ढिंग टांग : दोन कारभारी!

आदरणीय मित्रवर्य आणि गुरुवर्य मा. नानासाहेब यांसी, जय महाराष्ट्र! तुम्ही सांगितल्याप्रमाणे परवा रात्री विमानात बसून दिल्लीत आलो.
Shing Tang
Shing TangSakal
Summary

आदरणीय मित्रवर्य आणि गुरुवर्य मा. नानासाहेब यांसी, जय महाराष्ट्र! तुम्ही सांगितल्याप्रमाणे परवा रात्री विमानात बसून दिल्लीत आलो.

आदरणीय मित्रवर्य आणि गुरुवर्य मा. नानासाहेब यांसी, जय महाराष्ट्र! तुम्ही सांगितल्याप्रमाणे परवा रात्री विमानात बसून दिल्लीत आलो. सध्या मुक्काम महाराष्ट्र सदनात (लॉबीमध्ये सोफ्यावर) आहे. आल्या आल्या कौंटरवर रुमची चावी मागितली. त्यांनी आधारकार्ड मागितले. कौंटरवरचा माणूस चावी देत नव्हता. तुमचे नाव सांगितल्यावर दोन खोल्यांच्या चाव्या दिल्या! तुमची दिल्लीत चांगली वट आहे, हे बघून बरे वाटले…

चाव्या खिशात आहेत, तरीही अजून रुम ताब्यात घेतलेली नाही. कारण भेटीला येणाऱ्यांचा ओघ वाढतोच आहे. आमच्या पक्षातले बारा शिलेदार इथे भेटले. (तेव्हाही मी सोफ्यावरच होतो!) ठरल्याप्रमाणे सगळ्यांना प्लॅन नीट समजावून सांगून आणखी गोंधळात टाकले. स्वतंत्र गटाचे पत्र दिले तर अपात्र ठरणार नाही ना? असा सवाल प्रत्येकाने केला. त्यांना ‘अजिबात नाही’ असे छातीठोकपणे सांगितले. गुवाहाटीलाही हाच प्रश्न आमचे चाळीस कार्यकर्ते दर तासाला तीन वेळा विचारत होते. ठरल्याप्रमाणे आमच्या राहुलजी शेवाळेसाहेबांना गटनेता नेमून टाकले. आधी ते घाबरले. ‘काही प्रॉब्लेम होणार नाही ना?’ असे सारखे विचारत होते. त्यांनाही भरोसा दिला. म्हटले, ‘मी आहे ना?’ पण तरीही त्यांचा विश्वास बसेना. मग तुमचे नाव सांगितले. त्यांनी लगेच होकार दिला. आमच्याही पक्षात अजूनही तुमचीच वट आहे, हे बघून बरे वाटले…

‘कोर्टाच्या कामाला जायचे आहे, म्हणून आलो’ असे इथल्या पत्रकारांना सांगितले. ते हसले! मी हसलो नाही. खरेतर मला मा. नमोजीसाहेब आणि मा. मोटाभाईसाहेब आणि मा. नड्डाजीसाहेबांना भेटायचे आहे.

पुष्पगुच्छ, शालश्रीफळ देऊन आभार मानायचे आहेत. पण त्यांच्या भेटीची वेळ मिळू शकली नाही. बराच वेळ वाट पाहात (सोफ्यावर बसून ) राहिलो. शेवटी तुमचे नाव सांगितले. त्याबरोबर लागलीच ‘कोर्टातले काम संपले की मग या’ असा निरोप आला. दिल्लीत हायकमांडकडे तुमचीच वट आहे, हे बघून बरे वाटले…

तुमची पुढील सूचना मिळेपर्यंत इथेच बसून राहीन म्हणतो! कधी परत येऊ ते कृपया कळवावे. आपला

आज्ञाधारक मु. भाईसाहेब (सीएम)

प्रिय शूरवीर भाईसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. तुम्ही दिल्लीत सोफ्यावर बसले आहात, आणि मी इथे पूर परिस्थिती बघत हिंडतो आहे! इथली काहीही काळजी करु नका, पूरबिर, दुष्काळबिष्काळ मी बघून घेतो, तुम्ही तुमच्या बारा शिलेदारांना मात्र सांभाळा!! चाळीस-पन्नास लोकांचा जमाव गुवाहाटीत सांभाळणाऱ्या शूरवीराला डझनभर शिलेदार सांभाळणे काहीही कठीण नाही. लगे रहो!

…सध्या आपण दोघेच राज्यकारभाराचा गाडा हाकत असलो तरी कुठेही काम थांबलेले नाही, याची नोंद घेतली जात आहे. तुम्हाला महाराष्ट्राचे कारभारी नेमून प्रत्यक्षात मीच कारभार करतो, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याला अजिबात उत्तर देऊ नका. (मीही देत नाही! ) ‘कारभारी नेमके कोण आहे? तुम्ही की भाईसाहेब?’ असा प्रश्न मला विचारला नेहमी जातो. मी अर्थात तुमचे नाव घेतो. (काळजी नसावी! ) तुम्ही तिथेच (घट्टपणे) बसून राहा! अर्थात त्यासाठी पूर्णवेळ (महाराष्ट्र सदनाच्या लॉबीत) सोफ्यावर बसून राहिले पाहिजे असे नव्हे. क्यांटिनमध्ये जाऊन दोन घास जेवून घ्या, आणि अधून मधून पाय मोकळे करायलाही हरकत नाही. बाकी भेटीअंती. तुमचाच कारभारी क्र. २. नानासाहेब.

ता. क. : इशारा मिळताच ‘महाराष्ट्र सदना’तून चेकाऊट करावे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com