आजचा दिवस : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी.आजचा वार : नमोवार याने की गुरुवार.आजचा सुविचार : टिक टिक वाजते डोक्यात…धडधड वाढते ठोक्यात..!.नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) गेले रात्रभर डोळ्याला डोळा नाही. नाही, त्याचा आमचे रमीवाले सहकारी माणिकराव कोकाटेजी यांच्याशी काहीही संबंध नाही. तो विषय माझ्या दृष्टीने कधीच संपला. निकाल आला तेव्हा फक्त दोन शब्दांचं बोलणं बारामतीकरांशी झालं. मी विचारलं, ‘‘कधी?’’ ते म्हणाले, ‘‘हा काय आत्ताच पाठवला!’’ मी बरं म्हणून फोन ठेवला. विषय एण्ड!.डोळ्याला डोळा नाही. छातीत सतत धाकधुक होतेय. दर अर्ध्या तासाने उठून पाणी पीत रात्र काढली. आज १९ डिसेंबर! कराडच्या बाबाजींच्या भाकितानुसार आज दिल्लीत मोठी उलथापालथ होऊन मराठी माणूस पंतप्रधान होणार! बाबाजींनी केलेल्या भाकितानंतर लोक माझ्याशी थोड्या (जास्त) अदबीने बोलू लागले आहेत. मागल्या निवडणुकांपासून बाबाजींनी राजकारणाची लाइन सोडून ग्रहकुंडल्यांकडे लक्ष वळवले, हे मला माहीत होते. बिहार इलेक्शननंतर तर त्यांनी बहुधा राजकारणाचा नादच सोडून फुलटाइम ॲस्ट्रॉलॉजीकडे कॉन्सन्ट्रेट केल्याचं कानावर आलं. त्यांची आजवर फारशी भाकितं केली नाहीत. पण हल्ली ते ठामपणाने करु लागले आहेत..मध्यंतरी त्यांनी अमेरिकेत ‘एपस्टिन फाइल्स’ ओपन झाल्या की, भारतात भयंकर उत्पात घडणार असून पंतप्रधानच बदलेल, असे भविष्यकथन केले. संपूर्ण देश च्याटंच्याट पडला. मी स्वत: बराच वेळ सुन्न होऊन बसलो. तरी बरं नंतर मी एक-दोनदा दिल्लीलाही (गपचूप) जाऊन आलो. पण पू. नमोजीभाई आणि वं. मोटाभाई अगदी नॉर्मल वागले. आमचे परममित्र ठाण्याचे कर्मवीर भाईसाहेबही जाऊन आले. त्यांनी आल्यावर ‘ऑल इज वेल’ असाच रिपोर्ट दिला..बाबाजींच्या मते मराठी पंतप्रधान होणार असे असल्याने महाराष्ट्रात खळबळ उडणे साहजिक होते. मी भीत भीत माननीय गडकरीसाहेबांना फोन केला. पण त्यांना कसलीच चाहूल नव्हती. ते आपले सांबारवडी, भेळ, मूगडाळ भजी याच्यापलिकडे जाईनात! दिल्लीतल्या कारभाराचा विषय काढला तर ‘सव्वा दोन लाख कोटींची रस्त्याची कामं काढली आहेत’ वगैरे सांगू लागले. दीड लाख कोटी, सत्तर हजार कोटी, पंचेचाळीस हजार कोटी या आकड्यांशिवाय ते बोलतच नाहीत. मी फोन ठेवला!.मराठी पंतप्रधान होणे हे गेल्या शतकातही अशक्य ठरले, याही शतकात फारसे सोपे नाही. आणि ‘एआय’ची शपथ घेऊन सांगतो, पुढल्या शतकातही ते इंपॉसिबलच आहे. मराठी माणूस कितीही चाणक्य असला तरी तो फार फार तर ‘भावी पंतप्रधान’च होऊ शकतो, हा अनुभव प्रत्येक मराठी माणसाने घेतला आहे. मराठी माणसासाठी कायम ‘दिल्ली अभी दूर है’ हेच सत्य आहे. जाऊ दे. याबद्दल जितके कमी बोलावे तितके बरे!! ते स्वप्न बघण्याचे मराठी नेत्यांनी कधीच सोडून दिले आहे. पण त्यातल्या त्यात ‘पोटेन्शियल’ असलेला नेता म्हणून माझ्याकडेच बोट दाखवले गेले..परवा एक ज्येष्ठ नेते भेटले ते म्हणाले, ‘‘नवा कोट शिवायला टाका ताबडतोब!’’ मी कपाळाला हात लावला. ग्रहदशा बघून कराडच्या बाबाजींनी भाकित तर केले, पण हा शपथविधी असा आहे की ज्याची आमच्यापैकी (तरी) कुणीही वाट पाहात नाही. असे घडणार नाही, असे मन सांगते आहे, पण समजा घडलेच तर? त्यामुळेच तर टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात..! देवा, वाचीव रे बाबा!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.