ढिंग टांग : ‘झेपा’टलेले…! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

नेमकी तीथ सांगावयाची तर ती चैत्र शुद्ध पंचमी होती. टळटळीत संध्याकाळ होती. मुंबईत संध्याकाळही टळटळीत असते त्याला काय करावे? ‘शिवतीर्था’वर गजबज होती.

ढिंग टांग : ‘झेपा’टलेले…!

नेमकी तीथ सांगावयाची तर ती चैत्र शुद्ध पंचमी होती. टळटळीत संध्याकाळ होती. मुंबईत संध्याकाळही टळटळीत असते त्याला काय करावे? ‘शिवतीर्था’वर गजबज होती. खुद्द राजे मोठी दौड मारुन पुण्यनगरीच्या मोहिमेवरोन नुकतेच परतले होते. गरम झालेली इंजिने थंड व्हावीत म्हणोन गाड्यांचे बॉनेट उघडे करोन तमाम पलटण आराम फर्मावत होती. तेवढ्यात घाईघाईने आलेल्या फर्जंदाने वर्दी दिली, ‘‘ दौलतीचे कारभारी कर्मवीर भाईसाहेब राजियांच्या पदकमलांच्या दर्शनासी येत आहेती. अनुज्ञेची वाट पाहातात!’

राजियांनी मानेनेच रुकार दिला. म्हणाले, ‘त्यांस घेवोन येणे.’

पांढऱ्याशुभ्र पोशाखातील कारभारी कर्मवीरांनी अंत:पुरात अदबीने आगमन केले. रीतसर मुजरा झडला. राजियांनी क्षेमकुशल विचारिले. म्हणाले, ‘किन्निमित्यें येणे केले?’

‘राजियांचा विजय असो! साहेबकामी चाकर नामजाद आहे, साहेबकृपेने सारे क्षेम आहे!’ कारभारी म्हणाले.

‘दौलतीचा हालहवाल सांगा, कारभारी!’ राजियांनी फर्मावले.

‘साहेबकृपेने चोर चोऱ्या करीत आहेत, चोरांस चोर म्हणणे मुश्किल जाहले आहे! दरोडेखोर भर दिवसा डाके टाकत आहेत! जो उठतो तो तोंडाला येईल ते बरळतो आहे, सर्वत्र बजबजपुरी माजली असून सारे काही आलबेल आहे, साहेब!’ कर्मवीरांनी अहवाल दिला.

‘सगळं काही उपकारभाऱ्यांच्या हाती देऊन तुम्ही गावोगाव हिंडता आहात, असं कळलंय आम्हाला! म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो, हे ध्यानी असो द्यावे!’ राजियांनी पोक्त सलामशवरा दिला.

‘भोंग्यांचं मार्गी लावतोय, साहेब! काळजी नसावी,’ कारभाऱ्यांनी राजियांच्या आवडत्या विषयाकडे गाडी वळवली. भोंगे म्हटले की राजेसाहेबांची कळी खुलते, हे त्यांनी पाहून ठेवले होते…

‘हं…धनुष्यबाण पेलवतो आहे ना? झेपेल तेवढीच झेप घ्यावी, माणसानं,’ अचानक राजियांनी पुशिले.

‘प्रयत्न चालू आहे, साहेब!’ कर्मवीर सावधपणाने म्हणाले.

‘रोज हजार जोर-बैठका काढा! तीन शेर दूध, बारा अंडी, एक कोंबडी आणि अधून मधून बदामपिस्त्याचा खुराक चालू ठेवा! जमेल एक दिवस...,’ राजियांनी शारीरिक सल्ला दिला.

‘बदामपिस्त्यांचा काही प्रॉब्लेम नाही! खोकेच आणून ठेवलेत!!’ कर्मवीरांनी उत्साहात माहिती दिली.

‘धनुष्यबाण पेलणं काही जोक नाही! भले भले उताणे पडले!!’ राजियांनी पुन्हा बजावले. ‘‘वेटलिफ्टिंगचा सरावदेखील चालू केला आहे, साहेब! पण-’’ कर्मवीर संकोचून म्हणाले.

‘पण काय कारभारी! बेलाशक सांगा, तुम्हांस तूर्त अभय आहे,’ राजियांनी आश्वासिले.

धनुष्यबाण आम्हाला झेपेल की नाही हे काळच ठरवील! जे अन्य कुणास झेपले नाही, ते आम्हांपास यावे, हा नियतीचा संकेतच असावा! या कामी आपण मजला कोचिंग करावं, ऐसी विज्ञापना आहे...,’ कारभारी विनम्रपणे म्हणाले.

राजे अंतर्मुख जाहले. धनुष्यबाण उचलण्याचा यत्न करणारे कित्येक जमीनदोस्त जाहले. ते का एवढे सोपे आहे?

‘करु! पण येवढे करुनही तुम्ही धनुष्यबाणासह सफई उताणे पडलात, तर आम्हांस बोल लावो नका!,’ राजियांनी सशर्त प्रस्ताव मान्य केला.

‘तुमची साथ असेल तर मी धनुष्यबाण काय, काहीही उचलायला तयार आहे,’ कारभारी कर्मवीर दुर्दम्य आत्मविश्वासाने म्हणाले. एवढा अतिरिक्त आत्मविश्वास या गृहस्थात आला कोठून? असा सवाल राजियांच्या मनीं उभा राहिला…

‘एवढे करुन नाहीच पेलवला, धनुष्यबाण तर?...तर काय कराल?’ राजियांनी काळजीपोटी विचारणा केली.

‘सेफ साइड म्हणून मी ऑलरेडी कमळ उचललंय, साहेब! कमळ सेफ असतं, हलकं आणि गॅरेंटीड…तुम्हीही तेच करा, साहेब,! झेपेल तेवढीच झेप घ्यावी…काय?,’ कर्मवीर कारभाऱ्यांनी मसलत सांगितली.

…आपल्यालाच खरी कोचिंगची गरज आहे, हे लक्षात येवोन राजे पुन्हा एकदा अंतर्मुख जाहले.