ढिंग टांग : आक्रोश की जल्लोष? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : आक्रोश की जल्लोष?

ढिंग टांग : आक्रोश की जल्लोष?

परम आदरणीय, मा. मोटाभाई आणि वंदनीय मा. नड्डाजी यांना बालके नानासाहेबाचा शतप्रतिशत प्रणाम.

आम्ही सोमवारी औरंगाबादेत काढलेला विशाल जल आक्रोश मोर्चा पाहून महाभकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडाचे पाणी पळाले असेल अशी अपेक्षा आहे. तुम्हीही मोर्चाचा टीव्हीवर इव्हेंट बघितला असेलच. दिवसभरात काही लक्षणीय घडले की रात्री फोनवर तुम्हाला कळवायचे, असा आपला जुना परिपाठ आहे. परंतु, पाठीत उसण भरल्याने पत्र लिहून आमच्या यशस्वी मोर्चाचा वृत्तांत तुम्हाला थेट व लेखी कळवत आहे…

औरंगाबादेत पैठणगेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते महापालिका मुख्यालय असा आपल्या पक्षाच्या मोर्चाचा ठरलेला मार्ग होता. (मी स्वत: येणार म्हणून) औरंगाबादकरांची प्रचंड गर्दी जमली होती. वातावरण भारलेले होते. काही काळ हा पाण्यासाठी मोर्चा आहे, की विजयोत्सवाची मिरवणूक हेदेखील कळत नव्हते. गर्दीमध्ये मला दोन उंटदेखील दिसले. उंट बघून मी चक्रावलो. मोर्चाचा पत्ता चुकून जत्रेत आलो की काय असे क्षणभर वाटले. पण तेवढ्यात मोर्च्याच्या आमचे परममित्र आणि सहकारी मा. रावसाहेब दानवे फेटा बांधून स्वागताला पुढे आले. त्यांच्या हातात दोर होता, आणि दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला चक्क उंट होता!! मला वाघाची अजिबात भीती वाटत नाही. (तुम्हाला ठाऊक आहेच! ) पण उंट म्हटले की माझ्या धैर्यशील मनाला पोक येते. मागल्या खेपेला राजस्थानात मी उंटावरची सवारी केली आहे. तपशीलात जात नाही, पण शत्रूलासुध्दा उंटावर बसवू नये, असे माझे तेव्हापासून मत झाले आहे. उंटाच्या सवारीनंतर अर्धाएक प्रहर आपण मागेपुढे झुलत आहो, असा भास होत राहातो.

शिवाय हा प्राणी लाथही जोरकस मारतो. असो. उंटावर बसण्यास मी सपशेल नकार दिला. ‘दानवेजी, उंट कशाला आणलात?,’ मी कुरकुरलो. ‘त्याला काय हुतंय, बसा की!’ दानवेजींनी प्रोत्साहन दिले. हे गृहस्थ रेल्वेमंत्री आहेत म्हणे!! ‘उंट जलसंधारणाचं प्रतीक आहे’ असा युक्तिवाद करत त्यांनी उंटाच्या सहभागाचे समर्थन केले. नाथसागराची खोली, आणि दानवेंची बोली, याला साऱ्या तारांगणात तोड नाही, असे म्हटले जाते, ते काही उगाच नाही.

शेवटी उंटाच्या पाठीवर हंडे-कळश्या लादून मी उघड्या मोटारगाडीतून मोर्चात सहभागी व्हावे असे ठरले.

‘उंटसवारीनं मजा आली असती...,’ अशी कुरकूर मा. दानवेजी सतत करत होते. उघड्या मोटारगाडीतही ते माझ्या शेजारी उभे राहिले. दुसऱ्या बाजूला मा. भागवतजी कराड उभे राहात होते, पण गिरीशभाऊ महाजनांनी त्यांना हळू हळू मागे ढकलत स्वत: आघाडी घेतली. उघड्या गाडीपुढे मोर्चातील कार्यकर्ते नाचत होते, काहींनी फुगड्याही घातल्या. रिकामे हंडे-कळशा वाजवण्याचा कार्यक्रमही पार पडला. कार्यकर्त्यांचे रंगारंग कार्यक्रम आटपेनात, म्हणून दानवेजींनी दाणकन गाडीतून उडी घेतली, आणि पक्षाच्या झेंड्याची काठी करुन त्यांनी गाडीपुढली गर्दी दूर लोटण्यास प्रारंभ केला. हे गृहस्थ थ्रू ट्रेन चालवण्यास किंवा गेलाबाजार वाफेचे इंजिन चालवण्यास पूर्णपणे पात्र आहेत, याची मला खात्री पटली. हा जल आक्रोश होता की जल्लोष हे शेवटपर्यंत समजले नाही. अशी अनेक आंदोलने-कम –इव्हेंट करता येतील. परंतु, दानवेजींना आवरा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. उद्या, सत्ता आली की हेच गृहस्थ मला घोड्यावर बसवतील!! कळावे.

आपला नम्र कार्यकर्ता. नानासाहेब फ.

- ब्रिटिश नंदी

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 25th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top