ढिंग टांग : व्याख्यानाची तयारी...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

डिअर मम्मामॅडम, परवा लंडनमध्ये सुखरुप पोचलो. पत्रासोबत माझा फोटो पाठवत आहे. कसा वाटतो ते कळवावे. इथे आलो, तेव्हा विमानतळावर कोणीही मला ओळखले नाही.

ढिंग टांग : व्याख्यानाची तयारी...!

डिअर मम्मामॅडम, परवा लंडनमध्ये सुखरुप पोचलो. पत्रासोबत माझा फोटो पाठवत आहे. कसा वाटतो ते कळवावे. इथे आलो, तेव्हा विमानतळावर कोणीही मला ओळखले नाही. लंडन विमानतळावरही नाही. एक-दोघे तर चक्क पाया पडून गेले. मी त्यांना म्हटले की, ‘मेरे भाईयों, पैर मत छूना…जो तुम्हे दिख रहा है, वो मैं नहीं हूं!’ माझे बोलणे ऐकून ते इतके भारावले, आणि पुन्हा एकदा पाया पडले! काय बोलणार? तेथील इमिग्रेशनचा अधिकारी माझ्याकडे संशयाने पाहू लागला. बराच वेळ निरखल्यानंतर म्हणाला, ‘अहो, मिस्टर, पाठमोरे काय उभे राहता? समोर चेहरा दाखवा, फोटो कसा ओळखणार?’ मी हसून म्हणालो, ‘मेरे भाई, मी तुमच्या सन्मुखच उभा आहे, पाठमोरा नाही!’ मी हसल्यावर त्याला ओळख पटली आणि तो ओशाळला. ही सारी दाढीची किमया!

केंब्रिज विद्यापीठात मी व्याख्यान देण्यासाठी आलो आहे, हे तुम्हा लोकांना माहीत आहेच. ‘लर्निंग टु लिसन इन ट्वेंटीफर्स्ट सेंचरी’ (पक्षी : एकविसाव्या शतकातील श्रवणाचे अध्ययन) असा दाढीइतकाच घनदाट विषय आहे. व्याख्यानासाठी माझी तयारी जोरात सुरु आहे. एकविसाव्या शतकातील तरुण पिढीच्या अपेक्षा-आकांक्षा यावर मी शक्यतो बोलणार आहे. वाढवलेली दाढी कमी करावी, अशी नव्या शतकाची अपेक्षा मला दिसली. म्हणून मी शेवटी इथल्या सलूनमध्ये गेलो. तिथे मला विलक्षण अनुभव आला, तो मी इथे सांगणार आहे…

केशकर्तनालयातील फिरंगी कारागीराला (माझ्याकडे पाहिल्यानंतर) कुठून सुरवात करावी हे कळेना! बराच वेळ संभ्रमात पडल्यानंतर त्याने शेवटी आवंढा गिळून विचारले, ‘नेमके काय करायचे आहे?’ मी म्हणालो, ‘दाढी!’ त्याने काही न बोलता (माझ्या) गळ्याभोवतालचा छोटा टावेल काढून बराच मोठ्ठा टावेल आणून गुंडाळला! ‘नाही म्हणता म्हणता बरीच वाढली...,’ तो म्हणाला.

‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्तानं जवळपास वर्षभर मी चालत होतो. कन्याकुमारी टु काश्मीर चाललो!’ मी अभिमानाने उत्तर दिले.

‘चालल्यामुळे माणसाची दाढी वाढते? सरप्राइजिंग!,’ तो गंभीरपणे म्हणाला. एका हातात कात्री, आणि दुसऱ्या हातात कंगवा घेऊन (जीभ किंचित बाहेर काढून) तो कामाला लागला. त्याची एकाग्रता वाखाणण्याजोगी होती.

…पाहता पाहता पर्यावरणाचे हरित कवच उद्धवस्त होऊन वैराण प्रदेश दिसू लागावा, तसे मुखमंडल दिसू लागले. तथापि, सगळेच रान नष्ट न करता काही प्रमाणात हिरवळ शाबूत ठेवावी, असे त्याचे मत पडले. हे मत देण्यापूर्वी तो पाच-दहा फूट मागे जाऊन एखादे शिल्प न्याहाळावे, तसा मला न्याहाळत होता. दोन्ही हातांची बोटे उंचावून त्याने काल्पनिक फोटो फ्रेममधून मला पाहिले. तेवढ्यात नेहमी होते तेच घडले. माझा डोळा लागला….

…जाग आली तेव्हा समोर एक तरुण, राजबिंडा युवक माझ्याकडे बघून मधुर हसत होता. या देखण्या तरुणाला कुठेतरी पाहिले आहे, असे वाटू लागले. बहुधा राजघराण्यातला असावा! मी त्याला हसून ‘हाय’ म्हटले. त्यानेही म्हटले. मी त्याला ‘हौडुयुडु’ म्हटले. त्यानेही म्हटले. छान ट्रिम केलेली दाढी, डोईवरचे केसही व्यवस्थित! त्या दाढीतूनही त्याच्या गालावरची गोड खळी लपत नव्हती. याच्याशी मैत्री केली पाहिजे असे वाटून गेले. मी त्याला (संसदेत मारतात,) तस्सा डोळा मारला!

तेवढ्यात कारागीराने तोंडावर फवारा मारुन मला पुरती जाग आणली, तेव्हा लक्षात आले की तो आरसा होता, आणि आरशात मीच होतो.

…बाकी व्याख्यानाची तयारी पूर्ण झाली आहे. काळजी नसावी. तुझाच बेटा.