ढिंग टांग : मुलाखतीचे महाभारत...!

बरं बरं! सॉरी!! मला वाटलं एखादी शाब्दिक कोटी कराल! आमचा बॉल वाया गेला!
lok sabha political campaign uddhav thackeray narendra modi politics
lok sabha political campaign uddhav thackeray narendra modi politicsSakal

सालाबादप्रमाणे आम्ही एकदा तरी आमच्या साहेबांची म्यारेथॉन मुलाखत घेतो. साहेबांची मुलाखत ही म्यारेथॉनच असावी लागते. कां की संक्षिप्त मुलाखत त्यांना देताच येत नाही. मुलाखत नेहमीप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

साहेब नुकतेच कोकण दौऱ्यावरुन परतले होते. (तरीही) त्यांचा मूड चांगला होता. म्यारेथॉन मुलाखत जागेअभावी प्रसिद्ध करता येणार नाही. जगातील कागदाची सगळी रिमे संपतील, पण म्यारेथॉन मुलाखत छापणे अशक्य. तेव्हा त्याचा संक्षिप्त भाग येथे देत आहो :

आम्ही : (पहिला बॉल देवाला...) सध्या क्या चल रहा है!

साहेब : (धुमसत) फॉग चल रहा है, हे उत्तर यावेळेस देणार नाही! किती फालतू प्रश्न विचारता? तुमच्या या असल्या भंकस प्रश्नांमुळे लोक आपल्या महामुलाखतीला काळूबाळूचा तमाशा म्हणतात! नॉन्सेन्स!!

आम्ही : (नीट सावरुन बसत) बरं बरं! सॉरी!! मला वाटलं एखादी शाब्दिक कोटी कराल! आमचा बॉल वाया गेला!

साहेब : (आदेश देत) मुकाट्यानं पुढले प्रश्न विचारा! एकतर इथं उकडतंय किती!! इलेक्शन झालं की, कुठंतरी थंड हवेच्या देशात-

आम्ही : (धूर्तपणे त्यांना थांबवत) बरं बरं! सध्या महाराष्ट्रात जे महाभारत चालू आहे, त्यात तुम्ही अभिमन्यूची भूमिका निभावता आहात, हे खरं आहे काय?

साहेब : (ताडकन उत्तर देत) हा प्रश्न आहे की तुमचं कॉमेंट? आम्ही अभिमन्यूची नव्हे तर अर्जुनाची भूमिका बजावतो आहोत! अभिमन्यूला चक्रव्यूहात प्रवेश करता येत होता, पण बाहेर कसं यायचं याची टोटल लागली नव्हती! आम्ही शत्रूचा कोथळा काढून लीलया बाहेर येऊ!! बघाल तुम्ही!!

आम्ही : (अधिकच विनम्रतेनं) तुम्ही उन्हातान्हात महाराष्ट्रभर हिंडत आहात, तहानभूक विसरुन महाराष्ट्र पिंजून काढता आहात! त्रास नाही का होत?

साहेब : (छद्मीपणानं) मग तुम्ही अधून मधून आमच्या डोक्यावर छत्री धरा की!! दरवेळी दुसऱ्याच पक्षाची प्रवक्तेगिरी करावी, असं नाही! आमच्याही खाल्ल्या मीठाला जागा की!!

आम्ही : (विषयाला बगल देत) मोदी आणि शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन सभांवर सभा घेत आहेत! यावर तुमची प्रतिक्रिया काय?

साहेब : (दातओठ खात) छापणार काय? घ्या, नाव काढू नका त्या दोघा..******* **!!! (संक्षिप्त भाग असल्याने म्यारेथॉन मुलाखतीमधला पुढील भाग गाळण्यात आला आहे.)

आम्ही : (लांबून स्टार्ट घेत लक्ष्यभेदी सवाल...)

मोदीजींनी महाराष्ट्राचा घात केला, असं तुम्ही म्हणता का?म्हणजे म्हणा, या अर्थी...

साहेब : (बेसावधपणाने) केला म्हणजे केलाच! किंबहुना केल्याशिवाय राहणारच नाहीत! का नाही करायचा? करणार म्हणजे करणार! करुन दाखवणार!!

आम्ही : (फलंदाजाला पुन्हा क्रीजमध्ये आणत) मी मोदीजी-शहाजींबद्दल विचारत होतो...

साहेब : (भानावर येत) अस्सं होय! आम्ही संताजी-धनाजीसारखे लढत आहोत! मोगलांच्या फौजांना घोडी पाण्याशी नेली की संताजी-धनाजी दिसत म्हणे! या दिल्लीच्या खेचरांना आम्ही दिसतो!! हाहा!!

आम्ही : (टाळ्या वाजवत) क्या बात है! पण याच मोदीजींना तुम्ही एकेकाळी डोक्यावर घेतलं होतं, त्याचं काय?

साहेब : (हताशेनं) आम्ही ती चूक दुरुस्त करु! हमारा घी देखा, लेकिन बडगा नहीं देखा, हांऽऽ...!

आम्ही : (शांतपणे) म्हंजे नेमकं काय करणार आहात!

साहेब : (अत्यंत गगनभेदी डरकाळी मारत) शाप देणार आहोत, शाप!! मोदी-शहा यांनी आजवर आमचं म्हणजे महाराष्ट्राचं प्रेम बघितलं, आता आम्ही त्यांना जळजळीत शाप देणार आहोत! आमचा शाप म्हणजे सुपडा साफ!! जय महाराष्ट्र!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com