ढिंग टांग : सब का विश्वास, सब का विज्ञान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

माणसाने नेहमी वैज्ञानिक दृष्टीनेच जगाकडे पाहायला हवे. ज्याने विज्ञानाची कांस धरिली, त्याचा बेडा पार झाला, हा मानवी इतिहास आहे.

ढिंग टांग : सब का विश्वास, सब का विज्ञान!

माणसाने नेहमी वैज्ञानिक दृष्टीनेच जगाकडे पाहायला हवे. ज्याने विज्ञानाची कांस धरिली, त्याचा बेडा पार झाला, हा मानवी इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टीच्या जोरावरच मानवाने गुहेपासून सुटका करुन घेतली. हल्ली काही मानव गुहेत जाऊन राहतात, पण ते वैज्ञानिक दृष्टी विस्तारलेल्या अवस्थेतच! आमचा उणे पावणेसहा नंबरचा चष्मा हा आमच्या वैज्ञानिक दृष्टीचा सबळ पुरावा आहे. त्यावरुन तरी आमचे व्यक्तिमत्त्व चाणाक्ष वाचकांना स्पष्ट दिसावे. ज्यांना धूसर दिसते त्यांनी चष्म्याच्या दुकानी जाऊन यावे.

सारांश हा की, सुदैवाने आमच्यापाशी वैज्ञानिक म्हणतात, ती दृष्टी जन्मजातच आहे. निसर्गाची देणगी म्हणायचे दुसरे काय? अर्भकवयापासूनच आम्ही सारे काही वैज्ञानिक दृष्टीनेच पाहात आलो आहो. म्हणूनच नागपूर येथील १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आम्हाला सामील करुन घेण्यात आले. आमच्या वैज्ञानिक दृष्टीचा देशवासीयांना प्रचंड फायदा होईल, आणि सावजी भोजनाची वैज्ञानिक दृष्टीने थोडीफार चिकित्सा करता येईल, अशा दुहेरी हेतूने आम्ही आयोजकांच्या विनंतीला मान देऊन नागपूर येथे गेलो.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रांगण वैज्ञानिकांनी फुलून गेले होते. तिथे उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोन सिध्द करणारे चष्मे होते. एका अवैज्ञानिक दिसणाऱ्या युवतीने हसून आमचे स्वागत केले. काही युवती संपर्क उपनेत्र (पक्षी : काँटॅक्ट लेन्स) परिधान करतात. त्यामुळे त्यांची वैज्ञानिक दृष्टी चटकन कळून येत नाही. पण वाचकहो, निरीक्षण हा वैज्ञानिक संशोधनाचा प्रमुख आधार असतो. आम्ही अचूक वळखले!

मांडवात हिंडताना आमच्या शेजारी शुभ्रधवल पोशाखातील एक व्यक्ती शोधक नजरेने बघत होती. चष्मा आणि दाढी पाहता, सदरील व्यक्ती अट्टल वैज्ञानिक असावी, असे वाटले. आम्ही अगत्याने विचारले, ‘‘काय शोधताय, डॉक्टर?’’ सदरील व्यक्ती किमान डॉक्टरेटवाली तरी असणारच, असा आमचा सरळसाधा वैज्ञानिक आडाखा होता.

‘आमचे फडणवीसनाना दिसले का कुठे? मघापासून शोधतोय...,’’ डॉक्टर म्हणाले. आम्ही निरखून पाहिले!

सदरील व्यक्तीला फडणवीसनानांचा शोध लावायचा होता, त्याअर्थी हे सुप्रसिध्द मानसतज्ज्ञ डॉ. कर्मवीर शिंदेसाहेबच असणार! आमचा आडाखा अगदीच शतप्रतिशत खरा ठरला.

डॉ. शिंदे यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला ठाऊक झाला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेचे (माजी) राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही आमच्याकडे त्यांची चौकशी केली होती, यात सारे काही आले!! डॉ. शिंदे पोस्टमार्टेमही शस्त्रक्रियेच्या गांभीर्याने करतात, असा त्यांचा लौकिक आहे. मध्यंतरी त्यांनी एका पेशंटाला विजेचे शॉक देऊन बरे केल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. डॉ. शिंदे यांचा दवाखाना ठाण्याला आहे. किंवा ठाण्यातील दवाखान्यात डॉ. शिंदे प्रॅक्टिस करतात, असे म्हटले तरी चालेल. त्यांच्या संशोधनाला साक्षात गुवाहाटीच्या कामाख्यदेवीचे पाठबळ आहे, असे म्हटले जाते. असो.

...इतक्यात हातात जाडजूड ग्रंथ घेऊन, - आम्ही संशोधक मंडळी घालतो- तसे जाकिट घालून डॉ. फडणवीसनाना आमच्यासमोर उभे राहिले. म्हणाले : ‘‘स्टार्टपमध्ये इंडिया पहिल्या तीनांत आहे, मिस्टर! आहात कुठं?’’ आम्ही तर्जनी-अंगठा जोडून ‘छान छान’ अशी खूण केली. एवढ्यात, समोरील पडद्यावर थोर शास्त्रज्ञ डॉ. नमोजी यांची मूर्त प्रकट झाली. साऱ्यांनी मनोभावे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना ‘एकसाथ नमस्ते’ केले. सध्या भारत विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड भराऱ्या मारत असल्याचे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले. त्यावरुन भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन (गेल्या आठेक वर्षात) काहीच्या काहीच वाढला आहे, असे आमच्या लक्षात आले. विलक्षण समाधान वाटले!