esakal | ढिंग टांग : कमळ, इंजिन आणि... कोळसा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : कमळ, इंजिन आणि... कोळसा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

वीकेण्ड लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे घरात अडकून पडलेला इतिहासपुरुष जाम कंटाळला होता. छे, या महाराष्ट्रात काहीही घडता घडत नाही. प्रयत्न केला, तरीही घडत नाही.- त्यात वीकेण्ड लॉकडाऊन! (खुलासा : इतिहासपुरुष पुण्यात राहातो, हे चाणाक्षांनी येथे ओळखले असेलच!) कंटाळा आला की कुणालाही येते, तशी इतिहास पुरुषाला पेंग आली. पेंगेचे रुपांतर झोपेत झाले, झोपेचे घोरण्यात झाले. तेवढ्यात कडाड्‍ काड कडकडकड असा जोरकस ध्वनी उमटून इतिहासपुरुष प्राणांतिक दचकला. काय जाहले? वीज कोसळली की धरणीकंप जाहला? आभाळ कोसळले की धरती दुभंगली? (खुलासा : इतिहासपुरुष कायम असल्या बखरटाइप भाषेतच लिहितो आणि बोलतो. जुनी खोड! बाकी काही नाही!!) त्याने अंत:चक्षुंनी पाहियले, धरणीकंपाचा केंद्रबिंदू मुंबईत दादरच्या शिवाजी पार्काडाच्या मुलखात होता. इतिहासपुरुष सावरुन बसला. हाती बोरु, टाक, दौत, कागद घेऊन जय्यत तयार बसला.

आता काही तरी घडणार खास!... कृष्णकुंजगडावर लगबग चाललेली दिसत होती. (खुलासा : इतिहासपुरुष पुण्यात असला तरी अंत:चक्षुंनी कुठलेही काहीही दिसते! पुण्याहून दादर असे किती लांब आहे?) डेक्कन क्वीनने अडीच तास!) दाराबाहेर मा. चंदूदादा कोल्हापूरकरांची गाडी लागली होती. बालेकिल्ल्यात मसलत सुरु होती. इतिहासपुरुषाने कान टवकारले. (खुलासा : अंत:चक्षुंनी लांबचे दिसते, पण अंत:कर्ण असला कुठला अवयव आमच्या ‘ऐकण्यात’ नाही! असो.) गडावरच्या खलबत खान्यात साक्षात मा. साहेबांची तेज:पुंज स्वारी शांतपणे बसलेली दिसत होती. त्यांच्या पुढ्यात मा. दादा अदबीने चष्मा पुसत बसले होते. उभयतांमधील पुढील संवाद येणेप्रमाणे. तो वाचकांना त्रोटक वाटेल. पण तसे नाही. तो संपूर्णच आहे.

साहेब : (रोखून बघत) झाला?

दादा : (बेसावधपणे) काय?

साहेब : (रोखून) चष्मा पुसून?

दादा : (ओशाळून) झाला!

साहेब : (गालावर बोट ठेवत) बोला!

दादा : (विषयाला हात घालत) नै…तुमच्या पक्षासोबत जायचं की नाही? याचा विचार पक्षात चालू आहे! परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आपले मतभेद आहेत हे खरं, पण बाकी चांगलंच आहे! तेवढी तुमची ती अट दूर केली तर….

साहेब : (खर्जात) तर काय?

दादा : (गडबडून) नै…म्हंजे आमच्या माननीय मोटाभाईंशी बोलून घेणार आहेच मी!

साहेब : (संशयानं) उघड्यावर बोला! बंद खोलीत नको!

दादा : (सावरुन घेत) ते आलंच…पण आमच्याच काहींना वाटतं की डब्बल इंजिनची काय गरज? उलट त्यांच्या…म्हंजे तुमच्या…इंजिनातला कोळसा सध्या संपलाय!

साहेब : (कडाडत) खामोश! आमचं इंजिन अस्मितेच्या इंधनावर चालतं…

दादा : (चपापून) नै…कल्पना अशी आहे की पुढली चाळीस वर्ष आपली युती टिकली तर महाराष्ट्राचा विकास धडाक्यात होईल! जागोजाग बागा, कारंजी, रस्ते, पूल…बहार उडवून देऊ! कमळ आणि इंजिन एकत्र आलं तर तीरकमठे, घड्याळं, हात सगळं फिकं पडेल, फिकं!!

साहेब : (विचारपूर्वक) बघू!

दादा : (उजळलेल्या सुरात) मग ठरलं?

साहेब : (थंडपणाने) काय?

दादा : (संकोचत) आपल्या आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक कमळ इंजिनाचं!

साहेब : (बर्फाळ आवाजात) तुम्ही आधी ठरवा! मी तोवर व्हिडिओ काढून ठेवतो!!

जय महाराष्ट्र!!

…इथं मसलत संपली! साहेब यंदा कुणाचे व्हिडिओ जमा करणार, हे न कळल्याने इतिहासपुरुष डोके खाजवत बसला आहे. इत्यलम.

loading image
go to top