ढिंग टांग : मन में है अविश्वास..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

दादू : (फोन फिरवत सांकेतिक भाषेत) घुर्रर्रर….हॉऽऽव…घर्रर्र!!

ढिंग टांग : मन में है अविश्वास..!

दादू : (फोन फिरवत सांकेतिक भाषेत) घुर्रर्रर….हॉऽऽव…घर्रर्र!!

सदू : (थंडपणाने) कोण म्यांव म्यांव करतंय?

दादू : (संतापून) वाघाच्या डरकाळीला म्यांव म्यांव म्हणता? खांडोळी करीन!!

सदू : (छद्मीपणाने) फू:!!

दादू : (खवळून) हा वाघ एकदा चवताळला की कुणाला ऐकणार नाही! मेरे अंदर के जानवर को मत जगा,

सदूऽऽऽ…! (इथे डरकाळी घुमते…)

सदू : (दचकून) बाप रे! घाबरलो ना मी…केवढी मोठी ती डरकाळी?

दादू : (खुश होत) माझा नवीन रिंगटोन आहे तो! कसाय?

सदू : (मानभावीपणाने) मस्त! फोन का केला होतास?

दादू : (मायेने) सहजच!

सदू : हल्ली तू सहज फोन करतोस? कमालच आहे!

दादू : (निरागसपणाने) मी हल्ली गावोगाव फोन करुन माझ्या मावळ्यांना विचारतो की सगळं आलबेल आहे ना? अजिबात काळजी करु नका, मी आहे!!

सदू : (हळहळून) हे सगळं आधी केलं असतंस तर? ही वेळच आली नसती!!

दादू : (खंतावून) ज्यांना आपलं मानलं होतं, ते गद्दार निघाले! ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनी केसानं गळा कापलान! होत्याचं नव्हतं झालं! माझं काय चुकलं?

सदू : (आणखी थंडपणाने) कशाला इतका मनस्ताप करुन घेतोस, दादूराया! जाऊ दे, झालं ते होऊन गेलं! उगीच पळत्याच्या मागे धावू नये!!

दादू : (‘अँग्री यंग मॅन’च्या अवतारात) वाघ नेहमी पळत्याच्याच मागे धावतो हे विसरु नकोस!! डिस्कवरी च्यानल बघ जरा!!

सदू : (समजूत घालत) ते जाऊ दे! झालं गेलं विसर! पुन्हा नव्यानं कामाला लाग! जमेल तुला…बहुतेक!

दादू : (चुटपुटत) …जमेल ना रे? असं काही भयंकर घडेल असं वाटलंच नव्हतं!

सदू : (सलगीच्या सुरात) तरी मी तुला सांगत होतो- माणसानं कसं रिलायबल असावं! तुझं म्हंजे बोलायचं एक, आणि करायचं दुसरंच! अशानं माणसं विश्वास कशी ठेवणार?

दादू : आहे रे मी रिलायबल! मी कधीही खोटं बोलत नाही!

सदू : (स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग…) माझा नाही विश्वास!

दादू : (शहाजोगपणाने) मी एक सरळमार्गी, साधा माणूस आहे! माणसाने शब्द देऊ नये, दिला तर पाळावा असं माझं मत आहे!

सदू : (संयम ठेवत) यावर तरी कसा विश्वास ठेवावा?

दादू : (दुर्लक्ष करत)…तरीही तू माझ्याबद्दल बोलताना ‘विश्वास ठेवण्याजोगा माणूस नाही’ असं का म्हणालास? मला खूप वाईट वाटलं!

सदू : (थंडपणाने) माणूस अनुभवातून शिकतो दादूराया!

दादू : (जवळीक दाखवत) आपल्या दोघांचीही सिच्युएशन सारखीच आहे सदूराया! तुलाही नव्यानं सुरवात करायची आहे, मलाही!

सदू : (सावध होत) मी ऑलरेडी केली आहे सुरवात!

दादू : (चतुराईने) ऐक! त्या कमळवाल्यांच्या नादाला अजिबात लागू नकोस! अतिशय बेकार लोक आहेत ते! अनुभवाचे बोल सांगतोय, विश्वास ठेव!

सदू : (बर्फाळ आवाजात) तोच तर प्रॉब्लेम आहे!

दादू : (आणखी एक तिढा टाकत) या निमित्तानं आपण दोघांनी एकमेकांना टाळी दिली तर काय मज्जा येईल!...विचार करुन बघ!!

सदू : (सर्द होत) गेल्या वेळेसारखी?

दादू : (मखलाशी करत) तूच म्हणाला होतास ना, झालं गेलं विसर म्हणून? मग विसर की ते! जय महाराष्ट्र!!

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 26th July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top