ढिंग टांग : डुप्लिकेट, डुप्लिकेट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

परममित्र मा. कर्मवीर लोकनाथसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. अतिशय टेन्शनमध्ये हे पत्र पाठवत आहे. पत्र घेऊन येणाऱ्या जासुदास आपले आधारकार्ड (ओळख पटवण्यासाठी) दाखवावे, ही विनंती!

ढिंग टांग : डुप्लिकेट, डुप्लिकेट!

परममित्र मा. कर्मवीर लोकनाथसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. अतिशय टेन्शनमध्ये हे पत्र पाठवत आहे. पत्र घेऊन येणाऱ्या जासुदास आपले आधारकार्ड (ओळख पटवण्यासाठी) दाखवावे, ही विनंती! आपले दोन-तीन डुप्लिकेट महाराष्ट्रात फिरत असून लोकांमध्ये मिसळून फोटोबिटो काढून घेत असल्याचे समजले. सेम टु सेम तुमच्यासारखी दाढी, तस्साच कपाळावर नाम, तस्सेच्या तस्से पांढरेशुभ्र कपडे आणि डिट्टो चष्म्याची फ्रेम…चेहऱ्यावरचे हास्यही तसेच!! अशा परिस्थितीत काळजी घेतलेली बरी. हे खरेच तुमचे डुप्लिकेट आहेत की तुम्हीच डब्बल रोल करताय, हे कळायला काही मार्ग नाही. म्हणून हे पत्र.

‘महाराष्ट्रातील सर्वांनाच आता मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे,’ असे तुम्ही म्हणाला होता. ते एवढे खरे ठरेल, असे मात्र वाटले नव्हते. मी पाच वर्षे या राज्याचा मुख्यमंत्री होतो. पण माझ्यासारखा पोशाख करुन कुणी फिरल्याचे ऐकिवात नाही. तुमच्यात काहीतरी जादू आहे, खास!! तुमच्यासारखे दिसणारे बरेच लोक आहेत, हे मी तुम्हाला बजावून बजावून सांगितले होते. डिट्टो कर्मवीर, सेमटुसेम कर्मवीर, सेमी कर्मवीरांचे पेव फुटले आहे. आपल्यासारखा पोशाख करुन अनेक लोक गावोगाव फिरत असून सोशल मीडियावर फोटोदेखील टाकत आहेत. पुण्यातील एका डुप्लिकेट कर्मवीराने धुमाकूळ घातल्याचे निष्पन्न झाले असून

त्यांच्याविरोधात पोलिसांनी फिर्याद नोंदवली आहे. एकट्या पुण्यात तुमच्यासारखी तीन-चार माणसे आहेत, असे मला आमचे सहकारी व मित्र मा. चंदुदादा कोल्हापूरकर यांनी सांगितले. परवा पुण्यात कोथरुडला जाताना त्यांनी रिक्षा थांबवली. चालवणारे डुप्लिकेट कर्मवीर निघाले! आमचे चंदुदादा घाबरुन खालीच उतरले!! गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक आटोपून नागपूरला गेलो, तर तिथल्या कार्यकर्त्यांनी ‘आत्ताच सीएमसाहेब येऊन गेले’ असे सांगून मला बुचकळ्यात टाकले. कारण मुंबईत मी दीड तास तुमच्याशीच बोलून थेट विमानात बसलो होतो. चौकशीअंती समजले की तुमचा कुणी डुप्लिकेट नागपुरात हिंडत होता. गणेशोत्सवाच्या काळात तर कहर झाला होता. आपण दोघेही गणेशदर्शन करत महाराष्ट्रभर हिंडत होतो. तेव्हा ठाण्यात मी एका कार्यक्रमाला गेलो असता, तेथे अचानक गडबड उडाली. ‘सीएम आले, सीएम आले’ असा आरडाओरडा सुरु असतानाच नेमके आपण आलात! माझा मुळीच विश्वास बसला नाही. मला वाटले तुमचा डुप्लिकेटच आला आहे. मी त्याला ‘चावट माणसा, नक्कल बरी करतोस हं’ असे कौतुकाने म्हणालो, आणि एक हलकेच चापटही ठेवून दिली. त्याचा (पक्षी : तुमचा) चेहरा पडला!! असो.

महाराष्ट्रात हे काय चालले आहे? अशी विचारणा मला दिल्लीहून होत आहे. दिल्ली दौऱ्यावर नेमके कोण येणार आहे? असे मला विचारण्यात आले आहे. तुम्ही(च) नक्की दिल्लीला जाणार आहात ना? आमच्या पक्षश्रेष्ठींना भेटण्यापूर्वी आधारकार्ड जवळ ठेवा. गेल्या गेल्या दाखवा! नाहीतर घोटाळा होईल!! कळावे.

आपला फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. नानासाहेब फ.

ता. क. : काल रात्री आपली गोपनीय बैठक माझ्या घरी झाली, ते कोणालाही कळू देऊ नका!

आदरणीय नानासाहेब, जय महाराष्ट्र, तुमच्या घरी कुठली गोपनीय बैठक झाली? मी तर तेव्हा ठाण्याला किसननगर शाखेत गेलो होतो. माझे फोटो काढण्यात आले. (पुराव्यासाठी पाठवत आहे! ) तुम्ही दुसऱ्याच कुणालातरी भेटला असणार! किंबहुना मंत्रिंमडळ बैठकीलाही मी नव्हतोच! काहीतरी घोटाळा आहे! तुम्हीच काळजी घ्या.

कळावे.

कर्मवीर लोकनाथ.

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 22nd September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..