीही बोलणार आहे. काळ मोठा कठीण आला आहे. किंबहुना एवढा कठीण काळ कधी आलाच नव्हता. आपल्याच मित्र म्हणवणाऱ्या काही नतद्रष्टांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही असले खंजीर खूप पचवलेत! एक खंजीर आणखी…एका खंजीरानं काही बिघडत नाही. नंतर काही मूठभर गद्दारांनी खाल्ल्या मीठाला न जागता आईचं दूध विकण्याचं कृत्य केलं, आणि माणुसकीचा (आणि मराठी अस्मितेचा) गळा घोटला. पण त्यामुळे आपलं आणि आपल्या पक्षाचं काही बिघडलं नाही. ही नासकी फळं आपल्या आढीत नसलेलीच बरी! सुंठीवाचून खोकला गेला, अशी मराठीत म्हण आहे. आम्हीही तसंच म्हणू, चार टाळकी गेली म्हणून काही बिघडत नाही. जा, तोंड काळं करा, आणि जिथं घालायचंय तिथं घाला!! आणि जे खायचंय ते खा!

पाठोपाठ चाळीसेक शिलेदार आणि दहा-बारा अंमलदार आम्हाला सोडून निघून गेले. सत्तेसाठी हपापलेले हे लोक ! सत्तेसाठी लाळ घोटण्यासाठी आम्ही पैदा झालो नाही, तुम्ही असाल तसले! सत्तेचं लोणी चाटण्यासाठी विमानात बसून गुवाहाटीला पळालात…काय झाडी, काय डोंगार…करत बसलात!! ती झाडी, डोंगार, हाटेलं तुम्हालाच लखलाभ असो. आम्हाला आमचा महाराष्ट्र प्यारा आहे. तुमच्यासारखे बाजारबुणगे गेले म्हणून काही बिघडत नाही. जा, तोंड काळं करा आणि जि. घा. ति. घा. आणि जे. खा. ते. खा.!!

पाठोपाठ (मागे वळून पाहेपर्यंत) आमची खुर्ची गेली!! आम्ही असल्या छप्पन्न खुर्च्यांवर लाथ मारु, पण महाराष्ट्राशी प्रतारणा करणार नाही. एका खुर्चीची ती काय पत्रास? गेली, जाऊद्यात!! आपण पुन्हा ती खेचून आणू. एक खुर्ची गेल्यानं काहीही बिघडत नाही…

खुर्ची गेल्यावर आम्ही एक क्षणभरही थांबलो नाही. तात्काळ तो सरकारी महालही सोडला. घरी येऊन (म्हणजे बाहेरच्या खोलीतून आतल्या खोलीत येऊन ) बॅग भरली, आणि तडक निघालो. एक बंगला गेला, म्हणून काही बिघडत नाही…

पाठोपाठ बातमी आली, धनुष्यबाण गेलं. आता हे धनुष्यबाण आमचा जीव की प्राण! या धनुष्यबाणासाठी आम्ही काय काय केलं? पण तेही गेलं. म्हटलं, ठीक आहे. एक धनुष्यबाण गेलं म्हणून काही बिघडत नाही.

पाठोपाठ मशाल हाती आली. पण हातातल्या मशालीनं आम्ही त्यांच्या दाढ्या जाळू, हे कळल्यानं त्यांनी मशालही काढून घ्यायचं ठरवलंय. मशाल गेली तर माझ्या मनात छप्पन्न गोष्टी आहेत. मर्द, मावळे, तलवार, भाले, कोथळा, खंजीर, पलंग, मोटार…घ्या, मशालही घ्या, आमचं काही बिघडत नाही.

पाठोपाठ बातम्या आल्या की आमचं कार्यालयही हे चोरटे पळवणार आहेत ! अरे, तुम्ही काय काय पळवणार? घरदार लुटून नेणारे दरवडेखोरसुध्दा जाताना पाच-दहा रुपये माणुसकीखातर ठेवून जातात. आणि तुम्ही? घरासकट नेमप्लेटही चोरुन नेताय!! न्या, न्या, सगळं नेलंत तरी काही बिघडत नाही…

माझ्या बं, भ, मां. नो, तुम्ही म्हणाल, सगळंच बिघडतंय, तरीही काही बिघडत नाही असं तुम्ही का म्हणताय? तर त्यावर माझं उत्तर असं आहे : सगळं बिघडलं तर बिघडू दे. मी हेच म्हणत राहणार, काही बिघडत नाही…काहीसुध्दा बिघडत नाही! जय महाराष्ट्र!

(तळटीप : वरील मजकुराचा चोळामोळा केलेला कागुद आम्हांस कलानगर, वांद्रे येथील सिग्नलपाशी आढळून आला. ज्याचा असेल, त्याने क्लेम करावा. नाही केला तरी काही बिघडत नाही, काहीसुध्दा बिघडत नाही.)