ढिंग टांग : घोडामैदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

उधोजीराजे : (अचानक काहीतरी याद होऊन) कोण आहे रे तिकडे? (बराच वेळ कोणीही येत नाही. कारण कोणी उपलब्धच नाही! राजे चरफडतात.) अरे कुठे उलथले सगळे?

ढिंग टांग : घोडामैदान!

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे (बुद्रुक). वेळ : रणमैदानाची.

(राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थतेने येरझारा घालत आहेत. मधूनच तलवारीचे चार हात हवेतल्या हवेत करतात. ‘प्रॅक्टिस करायला हवी’ असे स्वत:शीच पुटपुटतात. मधूनच दातओठ खात अदृश्य शत्रूला आव्हान देतात. असे सगळे बरेच काही काही चालू आहे. अब आगे…)

उधोजीराजे : (अचानक काहीतरी याद होऊन) कोण आहे रे तिकडे? (बराच वेळ कोणीही येत नाही. कारण कोणी उपलब्धच नाही! राजे चरफडतात.) अरे कुठे उलथले सगळे?

युवराज विक्रमादित्य : (अचानक प्रविष्ट होत) सगळे तिकडे उलथले…तिकडे! खोके सरकारात!!

उधोजीराजे : (संतापाने) मिंधे लेकाचे!

युवराज विक्रमादित्य : (हाताची घडी घालोन…) बॅब्स…!

उधोजीराजे : (कळवळून) हजारदा सांगितलं तुम्हाला युवराज! आम्हाला बॅब्स म्हणो नका म्हणून!!

यु. वि. : (खांदे उडवत) ओके! नाही म्हणत!! पण हे असं किती दिवस चालणार?

उधोजीराजे : (त्वेषाने) त्या जुलमी पातशहास अस्मान दाखवेपर्यंत! लेकाचे आम्हाला जमीन दाखवायला निघाले आहेत! बघतोच आता! या उधोजीच्या तलवारीशी गाठ आहे म्हणावं! हिंमत असेल तर या असे मैदानात! कोथळा काढीन, कोथळा!

यु.वि. : (इंटलेक्चुअली) पण मैदानच नै ना!! कोथळा कसा काढणार?

उधोजीराजे : मैदान मिळू दे! मग दाखवतो यांना आस्मान!!

यु. वि. : (शांतपणे) मैदान नॉट पॉसिबल! म्हंजे असं बीएमसीनं कळवलं आहे!

उधोजीराजे : ही मुंबई हेच आमचं मैदान आहे, म्हणावं!

यु. वि. : (उजळ सुरात ) दॅट वॉज गुड वन!! बाकी तुमचं कालचं भाषण एक नंबर हं, बॅब्स! कोथळा, बदला, रक्त, अवलाद, गोचीड, गिधाडं, अस्मान, गद्दार, खुद्दार, मिंधे…सॉल्लिड!! पब्लिक जाम खुश झालं होतं!

उधोजीराजे : (काहीसे संकोचत) काहीतरीच तुझं! नेहमीसारखंच तर बोललो!

यु. वि. : (कुतूहलानं) बाय द वे, गोचीड म्हंजे लीच ना?

उधोजीराजे : (संतापाने खदखदत ) गोचीड म्हंजे नीच!!!

यु. वि. : आपला दसरा मेळावा जोरदार होणार, बॅब्स!

उधोजीराजे : (एकदम आठवून )…व्हायलाच हवा!! कुठे गेले आमचे सरदार-दरकदार? कुठे गेले आमचे शूरवीर शिलेदार? ताबडतोब बोलावून घ्या त्यांना! म्हणावं, जेवत असाल तर आंचवायास येथ या, आंचवत असाल तर हात पुसायास येथ या! हात पुसत असाल तर…

यु. वि. : (थांबवत) आय गॉट यु, बॅब्स!

उधोजीराजे : (वैतागून ) पुन्हा तेच?

यु. वि. : (शांतपणे) कुणीही सरदार अवेलेबल नाही!

उधोजीराजे : (उसळून ) का? त्यांना काय धाड भरली?

यु. वि. : (हाताची घडी घालून थंडपणाने ) आपले सगळे सरदार घोडे शोधायला गेले आहेत!

उधोजीराजे : (हादरुन) घोडे?

यु. वि. : (डोळे मिटून मान हलवत) यु आर राइट…घोडेच! मधल्या अडीच वर्षात आपले घोडे पळून गेल्याचा रिपोर्ट आहे!

उधोजीराजे : (डोकं खाजवत) अरेच्चा, पळून कसे जातील? मला कसं कळलं नाही? घोडा नाही, मैदान नाही! माणसानं लढायचं तरी कसं, अं?

यु. वि. : (उत्साहात) आपण या लढाईचा व्हिडिओ गेम आणू या!! गद्दार इलेवन विरुध्द खुद्दार इलेवन!! बना लो अपनी टीम, जीत लो ढेरों इनाम!! लढा, घरातल्या घरात! कशी आहे आयडिया?

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 23rd September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..