ढिंग टांग : मैदान आणि मुलुख मैदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग

ढिंग टांग : मैदान आणि मुलुख मैदान!

सदू : (फोन उचलत शहाजोगपणाने) …जय महाराष्ट्र! कोण बोलतंय?

दादू : (खोडकरपणाने) कुठं कोण बोलतंय अजून? हाहा! गंडलास ना? आमचे पेढे मिळाले का?

सदू : (सावध होत) कसले पेढे?

दादू : (विजयी सुरात) मैदानाचे!

सदू : (हिणवत) मैदान मिळालं म्हणून पेढे वाटतं का कुणी?

दादू : (छाती फुगवत) मैदान मिळवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच, असं मी म्हणालो होतो! माझा नैतिक विजय झाला!!

सदू : (बेरकीपणाने) अभिनंदन, बरं का दादूराया!

दादू : (चेंडू हुकवत) कशाबद्दल?

सदू : (ओठ आवळून हसू आवरत) कशाबद्दल काय विचारतोस? मैदान मारलंस म्हणून!!

दादू : (उजेड पडल्यागत) हां, हां…आत्ता नुसतंच मैदान मिळालंय, वेळ आली की मारुच! सोडणार नाही!!

सदू : (प्रबुद्धपणे) मैदानं गाजवून मतं मिळत नाहीत, दादूराया! माझ्याकडे बघ!! स्वानुभवाचे बोल आहेत!!

दादू : (त्वेषानं) मतंही मिळवीन! देखते रहना!! सोडणार नाही!!

सदू : (पिन मारल्यागत) मैदान मिळाल्यावर पेढे वाटलेस! मैदान मारल्यावर काय वाटणार आहेस?

दादू : (अभिमानानं) सोनं, वाटेन, सोनं!

सदू : (पंप मारत) शाब्बास! शोभतोस माझा भाऊ!...आता लगाव बत्ती! चालू कर तुझी मुलुखमैदान तोफ! उडव बार!

दादू : (खुश होत) थँक्यू, सदूराया! खरं तर, मैदान मारणं हे तुझं काम! तुझी मुलुखमैदान तोफ संपूर्ण

महाराष्ट्राला परिचित आहे! आमचा उगीच आपला आपटबार!

सदू : (खरं खरं बोलत) उगीच मानभावीपणा करु नकोस, दादूराया! शोभत नाही तुला!! हल्ली चांगलं भाषण करतोस तू सुद्धा!!

दादू : (हरखून) खरंच का सदूराया?

सदू : (प्रामाणिकपणाने) अगदी खरं! आता मैदान मिळालंय, त्याचं सोनं कर!!

दादू : (छाती फुगवून) माझ्या विचारांचं सोनं लुटायला तू येशील ना मैदानात?

सदू : (निर्विकारपणाने) मी मैदानाच्या बाजूलाच राहातो! तुझं भाषण मी घराच्या ग्यालरीतून ऐकेन! विचारांचं सोनं का काय म्हंटात, तेही बसल्या बसल्या लुटेन!!

दादू : (जीव भांड्यात पडत) मैदान मिळतंय की नाही, याचं टेन्शन होतं! पण मिळालं एकदाचं! आता बघतो एकेकाला!!

सदू : (कोड्यात टाकत) नसतं मिळालं तर काय करणार होतास?

दादू : (चवताळून) जगात काय फक़्त एकच मैदान आहे?

सदू : (चपळाईने विषय बदलत )…बाकी तुला मैदान मिळू नये म्हणून केवढी धावाधाव सुरु होती!

दादू : (संशयानं) कोणाची?

सदू : (टोमणा मारत) ते जाऊ दे! मैदानात उतरुन तू नेमकं काय करणार? टोमणेच मारणार ना?

दादू : (चतुराईने) त्यांच्या नाकावर टिच्चून मैदान मिळवणं हासुद्धा एक टोमणाच आहे बरं!! (दात- ओठ खात) असे टोमणे मारीन, अस्से टोमणे मारीन की मुलुखमैदान तोफेचे गोळे पर्वडले, असं वाटेल त्यांना!!

सदू : (दाद देत) आहेस खरा टोमणेबहाद्दर!!

दादू : (कौतुकानं) सद्या, मला आश्चर्य वाटतं, तू इतका मैदानवीर, पण तुला कधी मैदान मिळवण्यासाठी इतकी धावाधाव कशी करावी लागली नाही?

सदू : (सुस्कारा सोडत) यालाच म्हंटात नशीब! कुणाकडे मुलुखमैदान तोफ आहे, पण मैदान नाही! आणि कुणाकडे मैदान आहे, पण तोफ नाही!! चालायचंच!