
ढिंग टांग : न बोलणारे आणि…बोलून जाणारे!
प्रिय मित्र नानासाहेब यांस, खरं तर मी कुणाला पत्रबित्रं लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही. साधा मेसेज टाइप करुन पाठवणं जिवावर येतं. हिते कोण पत्र लिहायला बसलंय? पण आज अगदी नाइलाज झाला. तुमच्या शब्दाखातर मी सगळं सोडून महायुतीमध्ये सामील झालो. येऊ की नको येऊ? असं सारखं वाटत होतं.
पण मागून कोणीतरी धक्का दिला, आणि एकदाचा आलो! नंतर वळून पाहिलं तर धक्का मारणारे गृहस्थ आमचे प्रफुल्लभाईच होते. मग मी थोडा निर्धास्त झालो. पण माझं येणं तुमच्याकडल्या अनेकांना आवडलेलं नाही, हे हल्ली हल्ली माझ्या लक्षात येऊ लागलं आहे.
परवा पडळकर नावाचा तुमच्या पक्षाचा कुणीतरी माणूस काहीतरी बडबडला, असं मला कुणीतरी सांगितलं. मी मनावर घेतलं नाही. हल्ली असल्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत, असं मी ठरवूनच टाकलं आहे. पण पडळकर नावाची व्यक्ती बरंच काही बोलली असणार! कारण घरच्या लोकांनी दिवसभर मला टीव्ही बघू दिला नाही. हे काय चाललं आहे? असे किती दिवस चालणार?
तुमच्या लोकांना आवरा, हे सांगण्यासाठी ही चिठ्ठी लिहीत आहे. अन्यथा, आमची माणसंही काहीबाही बोलून जातील. ते तुमच्यावर येईल! मग मी जबाबदार नाही, याची नोंद घ्यावी.
कळावे. आपला. दादासाहेब बारामतीकर (सध्या : पुणे)
ता. क. : मी आता तुमच्या गोटात आहे, हे तुमच्याच पक्षातील लोकांना समजावून सांगत का नाही?
प्रिय मित्रवर्य दादासाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. तुमचे निवेदन मिळाले. तुम्ही चिठ्ठी लिहिली होती, ते कुणीतरी पत्र म्हणून आणून दिले, पण मी ते निवेदन म्हणून स्वीकारले! पडळकर या गृहस्थांना मी समज दिली आहे. काळजी नसावी! तुम्ही आमच्याकडे आलेला आहात, हे ते विसरुन गेले होते. त्या विस्मरणामुळेच असे घडले!!
पडळकरांच्या वक्तव्यामुळे घरच्यांनी तुम्हाला दिवसभर टीव्ही बघू दिला नाही, हे ऐकून थोडे बरेच वाटले! आमच्या घरच्यांनी तर दीड-दोन वर्षांपूर्वी भिंतीवरचा टीव्ही कायमचा हटवला. परंतु, त्यामुळे काही बिघडत नाही. टीव्हीवर तरी काय असते? सकाळी मॅटिनी शो पार पडतो, आणि दुपारनंतर सगळेच आपापल्या कार्यक्रमांना लागतात.
नेत्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, या मताचा मी आहे. मग तो नेता कुठल्याही पक्षाचा असो. मला तर किती नावे ठेवली गेली, ते आठवा! काही माजी पक्षाचे नेते (खुलासा : इथे पक्षच माजी झाला आहे, याची नोंद घ्यावी!) मला सारखे नको नको ते टोमणे मारत असतात.
त्यांच्या टोमण्यांचे बाण हल्ली मला लागतच नाहीत, हा मुद्दा वेगळा!! असल्या नेत्यांना तुम्ही सांभाळा, असे सुचवता. पण मी तरी कुठे कुठे लक्ष देऊ? आमच्या पक्षात येणारे जास्त, जाणारे कमी! न बोलणारे जास्त, आणि बोलणारेही जास्त!! वेडेवाकडे बोलणारी व्यक्ती दुसऱ्याच पक्षाची आहे, असे समजून दुर्लक्ष करायचे धोरण सध्या मी स्वीकारले आहे.
असल्या थिल्लर वाक्ताडनांकडे आपण लक्ष देऊ नये. आपले गतिमान सरकार आहे. जनहिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. आपण कामातून बोलू!
आपण तिघे जोवर एकमेकांची (पूर्वीसारखी) जाहीररीत्या उणीदुणी काढत नाही, तोवर सारे काही ठीक राहील. तेवढी काळजी घेत राहू! पुढल्या ‘शासन आपल्या दारी’च्या खेळात भेटूच.
कळावे. आपला. नानासाहेब फ.
ता. क. : मी समजावून थकलो! त्यांचा विश्वास बसत नाही, त्याला काय करु?