ढिंग टांग : सामसूम आघाडी! (एक छुपी पत्रापत्री…) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

मा. उधोजीसाहेब आणि मा. पटोलेनाना, कोपरापासून नमस्कार! मीटिंग रद्द झाल्याचं तरी कळवत चला.

ढिंग टांग : सामसूम आघाडी! (एक छुपी पत्रापत्री…)

मा. उधोजीसाहेब आणि मा. पटोलेनाना, कोपरापासून नमस्कार! मीटिंग रद्द झाल्याचं तरी कळवत चला.

आगामी हिवाळी अधिवेशनात आपली रणनीती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची मीटिंग बोलावण्यात आल्याचे सांगितले गेले होते. मी बारामतीहून खास येऊन मुंबईत टायमात पोचलो. मीटिंगच्या ठिकाणी मोजून पन्नास मिनिटे वाट पाहिली. एक शिपाई ‘साहेब, चहा आणू का?’ असे विचारुन गेला. पण बाकी कोणीही फिरकले नाही. बराच वेळ वाट बघून आमचे अध्यक्ष मा. जयंत्रावजींना फोन केला. त्यांनी ‘कसली मीटिंग? मला काही कल्पनाच नाहीओ..!’ अशी सुरवात केल्याने फोन ठेवून दिला. आपली महाविकास आघाडी पंचवीस वर्षे टिकणार होती, त्याचे काय झाले? मविआ अजूनही आहे, हे लोकांना पटवून द्यायचे असेल तर मीटिंगांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मला वाटते. थोडावेळ टाइमपास करुन मी शेवटी एकट्यानेच पत्रकार परिषद घेऊन टाकली. बाकीचे आता तुम्ही बघा. मी निघालो! आपला. दादासाहेब बारामतीकर.

मा. पटोलेनानाजी, जय हिंद जय महाराष्ट्र. आज सकाळी फोन वाजल्याने खडबडून जाग आली. मेसेज होता! आपल्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. आगामी हिवाळी अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी भेटण्याचे ठरले होते. पण मी विसरलो! साफ विसरलो!! सॉरी. पुढल्या मीटिंगला नक्की येईन. आपला नम्र कार्यकर्ता. बाळासाहेब जोरात.

मा. पटोलेनाना, आज मीटिंग होती? मला कल्पनाच नाही. कुणी सांगितलंच नाही. कसं कळणार? आता पुढली मीटिंग कधी आहे, ते सांगून ठेवा. बरं पडेल!

कळावे. आपला. आशुक्राव चव्हाण. (सध्या नांदेडच!)

मा. उधोजीसाहेब यांसी स. न. वि. वि. आपल्या महाविकास आघाडीची महत्त्वाची मीटिंग मुंबईत बोलावली होती हे मला आज कळले! आलो असतो, पण चालून चालून पायाचे तुकडे पडले आहेत.

महाराष्ट्रातली ‘भारत जोडो’ यात्रा नुकतीच संपली. प्रचंड थकून गेलो आहे. बूट फाटले! पुढल्या मीटिंगला नवे बूट घालूनच येईन. सध्या सांभाळून घेणे. बाकी काय लिहू?

आपला. पटोलेनाना.

मा. दादासाहेब, जय महाराष्ट्र. सध्या प्रचंड बिझी असल्यामुळे मी महाविकास आघाडीच्या बैठकीला येऊ शकलो नाही. चि. आदित्यला मी ‘जा’ असे सांगितले होते. पण ‘एक चक्कर टाकून येतो’ असे सांगून तो सरळ बिहारला गेला! मला हल्ली खूप काम असते. सकाळी उठून शेजारच्या बंगल्यातील मोगरीची आणि चाफ्याची फुले तोडून आणतो. दुर्वा आमच्या आवारात मिळतात.

मग वर्तमानपत्रांचे वाचन करायचे ठरवतो. (करत नाही…नुसतेच ठरवतो.) पुढे माणसे भेटीला येत असतात. नाही म्हटले तरी (अजूनही) मी त्यांचा कुटुंबप्रमुख आहे. महाविकास आघाडीच्या मीटिंगला जाणे अगदी गरजेचे आहे का, असे मी पक्ष सहकाऱ्यांना (पक्षी : आमचे संजयाजी राऊतसाहेब! ) विचारले. तर ते म्हणाले, ‘ पीक आवरमध्ये ट्रॅफिक खूप असतो. कसे जाणार? बांदऱ्याहून नऊ-सतराची स्लो लोकल पकडून जा, हवं तर…’ मग मी नाद सोडला. महाविकास आघाडी पंचवीस वर्षं टिकणार ही काळ्या फत्तरावरली सफेद रेघ आहे. पंचवीस काय पन्नास वर्षेही टिकेल! एक मीटिंग रद्द झाली म्हणून काय बिघडते? पुढली मीटिंग आमच्या ‘मातोश्री’तच लावा, म्हंजे तिथेच असेन! बाकी भेटीअंती बोलूच. उधोजी.