ढिंग टांग : फेविकॉल, वेल्डिंग वगैरे..!

आम्ही फक्त भाषणापुरते!! तुमचीच धुळवड चालली आहे! मला तर हल्ली कोण कुठल्या पक्षात जाऊन काय बोलतोय, हेच समजेनासं झालं आहे!!
Dhing Tang
Dhing Tangsakal

दादू : (गपचूप फोन फिरवत) अलल…डुर्रर्र…हॉऽऽव…!

सदू : (छद्मीपणाने) सर्दी झालेल्या कुठल्या वाघाची ही डरकाळी आहे बरं?

दादू : (ओशाळून) ओळखलास वाटतं आवाज!

सदू : (टोमणा मारत) नाही, सर्दी ओळखली!! लहानपणापासून तू असाच शिंकतोस!!

दादू : (उत्साहात) कसं चाललंय इलेक्शन? धमाल येतेय ना?

सदू : (थंडपणाने) आम्ही फक्त भाषणापुरते!! तुमचीच धुळवड चालली आहे! मला तर हल्ली कोण कुठल्या पक्षात जाऊन काय बोलतोय, हेच समजेनासं झालं आहे!! गेल्या दहा हजार वर्षात अशी निवडणूक पाहिली नाही!!

दादू : (विषय बदलत) माझी मॅरेथॉन मुलाखत ऐकलीस का? इतकी स्फोटक मुलाखत गेल्या दहा हजार वर्षात झाली नाही, आणि होणारही नाही!!

सदू : (निर्विकारपणाने) गद्दार, कोथळा, स्वाभिमान, खोटारडे, विश्वासघात, औरंगजेब, कौरव-पांडव, शापवाणी…हेच सगळं असेल तुझ्या मुलाखतीत! मी नाही ऐकणार!!

दादू : (रागावून) मग मीही तुझी भाषणं नाही ऐकणार!! फेविकॉल का जोड काय, परप्रांतीयांचे लोंढे काय, ‘मी-कसा- निस्पृह’ छापाची तुझी नेहमीचीच टेप काय…हॅ:!!

सदू : (दुखावून) नको ऐकूस! तुमच्यासारख्या आयाभैणींवरुन लाखोल्या तरी वाहात नाही! प्रचाराच्या नावाखाली नुसती गटारगंगा वाहातेय तुमची! शी:!!

दादू : (संतापातिरेकानं) ज्याचं जळतं त्याला कळतं!

सदू : (वर्मी घाव घालत) तुमची तर मशाल जळतेय!!

दादू : (आरोळी ठोकत) याच मशालीनं त्या गद्दारांच्या दाढ्या नाही जाळल्या तर नावाचा दादू नाही!! हरामखोर, गद्दार लेकाचे! आईचं दूध विकणारी औलाद!! आमची सत्ता आली की बघून घेईन एकेकाला!

सदू : (नरमाईनं) उगीच आगीशी खेळ नको दादूराया! हेच पुन्हा सत्तेवर आले तर पंचाईत होईल!! माणसानं ‘आपण बरं, आणि आपलं कुटुंब बरं’ असं राहावं!

दादू : (चिडवत) तुला फेविकॉल जोरात लागलेला दिसतोय!!

सदू : (खुलासा करत) लागलाय थोडासा, पण बाहेरच्या बाजूनं! पुढच्या वेळेला आतून लावा, असं सांगून आलोय!!

दादू : (गोंधळून) बाहेरच्या बाजूनं फेविकॉल लागलंय? म्हंजे नेमकं काय झालंय?

सदू : (दीर्घ सुस्कारा टाकत) जोड लावायला फेविकॉल कुठं लावतात? त्याच्या विरुद्ध बाजूला लागलाय!! थोडक्यात, मी जिथं बसकण मारीन, तिथंच जाम चिकटणार!! आतल्या बाजूनं लागला असता, तर पक्कं काम झालं असतं!

दादू : (आणखी गोंधळात पडत) आतल्या बाजूनं का नाही लावला त्यांनी?

सदू : (खुलासा करत) ऑलरेडी तीन फळ्या एकमेकांना चिकटल्या होत्या! शिवाय फेविकॉलचा डबा संपत आला होता!

दादू : (आयडिया सुचवत) भाताची खळ लावली तरी चालतं म्हणे! गोंद लावावा!!

सदू : (नाक मुरडत) भाताची खळ, गोंद हे काही फेविकॉलइतके जोरदार मार्ग नाहीत! विधानसभेच्या वेळेला मी सर्वात आधी फेविकॉल लावून घेईन!

दादू : (प्रेमभराने) मी टाळी द्यायला आलो होतो, तेव्हा नाक मुरडलंस! आता फेविकॉल शोधत फिरतो आहेस! काय अवस्था ही सदूराया!!

सदू : (रागाने) आजही माझ्यामागे लोक फेविकॉलचे डबे घेऊन फिरतात, यात सारं काही आलं! तुमची आघाडी तर कशीबशी खिळे ठोकून उभी केलेली आहे! कधी कोलमडेल सांगता येत नाही!!

दादू : (खमकेपणाने) खिळे? चांगली भक्कम वेल्डिंग केलेली महाविकास आघाडी आहे आमची!! आणि पुढल्या वेळेस ती कमळाबाई आतल्या बाजूनं फेविकॉल लावेल, याची गॅरंटी काय?

सदू : (खोल आवाजात) त्यासाठीच तर मी आतल्या बाजूनं मस्का लावतोय ना? जय महाराष्ट्र!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com