ढिंग टांग : दिल्लीचे दुखणे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing tang

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले सत्तावीस दिवस झाले, जे काही घडते आहे ते आपल्या मनासारखे घडते आहे की मनाविरुद्ध हेच कळेनासे झाले आहे.

ढिंग टांग : दिल्लीचे दुखणे!

आजची तिथी : श्रीशके १९४४ आषाढ दीप अमावस्या.

आजचा वार : नमोवार याने की गुरुवार!

आजचा सुविचार : मेरी दिल्ली, मुझसे म्यांव!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले सत्तावीस दिवस झाले, जे काही घडते आहे ते आपल्या मनासारखे घडते आहे की मनाविरुद्ध हेच कळेनासे झाले आहे. ‘मी पुन्हा येईन’ असे मी खरेच बोललो की स्वप्नात हेही कळेनासे झाले आहे. स्वप्नात बोललो असेन, तर स्वप्न खरे ठरले आहे, आणि खरेच बोललो असलो तर...जाऊ दे. डोक्यात सगळा गुंता झाला आहे.

माझी दिल्लीत चांगली वट आहे, असा आमच्या पक्षात समज आहे, आणि तो मी आजवर तसाच राहू दिला आहे. गुरुवर्य नमोजी मुंबई-पुण्यात आले की सलगीने हाक मारतात. मा. मोटाभाईदेखील जवळ बोलावून कानात काहीतरी बोलतात, हे साऱ्यांनी पाहिले आहे. दिल्लीत गेलो तरी कुठल्याही घरी मी कुठल्याही वेळेला जाऊन धडकू शकतो, असा माझा लौकिक आहे. आमचे नवेकोरे धाडशी आणि क्रांतीवीर मित्र मा. नाथभाई यांना घेऊन मधल्या काळात मी दोन-चार वेळा दिल्लीला गेलो होतो. तेथे त्यांनी माझी वट पाहिली, आणि सगळा घोटाळा झाला...!!

...हल्ली सगळे उलटे घटते आहे. माझ्यापेक्षा आमचे क्रांतिवीर मित्रच जास्त वेळा दिल्लीला जातात. यांचे दिल्लीत इतके काम तरी काय असते? हा प्रश्न मला पडतो. बघावे तेव्हा आपले गृहस्थ दिल्लीला निघण्याच्या तयारीत. सुरवातीला मला वाटले की, नव्याची नवलाई आहे, होईल कमी! पण आज सत्तावीस दिवस झाले!

मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. तो कधी करायचा? असे क्रांतिवीरांना विचारले तर म्हणतात, ‘मी दिल्लीला जाऊन येतो...मग लगेच करुन टाकू!’ परवा आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहज बसलो असताना, फोन वाजला. दिल्लीहून होता. थेट कमळाध्यक्ष नड्डाजी होते. ‘शतप्रतिशत प्रणाम, नड्डाजी! बोलिए क्या आज्ञा है?’ मी विनम्रपणाने म्हणालो.

‘बाजू में अपने नाथभाईजी बैठे है, उनको फोन दिजिए, उनका फोन लगता नहीं!’ नड्डाजी पलिकडून म्हणाले. मी निमूटपणे फोन क्रांतीवीरांकडे दिला. ते नंतर अर्धा तास हळू आवाजात बोलत होते. फोन ठेवून मला म्हणाले, ‘मी संध्याकाळी दिल्लीला जातोय! तुम्ही इथलं सांभाळा!!’ नंतर एकदा माननीय मोटाभाईंना फोनवरुन विचारले की, ‘भेटायला कधी येऊ?’ तर थोडा वेळ विचार करुन म्हणाले की, ‘नाथभाईने पूछीने बताऊं छुं!’ हे असेच चालू आहे!

हल्ली क्रांतिवीर दिल्लीला पळतात, आणि मी मात्र मुंबई-नागपूर करत बसतो, हे माझ्या लक्षात यायला लागले आहे. हे काय गौडबंगाल आहे? मलाच कळेनासे झाले आहे. ‘सारखे सारखे दिल्लीला का जाता?’ असे थेट त्यांना विचारावेसे वाटते. पण धीर होत नाही. तरीही त्यांना आडून आडून हिंट देत असतो. ते दाद देत नाहीत. मी कलाकार माणूस आहे, असे ते भर सभागृहात म्हणाले. पण प्रत्यक्षात तेच सर्वात मोठे कलाकार आहेत, असे आता वाटू लागले आहे.

नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात असेल, असे वाटले होते. पण घडले भलतेच! मलाही दिल्लीचे दौरे वाढवावे लागतील, असे दिसते. बघू या!

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 29th July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..