
मा. (पक्षी : माजी) परममित्र उधोजीसाहेब यांसी, फारा दिवसात आपली गाठभेट नाही. आठवण रोजच येते. फोन करावासा वाटतो. हल्ली तुमचे बंधू (पक्षी : शिवाजीपार्क शाखा) आमच्या संपर्कात थोडे थोडे असतात.
ढिंग टांग : हे बाण टोमण्यांचे..!
मा. (पक्षी : माजी) परममित्र उधोजीसाहेब यांसी, फारा दिवसात आपली गाठभेट नाही. आठवण रोजच येते. फोन करावासा वाटतो. हल्ली तुमचे बंधू (पक्षी : शिवाजीपार्क शाखा) आमच्या संपर्कात थोडे थोडे असतात. गुढीपाडव्याला त्यांनी व्हाटसपवरुन भोंग्याचे चित्र पाठवले. मी त्यांना थम्सपचे चिन्ह पाठवले! तेव्हापासून आमचे बरे चालले आहे… तुमचे शिवाजी पार्कवाले बंधू आधी आमच्याशी फार बोलायचे नाहीत. (आम्हीही त्यांना फार मनावर घ्यायचो नाही!) पण मध्यंतरी त्यांनी मुद्दाम घरी बोलावले. मस्त जेवू घातले. तेव्हाच आमच्यात ‘वेवलेंग्थ’ जुळली!! या वेवलेंग्थचा दिवसेंदिवस रहाटाचा दोर होऊ लागला आहे. वेळ आली की राजकारणाच्या विहिरीतून मतांचा उपसा करु, असा बेत आहे. बघूया कसे जमते ते!!
काहीही झाले तरी, तुम्ही माजी मित्र. एकेकाळी आपण दररोज बोलत होतो. आठ-पंधरा दिवसांनी का होईना, एकत्र जेवत होतो. (साबुदाणेवडे, बटाटेवडे वगैरे!) पण नंतर सारेच चित्र बदलले. मी रहात होतो, त्या ‘वर्षा’ बंगल्यात तुम्ही राह्यला आलात. (मी बोलावत होतो, तेव्हा आला नाहीत! नंतर येऊन मुक्काम केलात. असो.) हल्ली तुम्ही फार टोमणे मारता अशी तक्रार आहे. भाषणाला उभे राहिलात, की टोमण्यांची फैर सुरु होते. किती टोमणे मारायचे, काही लिमिट? तुमच्याकडे टोमण्यांचा अक्षयभाता आहे की काय? विशेषत: माझ्यावर टोमण्यांचा तुम्ही इतका वर्षाव करता की, टोमण्यांच्या शरपंजरी मी भीष्मासारखा पहुडलो आहे, असे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर तरळते.
टोमण्यांनी घायाळ होण्याचे दिवस आता सरले. एव्हाना मी चांगला टणक झालो आहे! तुमचे टोमण्यांचे बाण माझ्या अंगावर येऊन त्यांची टोके मोडतात, पण मला काहीही होत नाही. जमल्यास टोमण्यांना जरा अधिक टोक काढावे, किंवा त्यांचा रोख तरी बदलावा, ही विनंती. अधिक काय लिहू?
कळावे.
आपला. नानासाहेब फ.
ता. क. : ‘मी पुन्हा येईन’ या घोषवाक्यात ‘नक्की’ हा शब्द मी नुकताच ॲड केला आहे.
तुमच्या लक्षात आलं असेलच! नाना.
नाना- जय महाराष्ट्र. आपले संबंध अडीच वर्षांपूर्वी संपले! संपले!! संपले!!! पुन्हा जुन्या गोष्टी उकरुन काढण्याची गरज नाही. तुम्ही आमच्या घरी येऊन अनेकदा साबुदाणेवडा, बटाटेवडे वगैरे खाऊन गेलात, तेव्हा खरे तर हातावर (बडीशेपेसकट) बिल ठेवायला हवे होते. ते राहून गेले…ही तुमच्या भारतीय जळकू पार्टीची सवयच आहे. फुकट ते पौष्टिक! जाऊ दे.
आमच्या शिवाजी पार्कवाल्या बंधूराजांकडे जाऊन पुख्खा झोडून आलात. धन्य आहे! तुमचे बरेच नेते त्यांच्याकडे हल्ली जेवायला असतात, असे क़ळले. जेवा, जेवा! शेवचिवडा खा!! तुमची भारतीय जेवण पार्टीच आहे!! तुम्ही म्हणता, की आमची वेवलेंग्थ जुळली. मला तर वाटते ही शेवलेंग्थ आहे! मी तुम्हाला टोमणे मारत नाही, अपमान करत असतो. तुम्हाला अपमानही टोमणे किंवा विनोद वाटतात, हे आश्चर्य आहे. मी एक सद्गृहस्थ आणि कुटुंबवत्सल ( माझा महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे…माझे कुटुंब, माझी जबाबदारी!) मनुष्य आहे. मला तुमच्यासारखे खोटे बोलता येत नाही. माझ्या भात्यातले टोमण्यांचे बाण कधीही संपणार नाहीत. त्यांना आणखी टोंक काढणार आहे. घोडामैदान दूर नाही. होऊंजाऊ दे. जय महाराष्ट्र.
ता. क. : ‘मी पुन्हा नक्की येईन, आणि (पुन्हा) तोंडघशी पडेन’ असं घोषवाक्य करा!
Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 3rd May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..