ढिंग टांग : दर्शनाचा लाभ घ्यावा…!

गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मी यंदा मोदक मर्यादित प्रमाणात खायचे ठरवले होते. पहिल्या दिवशी अतिरेक नको म्हणून फक्त बाराच मोदक खाल्ले.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मी यंदा मोदक मर्यादित प्रमाणात खायचे ठरवले होते. पहिल्या दिवशी अतिरेक नको म्हणून फक्त बाराच मोदक खाल्ले.

मा. मु. कर्मवीर भाईसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. गेले काही दिवस धकाधकीचे गेले. बाप्पाच्या आगमनामुळे आपल्या नव्या मंत्रिमंडळाचे वजन बऱ्यापैकी वाढणार, असे वाटू लागले आहे. आपल्या नव्या युतीचे आमदार आणि मंत्र्यांसाठी तुम्ही खास स्नेहभोजन मंगळवारी ठेवले होते. त्याचा परिणाम बुधवारी जाणवला. कुठलाही मंत्री आपापल्या कार्यालयाकडे फिरकलादेखील नाही! जेवण जड झाल्याचे कळते.

गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मी यंदा मोदक मर्यादित प्रमाणात खायचे ठरवले होते. पहिल्या दिवशी अतिरेक नको म्हणून फक्त बाराच मोदक खाल्ले. शेवटी आरोग्य सांभाळावेच लागते. एकदा मी निर्धार केला, की तो तडीस नेल्याशिवाय राहात नाही. ‘मी पुन्हा येईन’ असे मी तीन-तीनदा सांगत होतो. पण सगळे हसले! शेवटी मी निर्धाराने (पुन्हा) आलोच की नाही? नुसता आलो नाही तर तुम्हाला घेऊन आलो. असो. प्रत्येक निवडणूक ही शेवटची निवडणूक असल्यासारखे लढा, असा संदेश मी परवा आमच्या पक्षकार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांनी तो इतक्या लौकर अंगी बाणवला असेल, याची कल्पना मात्र आली नाही. तुमचे स्नेहभोजन अखेरचे असल्यासारखे सगळे जेवले!! काय बोलणार? परंतु, आता थोडे आवरते घ्यायला हवे. स्नेहभोजने, जेवणावळी, बाप्पाची दर्शने आवरती घेऊन कामाला लागले पाहिजे, हे सांगण्यासाठीच पत्र लिहित आहे. आपली नेहमी उभ्या उभ्याच भेट होते. बोलणे होत नाही. बाकी सर्व सुक्षेम. भेटीअंती बोलूच.

आपला (नवा) मित्र. नानासाहेब फ.

आमचे मित्र, मार्गदर्शक आणि गुरुवर्य कलावंत मा. नानासाहेब यांसी जय महाराष्ट्र. तुमचे पत्र मिळाले. गेल्या आठवड्याभरात गोड जरा जास्त खाल्ले गेले, हे कबूल करतो. एवढे गोड गुवाहाटीलाही खाल्ले नव्हते! गणेशोत्सवात रोज एकवीस गणपतींचे दर्शन घेण्याचा संकल्प मी सोडला आहे. दिवसभरात आपोआप तेवढे होतातच. प्रत्येक ठिकाणी प्रसाद म्हणून मोदक किंवा काही गोडधोड ठेवले जातेच. सकाळी निघून रात्री उशीरा घरी परतेपर्यंत पाय जड झालेले असतात.

गणेशोत्सव झाला की पितृपक्ष, त्यानंतर नवरात्र, आणि पाठोपाठ दसरा-दिवाळी येतेच आहे. या काळात किती स्नेहभोजने होणार कुणास ठाऊक. एकंदरीत मुख्यमंत्रीपद मानवणार अशी चिन्हे आत्ताच दिसू लागली आहेत.

आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसाठी आणि आमदारबंधूंसाठी मी स्नेहभोजन ठेवले होते. किती जण येतात, हे मला बघायचे होते. बहुतेक सगळे आले! सगळ्यांना उकडीचे मोदक खिलवले. आमचे एक मंत्री-आमदार तर ‘मोदक, लाडू, पेढे…सगळं ओक्केमध्ये आहे’ अशी पावतीच देऊन गेले. गोडधोड जास्त खाल्ले की कालांतराने जीभ सैलावते. जीभेला धार काढण्यासाठी लौकरच ‘वर्षा’ निवासस्थानी ‘मिसळ महोत्सव’ आयोजित करण्याचा माझा इरादा आहे. महाराष्ट्रातल्या उत्तम, झणझणीत मिसळी तेथे ठेवून मंत्री-आमदारबंधूंना बोलावीन, असे म्हणतो. बघू या कसे जमते ते!

कारभाराची काळजी अजिबात करु नका. मी दर्शनासाठी रोज एकवीस गणपतींना भेटी देत असलो तरी एकीकडे माझे काम सुरु असते. हे गतिमान सरकार आहे, ते थांबून चालणार नाही. तुमच्यासारखा अनुभवी, ज्येष्ठ आणि बुध्दिमान माणूस पाठीशी उभा असला तर कशाची काळजी करु? भेटीअंती बोलू. भेट भोजनोत्तरच होईल, याची खात्री देतो.

कळावे. आपला. कर्मवीर भाई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com