esakal | ढिंग टांग : पाळत : एक डेली रिपोर्ट..!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : पाळत : एक डेली रिपोर्ट..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मी, बबन फुलपगार, पो. ह. म. पो, बक्कल नं. १२१२, कदकाठी पाच फू. पाच इंच. उमर ४६, वजन ४६, छाती २६, फुगवून २६ जाहीर करीत आहे की ज्याअर्थी मी सध्या ‘पेशल पाळत ब्रांच’मध्ये पुनर्नियुक्त असून व अतिमहत्त्वाची व्यक्ती नामे अमजद खान यांच्यावर लक्ष ठेविण्याच्या सूचनांचे पालन करत आहे. ज्याअर्थी, सदरील अ. म. व्यक्तीवर पाळत ठेविण्याचे कर्तव्यावर असताना सरकारी कामकाजात अडथळा आणणेचे नियमबाह्य वर्तन काही संशयितांकडून झाल्याचे प्राथमिक चवकशीत निष्पन्न झाले आहे, त्याअर्थी अ. म. व्यक्ती नामे अमजद खान यांच्यावर पाळत ठेविण्यासंबंधी फोनद्वारे तोंडी आदेश देणेत आले होते, ते मागे घेणेत यावेत, ही विनंतीअर्जी करणेत येत आहे. सदरील तोंडी आदेशाची अंबलबजावणी करीत असतावेळी अ. म. व्यक्ती नामे अमजद खान यांनी जोरदार हरकत घेतली. त्याचा साद्यंत अहवाल खालीलप्रमाणे -

ता. २४ माहे मे रोजी अर्जदार (पक्षी : मीच!) यास एक फोन आला. अ. म. व्य. नामे अमजद खान यांचेवर चोवीस तास पाळत ठेवावी, असा हुकूम देणेत आला. अमजद खान या नावानेच मागे एकदा एक फोन टॅप झाला होता, हे मला आठवले. एकंदरित सदरील अमजद खान हे गृहस्थ भलतेच व्हीआयपी आणि वाँटेड असणार, हे मी वळखले. पाळत ठेवण्याचा हुकूम फोनवरुन देणारी व्यक्ती दिल्लीहून बोलत होती की मुंबईहून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तदनुसार, १० माहे जुलै सन २०२१ रोजी सकाळी साडेदहाचे सुमारास लोनावळा येथील एका कार्यक्रमात हजर राहणेसाठी व्यक्ती नामे अमजद खान हजर झाले असता काही संशयित कार्यकर्त्यांनी ‘नानाभौ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. सदरील व्यक्तीचे नाव अमजद खान असे असूनही कार्यकर्ते त्यांना ‘नानाभौ’ असे का म्हणत आहेत, हे मला कळेना! तथापि, साथरोग कायद्यान्वये लागू असलेल्या निर्बंधांमुळे एकत्र येऊन घोषणा देणेस मनाई असल्याचे विणम्रपणे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु, कार्यकर्ते दोनच होते! आम्ही दोघेच असल्याने संचारबंदीच्या कायद्याचे उल्लंघन होऊ शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर अमजद खान यांनी माझ्याकडे मूठ वळवून दाखवली.

कार्यकर्ता मेळावा सुरु झाल्यावर, मा. अमजद खान यांच्यापासून नैऋत्येला अदमाशे पंचावन कदमांवर उभे राहून मी आपले कर्तव्य बजावत होतो. त्यांनी मंचावरील खुर्चीत बसल्या बसल्या आपला डावा गुढघा तीनवेळा खाजवला. मी त्याची डायरीत नोंद केली. तेव्हा चौथ्यांदा त्यांनी शेजारी बसलेल्या अन्य एका पक्ष सहकाऱ्याचा (उजवा) गुढघा खाजवला, व त्याचे माझ्याकडे लक्ष वेधले. मेळावा काँग्रेसचा होता, त्यामुळे सामाजिक अंतर आपोआप पाळले जात होते. गर्दीच नव्हती! परंतु, मोजक्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना अमजद खान यांनी अचानक गौप्यस्फोट केला की ‘‘माझ्यावर पाळत ठेवली जात असून रोज डेली रिपोर्ट जातो’!’ (टिप : मी भाषणाचा व्हिडिओ फोनमध्ये रेकॉर्ड केला असून सर्व संबंधितांना ‘व्हाटसप’वर पाठवला आहे.) माझ्याकडे वळून म्हणाले, ‘मी कोण आहे माहीत आहे का?’ ‘हो साहेब,…अमजद खान!’ मी विणम्रपणे उत्तर दिले. त्यावर ते काही न बोलता खांदे पाडून ‘विपर्यास होतोय’ असे म्हणत, गाडीत बसून निघून गेले.

इति.

loading image