ढिंग टांग : ईडीची चौकशी : एक अनुभव!

गेले दहा दिवस जो क्षण टाळत होतो, तो अखेर आज उजाडला. सकाळी जागच आली नाही. कुणीतरी उठवले.
Dhing Tang
Dhing Tangsakal

गेले दहा दिवस जो क्षण टाळत होतो, तो अखेर आज उजाडला. सकाळी जागच आली नाही. कुणीतरी उठवले. म्हणाले, ‘साहेब, उठावं लागतंय, ईडीच्या चौकशीला जायचंय ना?’ ते ऐकून आणखीनच झोपावेसे वाटले. पण बळेबळे उठलो. कर नाही त्याला डर कशाला?

अतिशय प्रसन्न मनाने निघालो. पक्षकार्यालयात गेलो. तिथे अनेक कार्यकर्ते प्रेमापोटी जमले होते. मन गहिवरले. केवढे हे प्रेम? डोळ्यात पाणी आले. हल्ली वारंवार डोळ्यात पाणी येते. मागल्या खेपेला थोरल्या साहेबांनी जेव्हा...जाऊ दे.

पक्षकार्यालयातून निघून ईडीच्या कचेरीकडे निघालो. एक पुस्तक उचलले. म्हटले, वेळ घालवायला नेलेले बरे. आमचे पीए म्हणाले की, ‘‘साहेब, एकादं जाडंजुडं पुस्तक न्या!’ मी रागावलो. त्याला म्हणालो, ‘संध्याकाळी मी परत येणार आहे! नॉन्सेन्स!’

ईडीचा नेमका पत्ता ठाऊक नव्हता. पण हल्ली बऱ्याच लोकांना तो ठाऊक झाला आहे. वास्तविक आमच्या पक्षाचं ऑफिस अगदी जवळ आहे, पण इतकी वर्षं ईडी नावाचे प्रकरण इथेच जवळ कुठे तरी आहे, हे ठाऊक नव्हते.

रस्त्यात एकाला पत्ता विचारला. ‘‘ईडी का ऑफिस बोले तो किधरकू है?’’ त्याने घाईघाईने एका इमारतीकडे बोट दाखवून पुन्हा घाईघाईने दुसऱ्याला तिसराच पत्ता विचारला! ही मुंबई आहे, इथे असेच घाईघाईने चालणार! पण त्याने दाखवलेली इमारत एलआयसीचे कार्यालय निघाले!! ईडीला जाणारा माणूस आयुर्विम्याच्या कचेरीकडे रिडायरेक्ट होणे हा योगायोग समजावा काय, असे स्वत:ला समजावत पत्ता शोधत अखेर इष्टस्थळी पोचलो. इष्ट कसले? अनिष्टस्थळ ते!!

ईडीच्या कचेरीत गेल्यावर तिथल्या एका सुरक्षा रक्षकाने विचारले, ‘कौन मंगता हय?’ मी म्हटले, ‘कोई नहीं मंगता!चौकशी के लिए आया है!!’ त्याने एका खोलीकडे बोट दाखवून ‘तिथे बसा’ असे सांगितले. बसलो! बराच वेळ कोणीही आले नाही. मग एक गृहस्थ आले. त्यांनी विचारले, ‘तुम्ही का आलात? नाव काय?...पूर्ण नाव काय?’’ वगैरे चौकशी केली. मी माझ्या मते समाधानकारक उत्तरे दिली. तो निघून गेला.

थोड्या वेळाने दुसरा अधिकारी आला. त्याने ‘तुम्ही चौकशीला आलात का? तुमचं नाव अमूक अमूक आहे का? पूर्ण नाव हे हे हे असंच आहे ना?’ एवढे विचारले. सगळी उत्तरे आधीच दिलेली होती. जी माझ्या मते समाधानकारक असावीत, कारण तो ‘ओक्के’ असे म्हणून निघून गेला.

थोड्या वेळाने तिसरा अधिकारी आला. त्याचा चेहरा मात्र रागीट होता. त्याने एकही प्रश्न न विचारला घुश्शात घशातून वेगवेगळे आवाज काढले. (हेच ते दबावाचे राजकारण बरे!) पण प्रश्न काहीच विचारेना! शेवटी मीच म्हटले, ‘‘काही विचारायचंय का?’’

‘वाजले किती?’ त्याने चमकून विचारले. मी वेळ सांगितली. (माझ्याकडे एक घड्याळ निष्ठेने मनगटाला बांधलेले असते! असो!!) तो चिडून म्हणाला, ‘‘लंच टाइम झाला, पण डबा नाय आला! हँ:, ही काय पद्धत झाली?’

मग सगळ्यांनी मिळून डबे उघडले. मीही दोन घास खाल्ले. दुपारी चहाबिस्कुटे झाली. सहा वाजता कुणीतरी वडापाव मागवला. तो मात्र मी खाल्ला नाही. संध्याकाळी सर्व अधिकारी घरी जायला निघाले. मी तिथेच बसून होतो.

‘साहेब, नऊ तास भरले की जा हं घरी! थँक्यू!’ असे म्हणून अधिकारी निघून गेले. रात्री साडेनऊला चौकशी संपवून मी बाहेर आलो. लोकांना वाटते, तितके हे प्रकरण घाबरण्यासारखे नाही. आमच्या आघाडीच्या बैठकीत मी हे आवर्जून सांगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com