ढिंग टांग : किसननगर टू काशीनगरी..!

रात्री अडीच वाजता घरी पोचल्यावर आदल्या दिवशीचा दुपारचा लंच घेतला. कुटुंब डोळे वटारुन पाहात होते. घरचे जेवण ते घरचे जेवण असे पुटपुटत मुकाट्याने जेवून घेतले.
Dhing Tang
Dhing Tangsakal

(एका मराठी मुशाफिराचे प्रवास-वर्णन..)

रात्री अडीच वाजता घरी पोचल्यावर आदल्या दिवशीचा दुपारचा लंच घेतला. कुटुंब डोळे वटारुन पाहात होते. घरचे जेवण ते घरचे जेवण असे पुटपुटत मुकाट्याने जेवून घेतले. लंच झाल्यावर आदल्या संध्याकाळची राहिलेली आंघोळ केली, आणि स्वच्छ पांढरेशुभ्र कपडे घालून विमानतळावर आलो. तिथे तीन-चार हेलिकॉप्टरे, दोन-तीन विमाने उभीच होती.

मुंबई नाक्यावर टॅक्सीवाले गराडा घालतात, तसा पायलटांनी गराडा घातला. कुणी चाळीस हजार रुपये सीट सांगत होते, तर कुणी ‘पच्चीस में चलो, पीछे बैठना पडेंगा’ अशी गळ घालत होते. एक़ा पायलटने विचारले, ‘‘साहेब कुठे जायचंय?’ मी म्हटले, ‘काशीत!’ तो ‘चला’ म्हणाला. त्याचे विमान बुक केले.

‘जादा सीटा घेऊ नकोस’ असे त्या पायलटला बजावले, आणि हातानेच मीटर टाकून ‘बनारस चलो’ असे फर्मावले. (खुलासा : इलेक्शनच्या काळात विमाने आणि हेलिकॉप्टर कंपन्यांनीही मीटर सिस्टम सुरु केली आहे. हे लोक पासिंग कुठून करुन घेतात, याची माहिती घेतली पाहिजे. असो.) पायलटने ‘ओटीपी’ विचारला, मी ‘फोर झीरो झीरो’ असा सांगितला. त्याने लागलीच उड्डाण केले...

वाराणशीच्या विमानतळावर उत्तर प्रदेशातले कितीतरी मंत्रीगण माझ्या स्वागतासाठी येऊन पोचले होते. मागल्या बाजूला काही हवाई कर्मचारी दिसले. पण ते हवाई कर्मचारी नव्हते. एका युनिफॉर्ममधल्या पायलटच्या गळ्यात ताशा होता. दुसऱ्याच्या हातात ट्रम्पेट होते. नमस्कार, चमत्कार झाले. ‘अबकी बार, चारसोपार’ चा नारा झाला. तिथून गाड्या निघाल्या, त्या थेट दशाश्वमेध घाटावर!

पवित्र वाराणसी नगरीत आज साक्षात महाशक्ती महानिवडणुकीच्या महाउमेदवारीचा महाअर्ज भरणार होती. या ऐतिहासिक क्षणाला आपण उपस्थित आहोत, या कल्पनेनेच अंगावर रोमांच आले. गुवाहाटीला गेलो नसतो, तर ही काशीयात्रा हुकली असती! ‘हर दिल में मोदी’, ‘घरघर मोदी, हरहर मोदी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. माझा आवाज बसला होता, तरीही मी जोराजोरात घोषणा दिल्या. (कारण) शेजारीच पूज्य बुलडोझरबाबा ऊर्फ योगीजी उभे होते.

‘अर्ज भरनेकू कब्बी निकलने का हय?,’ मी ठाण्यात किसननगर भागातल्या हिंदीमध्ये त्यांना विचारले. त्यांच्या हृदयाला तडे गेल्याचा तडतड आवाज मला ऐकू आला. आमच्याकडे येऊन आमच्या मराठीचे हाल करता, तेव्हा आमचेही मन असेच फुटते, असे मी मनात म्हणालो.

यथावकाश आदेशानुसार कलेक्टर हापिसमध्ये गेलो. तिथे प्रफुल्लभाई पटेल भेटले. त्यांच्या शेजारीच रामदासजी आठवले होते. मला बघून प्रफुल्लभाईंच्या जीवात जीव आला. रामदासजींनी त्यांना कविता ऐकवल्या असणार! जाऊ दे.

...हपिसात माननीय कलेक्टरसाहेब टेबलाशी बसले होते. त्यांच्या पुढ्यात उमेदवार महाशक्ती, आणि त्यांच्या शेजारी प्रस्तावक गणेश्वर शास्त्रीजी. मागल्या खुर्चीत वंदनीय बुलडोझरबाबा. कलेक्टरसाहेबांची गोची मी समजू शकतो. आपण उठून उभे राहाणे बरे की बसलेलेच राहिलेले बरे, हा कलेक्टरसाहेबांच्या मनातला गोंधळ चेहऱ्यावर उमटला होता.

उमेदवारीअर्ज भरुन झाल्यावर आम्ही घोळक्याने बाहेर आलो. ‘भरला महाशक्तीने उमेदवारी अर्ज, कारण हा आहे लोकशाहीचा फर्ज,’ असले काहीतरी रामदासजी जुळवत असतानाच मी सटकलो. प्रफुल्लभाईंना ‘ हा आलोच’ असे सांगून कल्टी मारली. वाराणसीत बघण्यासारखे बरेच आहे. पुढल्या वेळेस आमच्या आमदारांना गठ्ठ्याने इकडेच आणायचे ठरवले. पण घाई असल्याने तडक विमानात बसून मुंबईला परतलो.

...बाकीची कामे आटोपून रात्री उशीरा पुन्हा ठाण्याला घरी गेलो. आदल्या दिवशीच्या दुपारचा लंच राहिला होता, तो रात्री अडीचला जेवताना मनाशीच म्हणालो की, ‘महाशक्तीचा विजय असो!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com