ढिंग टांग : …वहाँ से किया है टैलिफोन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

आमचे परममित्र मा. संजयाजी राऊतसाहेब यांना दूरदेशीहून एक फोन आला, तेव्हा ते बेसावधपणाने (किंवा सावधपणाने) क्यालेंडर तपासत होते.

ढिंग टांग : …वहाँ से किया है टैलिफोन!

आमचे परममित्र मा. संजयाजी राऊतसाहेब यांना दूरदेशीहून एक फोन आला, तेव्हा ते बेसावधपणाने (किंवा सावधपणाने) क्यालेंडर तपासत होते. एफेम रेडिओवर ‘मेरे पिया गये रंगून, किया है वहां से टैलीफून, तुम्हारी याद सताऽऽती है…’ हे जुनेपुराणे फिल्मी गीत वाजत होते. ‘शंभर, एकशे एक…एकशे तीन…एकशे दहा’ असे आकडे स्वत:शीच पुटपुटत राऊतसाहेब दिवस मोजत होते. मान हलवत ‘छे छे, पुन्हा नको’ असे स्वत:शीच पुटपुटत होते. तेवढ्यात ‘तो’ फोन आला. अब आगे…

संजयाजी : (दरडावणीच्या सुरात) जय महाराष्ट्र! कोणॅय?

राहुलजी : (नेहमीच्या मृदू सुरात…) जय हिंद! कैसे हो?

संजयाजी : (आवाज अजिबात न ओळखून) बराय की!

राहुलजी : (मऊ मेणाहुनी…) कैसी है तबियत आपकी?

संजयाजी : (गोंधळून) तब्येतीला काय धाड भरलीये आमच्या? आमच्यामुळे इतरांच्या तब्बेती बिघडतात!...नाव सांगा की!

राहुलजी : (गोड हसत) आपका एक हितचिंतक! आपका मित्र! लेकिन बहुत दिनों से हम मिले नहीं! आप दिल्ली नहीं आए…!

संजयाजी : (सहमे हुए से..) हांऽऽ…वो जरा अपन बिझी था, एकसो दस दिन औट ऑफ स्टेशन था!!

राहुलजी : (गंभीरपणे) …आप भायखला में थे!

संजयाजी : (संशय येऊन) तुम्ही ‘ईडी’च्या ऑफिसमधून बोलताय का?

राहुलजी : (दुर्लक्ष करत) हमारी यात्रा में आप आनेवाले थे! लेकिन आप आए नहीं, हमारे साथ दो कदम चलने! आपके बांद्रावाले साहब भी शेगाव की सभा में दर्शन के लिए आनेवाले थे! सोचा, तबियत का हाल पूंछ लूं…!

संजयाजी : (आवाज ओळखून पार हुरळून जात) ओहो, राहुलजी! प्रणाम, प्रणाम! वो क्या हुआ ना…मैं ना…आनेवाला था! लेकिन इधर थोडा लोच्या हुआ, करके नहीं आया!! आपका फोन आया, यह मेरे लिए बहुत बोले तो बहुतीच बडी बात है! वरना आजकल कौन किसका हालचाल पूछता है?

राहुलजी : (स्नेहपूर्ण सुरात) हांऽऽ…हम प्यार, मुहोब्बत, दोस्ती, भाईचारा बांटते चल रहें है!

संजयाजी : (सद्गदित कंठाने) हल्ली कोण असं प्यारव्यार वाटतो हो? सगळ्यांना खोके हवे असतात!

राहुलजी : (निरागसपणाने) आप बोलेंगे तो हम खोके में भाईचारा बांटेंगे!!

संजयाजी : (भरल्या गळ्याने) मी एकशेदहा दिवस बाहेर…आय मीन…आत होतो, तेव्हा कोणीही चौकशी केली नाही! तुम्ही आवर्जून फोन केला- याला म्हणतात माणुसकी बरं!

राहुलजी : (विनयाने) आपने हमारा फोन उठाया, यह आपकी माणुसकी है! आप हमारी यात्रा में कब शामील होनेवाले हैं?

संजयाजी : (सावध होत) आलो असतो, पण सध्या जास्ती चालू नका असा वैद्यकीय सल्ला मिळालाय !

राहुलजी : (दीर्घ श्वास घेत संयमाने) कुठल्या डॉक्टरनं तुम्हाला असा सल्ला दिला?

संजयाजी : (बेधडक शैलीत) मी डॉक्टरकडून कधीच औषध किंवा सल्ला घेत नाही…कंपौंडरकडून घेतो! संपूर्ण महाराष्ट्राला हे माहीत आहे!

राहुलजी : (निरोपाच्या सुरात) ठीक आहे! टेक केअर!! पण चालण्यानं आरोग्य सुधारतं, हे लक्षात ठेवा! फिर मिलेंगे! थँक्यू!!

संजयाजी : (चतुराईने) थँक्यू काय? तुमचा फोन येऊन गेला, हे मीच पत्रकार परिषदेत अभिमानाने सांगेन! जय महाराष्ट्र!!