esakal | हौस ऑफ बांबू  : मराठी साहित्यात जीवसृष्टी आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

maharathi-sahitya

नाशिकला मार्चमध्ये होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची बिनविरोध निवड करण्याचं चालल्याचा सुगावा मला लागला आहे.आता ही वैश्विक पातळीवरची घटना नाही का?

हौस ऑफ बांबू  : मराठी साहित्यात जीवसृष्टी आहे का?

sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

सध्या आकाश निरभ्र असत्ये. काळोख पडला की कधी एकदा गच्चीवर जाऊन तारांगण न्याहाळते असे होते. माझी खगोलशास्त्रातली गती आणि आवड बघून गेल्याच वर्षी बाविसाव्या वाढदिवसाला मला ‘कुणीतरी’ दुर्बीण भेट दिली. तेव्हापासून माझा एक डोळा त्या दुर्बिणीलाच चिकटलेला असतो. समोरच्या इमारतीतल्या कुटुंबांच्या घरचं सग्गळं दिसतं! सगळं म्हंजे अग्दी स-ग-ळं!! मानवी नागरी समाजाचा हा काप आणि त्यातील आशयद्रव्य साहित्यात उतरवता आला पाहिजे, या निखळ साहित्यिक भूमिकेतून मी तेथील समाजजीवन तटस्थपणे न्याहाळत असत्ये. असो. हे विषयांतर झाले. सारांश इतकाच की, सध्या दुर्बिणीच्या साह्यानं तारे बघायचा छंद जडला आहे. काही दिवसांपूर्वी गुरू-शनिची (की मंगळ आणि शुक्र?) जोडी दुर्बिणीतून पाहून मी ‘युरेका, युरेका’ असं ओरडले होत्ये. पण, ते ग्रहगोल नसून समोरच्या घरातले दिवे आहेत, हे मागाहून लक्षात आले. परवा मात्र सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना एका खळबळजनक  खगोलशास्त्रीय आणि वैश्विक घटनेचा शोध लागला, आणि मी पुन्हा ‘युरेका युरेका’ असं ओरडल्ये. (खुर्चीत बसल्या बसल्या हं! बाथटब नाहीए आमच्याकडे! पाणी दोन तास येत्ये! बाथटब कुठला? चहाटळ मेले!!) 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जरा कान इकडे करा. नाशिकला मार्चमध्ये होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची बिनविरोध निवड करण्याचं चालल्याचा सुगावा मला लागला आहे. आता ही वैश्विक पातळीवरची घटना नाही का? आमच्या नारळीकरसरांचं सगळंच वैश्विक असतं. पण, बातमी ऐकून इतका आनंद झाला, की विचारता सोय नाही! तीन-चार प्रकाशवर्षं दूर असलेल्या अल्फा सेंटारी ताऱ्याच्या सौरमालिकेतील एका ग्रहावर जीवसृष्टी असल्याचा पुरावा हाती लागल्यासारखंच झालं! याचा अर्थ मराठी साहित्यविश्वापलिकडेही जीवसृष्टी आहे, असाच होत नाही का?

डॉ. नारळीकरसरांच्या ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ची मी तर पारायणं केली आहेत. सर फ्रेड हॉइल आणि नारळीकरसरांनी आल्बर्ट आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाशी माखच्या तत्त्वाची सांगड घालून ‘कन्फॉर्मल थिअरी’ मांडली, त्यामुळे ‘बिग बॅंग’ थिअरीला प्रतिवाद करण्याची सोय झाली. (हे तर साऱ्याच मराठी साहित्यिकांना ठाऊक असतं. नाही का?) त्यांना ही नवी थिअरी मराठी साहित्यातील साठोत्तरी वळणामुळेच सुचली असणार, अशी दाट शंका मला आहे. पण, त्याबद्दल नंतर कधीतरी सविस्तरच लिहीन.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी साहित्यविश्वाचा प्रारंभ एका महास्फोटातून झाला, अशी माझी एक समजूत होती. पण, ती तितकीशी खरी नाही, हे मला नारळीकरसरांमुळे कळलं. (पुण्यात असून) त्यांच्या घरी कधी जाणं झालं नाही. नारळीकरसरांचं ठीक आहे, त्यांच्याशी कन्फॉर्मल ग्रॅव्हिटीबद्दल चर्चा करता येईल. पण, मंगलाताई खुंखार गणितज्ञ आहेत!! गणिताच्या बाईंशी माझं कसं जमणार? (या गणितामुळे मी नववीत तीनदा अडखळल्ये!!) जाऊ दे. तो विषयच ऑप्शनला टाकलेला बरा. बाकी, गणित आणि विज्ञान ऑप्शनला टाकल्याशिवाय मराठी साहित्यिक होताच येत नाही, अशी पारंपरिक समजूत आहे खरी!! असो. नाशकात होणारं नारळीकरसरांचं संभाव्य अध्यक्षीय भाषण मी आत्तापासूनच कल्पनेत ऐकू लागल्ये आहे. एकप्रकारची विज्ञान काल्पनिकाच ती!! मराठी साहित्य सीमा ओलांडून पुढे जाणार, याची खात्री होती; पण ते थेट सूर्यमालिका भेदूनच जाईल, असं मात्र वाटलं नव्हतं.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी सारस्वताच्या अंगणात सोन्याचा पिंपळ सळसळतो आहे. नारळीकरसरांच्या रूपानं त्याच्या शेजारी यंदा न्यूटनफेम सफरचंदाचं रोपटं लागेल! या सफरचंदाच्या झाडाखाली भविष्यातील मराठी साहित्यिक (हेल्मेट घालून) बसलेला दिसावा, हीच मनोमन इच्छा.

loading image
go to top