ढिंग टांग : अब पीके क्या करेंगे...!

बेटा : (नेहमीप्रमाणे दमदार एण्ट्री घेत) ढॅणटढॅण! मम्मा, आयम बॅक!
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

बेटा : (नेहमीप्रमाणे दमदार एण्ट्री घेत) ढॅणटढॅण! मम्मा, आयम बॅक!

बेटा : (नेहमीप्रमाणे दमदार एण्ट्री घेत) ढॅणटढॅण! मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावून सुस्कारा सोडत) हंऽऽ...!

बेटा : (फिल्मी ढंगात) इतनी उदास क्यूं बैठी हो...मांऽऽ...?

मम्मामॅडम : (डोळे मिटून मान हलवत) काही नाही...असंच!

बेटा : (काळजीपोटी) यह क्या हाल बना रख्खा है, कुछ लेती क्यूं नहीं! ये कौन कंबख्त तुम्हें सरदर्द दे रहा है...?

मम्मामॅडम : (खिडकीतून डोकावून बघत उदासपणे) ते येणार नाहीत! येणार नाहीत ते! ते नाही येणार!

बेटा : (फिल्मी अंदाज न सोडता) किसका इंतजार कर रही हो माँ? कोण येणार होतं? कुणाची इतकी चातकासारखी वाट बघणं चाललं आहे? कोई मुझे कुछ बतायेगा?

मम्मामॅडम : (जड अंत:करणानं) पीके...अब वो नहीं आयेंगे!

बेटा : (टाळी वाजवत) हात्तिच्या! त्या ‘इलेक्शन एक्सपर्ट नंबर टू’ ऊर्फ पीकेची वाट पाहताय होय! मला विचारलं असतं तर मी केव्हाच सांगितलं असतं की ते येणार नाहीत! ते येण्यापेक्षा न येण्यासाठीच जास्त प्रसिद्ध आहेत! हाहा!!

मम्मामॅडम : (च्याट पडत) इलेक्शन एक्सपर्ट नं. २? मग नंबर एक कोण आहे?

बेटा : (गालातल्या गालात हसत) अर्थात मीच!

मम्मामॅडम : (स्वप्नाळूपणे) त्यांनी किती छानदार काँग्रेसच्या विजयाचा फार्म्युला दिला होता, मी फार खुश झाले होते! पण आता त्यांनी चिठ्ठी पाठवलीये...ही बघ!

बेटा : (अनिच्छेने विचारत) काय म्हणतायत आमचे मित्र पीके?

मम्मामॅडम : (चिठ्ठी वाचत) प्रिय महामॅडम, आपल्या सूचनेनुसार स्वत:मध्ये बदल करण्याचा खूप प्रयत्न केला! परंतु, मला तद्दन काँग्रेसी होणं अशक्य आहे! सकाळी उठून पक्षकार्याच्या नावाखाली ट्विट करणं आणि नंतर दिवसभर गप्पाटप्पा, मोदी सरकारवर उगीचच शेरेबाजी एवढं करुन रात्री विजयाची स्वप्नं बघत राहाणं माझ्यासाठी खूप कठीण आहे! सबब मी पक्षात प्रवेश करु शकत नाही. तसदीबद्दल क्षमस्व. आपला पीके...!

बेटा : (खुशीत गाणं गुणगुणत) जब दिल ही टूट गयाऽऽ...जब दिल ही टूट गयाऽऽ...अब पीके क्याऽऽ करेंगे...अब पीके क्याआआआ करेंगे...जब दिल ही टूट गया...!

मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालत) पक्षाला वाचवण्यासाठी मी इतकी धडपडतेय! आणि तुम्ही गाणी कसली म्हणताय?

बेटा : (खांदे उडवत) मला तर वाटतं, की हे पीके गृहस्थ त्या कमळवाल्यांनीच पाठवलेला जासूस असावेत! त्यांनी पक्षात सुचवलेले बदल म्हणजे आपल्या कुटुंबाला पक्षाबाहेर काढण्याचा मार्ग वाटतो!! आय विल नेव्हर अग्री विथ हिम!

मम्मामॅडम : (कडवटपणाने) आपलंच चुकलं! वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्यालाच ‘बोहोल्यावर उभं राहाता का?’ असं विचारण्यासारखा प्रकार झाला!!

बेटा : (कोरडेपणाने) मुळात असल्या मंडळात नाव नोंदवणंच चुकलं! आपल्याला गरजच नाहीए पीकेंची! उलट त्यांनाच आपली गरज असेल!! माझ्यासारखा नेता असताना, असल्या पीके-बीकेंची काय गरज आहे?

मम्मामॅडम : (आशाळभूतपणे) खरंच होईल ना रे सगळं नीट?

बेटा : (आत्मविश्वासाने) पुढल्या इलेक्शननंतर खुद्द पीकेच माझ्याकडे व्यावसायिक सल्ला घ्यायला येतील! विचारतील- ‘तुमच्या विजयाचा फार्म्युला काय हो?’ दे टाळी!!

मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसून) ...लो आ गयी उन्ही की याद, वो नहीं आये...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com