ढिंग टांग : रुधिर ओहळाचे रहस्य! (...एक सुरस गुप्तहेरकथा!) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

‘माफिया सरकार तुरुंगात जाणारच! तोवर मी स्वस्थ बसणार नाही!,’ सुप्रसिद्ध गुप्तहेर कॅप्टन किरीट स्वत:शीच मुस्करले.

ढिंग टांग : रुधिर ओहळाचे रहस्य! (...एक सुरस गुप्तहेरकथा!)

‘माफिया सरकार तुरुंगात जाणारच! तोवर मी स्वस्थ बसणार नाही!,’ सुप्रसिद्ध गुप्तहेर कॅप्टन किरीट स्वत:शीच मुस्करले. (खुलासा : गुप्तहेर कथांमध्ये हा शब्द आम्ही वाचला आहे. ‘मुस्कुराना’ या हिंदी शब्दावरुन मुस्करणे आले असणार.) त्यांच्या चेहऱ्यावर निर्धार दिसत होता. छताकडे एकटक नजर लावून ते विचार करत बसले होते. छतावर टीव्हीच्या एकूण चौदा पडद्यांवर ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज दिसत होते. एका कॅमेऱ्यात त्यांना संशयास्पद हालचाल दिसली की लागलीच ते टेबलावरला हॉटलाइन फोन उचलून सूचना देत. ही हॉटलाइन थेट ईडी, सीबीआय, सीआयए, एमाय-फाइव्ह, मोसाद, आयबी आणि बीजेपी एचक्यू येथे थेट जोडण्यात आली होती.

कॅप्टन किरीट मोबाइल फोन वापरत नाहीत. त्यावर नंबर डिस्प्ले होतो. तो बघून लोक फोन उचलत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे. गुप्तहेर कॅप्टन किरीट यांच्या डाव्या बुटात आणि चष्म्याच्या फ्रेममध्ये छुपा कॅमेरा होता, आणि सदऱ्याच्या खिशात पेन होते. ते पेन उघडताक्षणी त्यातून दाढीचे ब्लेड बाहेर येत असे. बाहेरगावी मुक्कामाची वेळ आली तर कॅप्टन किरीट गरम पाण्याची वाटी मागवून याच पेनचा उपयोग करीत.

सरकारच्या भ्रष्टाचाराच्या अनेक भानगडी त्यांनी आजवर बाहेर काढल्या होत्या आणि काही लोकांना तुरुंगात पाठवण्याची तजवीज केली होती. म्हणूनच काही शत्रूंनी त्यांच्यावर मध्यंतरी ऐन पोलिस ठाण्याच्या आवारात प्राणघातक हल्ला केला. पण कॅप्टन किरीट हा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हे. हल्लेखोरांनी फेकलेले सात अणुबॉम्ब त्यांनी झेलून तात्काळ डिफ्यूज केले, झाडलेल्या साडेतीनशे गोळ्या हातातल्या फायलीची ढाल करुन रोखल्या. इतकेच नव्हे, तर बॅडमिंटनच्या रॅकेटीने फूल उडवतात, तसे दोन डझन हातबॉम्ब हल्लेखोरांकडे परतवले. आपणच फेकलेले जिवंत बॉम्ब परत आलेले पाहून हल्लेखोरांची तिथल्या तिथे अशी काही हबेलंडी उडाली की ज्याचे नाव ते! इतका जबरदस्त हल्ला होऊनही कॅप्टन किरीट यांना एवढेसे फक्त खरचटले. कारण त्यांच्या खिशातील ते पेन! त्याचे टोपण ऐनवेळेला उघडले गेले नसते, तर तेवढेही खरचटले नसते.

माफियाने आपल्याविरुद्ध मोहीम उघडली असून पावलोपावली त्यांचे ठग मागावर आहेत, पण जनहितासाठी माफियाशी वैर घेण्याची हिंमत फक्त आपल्यातच आहे, याची त्यांना जाणीव होती.

...तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि सीसीटीव्हीत त्यांना आमची छबी दिसू लागली. होय, आम्ही कॅप्टन किरीट यांचे जुने क्लायंट आहो! टेबलाखालचे एक बटण दाबून कॅ. किरीट यांनी दार उघडले. आम्ही त्यांच्याकडे बघून गारठलो. गालावर लाल ओघळ स्पष्ट दिसत होता. ते पाहून आम्हाला भोवळ आल्यागत झाले. आम्ही कोसळत असतानाच कॅ. किरीट यांनी मेजाखालचे दुसरे बटण दाबून एक खुर्ची चपळाईने आमच्या खाली सरकवल्याने वाचलो!

‘बापरे, केवढा भयंकर हा घाव?’ आम्ही म्हणालो. त्यावर कॅ. किरीट यांनी देशभक्त करतात, तसा चेहरा करुन ‘‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे गुणगुणायला सुरवात केली. ते ऐकून आम्हाला पुन्हा भोवळ येत होती, पण-

‘खार पोलिस ठाण्याच्या आवारातला हा हल्ला महाग पडेल माफियाला!’ कॅ. किरीट बर्फाळ आवाजात म्हणाले.

समोरच्या टीव्हीवर बीबीसी वाहिनीवरील निवेदिका युक्रेनमधल्या खार(कीव) मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्याची बातमी गंभीर सुरात देत होती. आम्ही घाबरुन डोळेच मिटले.

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 28th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top