ढिंग टांग - दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ...!

मोबाइल फोनच्या पोरीचा आवाज बसला की काय
ब्रिटिश नंदी
ब्रिटिश नंदीsakal

ढिंग टांग - दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ...!

दादू : (नाईलाजाने फोन फिरवत) ट्रिंग ट्रिंग…ट्रिंग ट्रिंग...टुडुंग! कक…क…कोण बोलतंय?

सदू : (जमेल तितका आवाज वेगळा काढत)…इस रुट की सभी लाइनें व्यस्त है, क्रिपया थोडी देर बाद आप फिर से कोशीश कर सकते है…! धन्यवाद!!

दादू : (गोंधळून स्वत:शीच) मोबाइल फोनच्या पोरीचा आवाज बसला की काय? (प्रकाश पडत संतापून)सद्या, मी ओळखतो तुझा आवाज! शेंड्या लावू नकोस!!

सदू : (खजील होत्साता) बरं बरं! सॉरी…! थोडी गंमत केली!!

दादू : (रागावून) ही गंमतीची वेळ नाही! रात्र वैऱ्याची आहे…!!

सदू : दादूराया, दुपारचे ढळढळीत बारा वाजलेत, रात्र कुठली?

दादू : (घुश्शात) हल्ली तुझी काय थेरं चालली आहेत, मला समजत नाहीत का?

सदू : (पेडगावला जात…) घ्या…आता मी काय केलं?

दादू : (दातओठ खात) त्या शिवाजी पार्कात बसून तुझी राजकारणं चालली आहेत, कळतंय मला!!

सदू : (खांदे उडवत) मला तुमच्या राजकारणात रस नाही! मी हिंदुत्त्वरक्षक, मी महाराष्ट्र सेवक!!

दादू : (कपाळाला आठ्या घालत) हे नवीनच काय आरंभलंयस?

सदू : (चपळाईने विषय बदलत ) जाऊ दे रे ते! महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कधी निघणार आहेस ते सांग!!

दादू : (सावध होत) लौकरच!

सदू : (टोमणा मारत) हल्ली तू घराबाहेर अजिबात पडत नाहीस असं दिसतं! मी इथे शिवाजी पार्कात, तू तिथे बांदऱ्यात!!!

दादू : (चडफडत ) माझं अजूनही वर्क फ्रॉम होम चालू आहे!! वेळ पडली तर जाईनही दौऱ्यावर!

सदू : (आणखी टोकरत) सध्या आराम असेल ना? पुन्हा फोटोग्राफीकडे वळलास की नाही?

दादू : (उलटा टोमणा मारत) तुझी व्यंगचित्रं बंद झाली आहेत, हे कळतंय मला!!

सदू : (आळोखेपिळोखे देत) हल्ली वेळच मिळत नाही! सारखं कोण ना कोण तरी भेटायला येत असतं!! परवा ते कमळ पक्षाचे बावनकुळेकाका येऊन गेले!!

दादू : (चिडून) आणि त्याआधी तू गपचूप त्या फडणवीसनानांना भेटून आलास! खरं की नाही?

सदू : (थंड सुरात) छे, खोटी बातमी आहे ती! पण तुला कसं कळलं?

दादू : (दमदार सुरात) जंगलात गेलायस का कधी? तुम्ही वाघाला पाहू शकत नाही, पण वाघ तुम्हाला सतत पाहात असतो!! लक्ष असतं माझं!!

सदू : (सावरुन घेत) गैरसमज होतोय, दादूराया! मी कुठे जात नाही नि येत नाही! पक्षाचे कार्यकर्ते सारखे मागे लागतात, म्हणून-

दादू : (रागारागाने मुद्द्यावर येत) यंदा दसरा मेळावा घेणार आहात म्हणे!! फू:!!

सदू : (थंडपणाने) कार्यकर्त्यांचा हट्ट…दुसरं काय?

दादू : (छद्मीपणाने) कॉपी करुन पास होता येत नाही दरवेळी!!

सदू : (साळसूदपणाने) तुमच्या दसऱा मेळाव्याचं काय ठरलं?

दादू : (आक्रमकपणाने) त्यात ठरवायचं काय? दसरा मेळावा होणारच! झाल्याशिवाय राहणार नाही! किंबहुना केल्याशिवाय राहणार नाही! का नाही करायचा? केलाच पाहिजे, झालाच पाहिजे! दसरा मेळावा करुन दाखवीन!!

सदू : (हळूचकन) कुणाचा? तुमचा की ‘त्यांचा’?

दादू : (डरकाळी फोडत )सद्याऽऽ…!!

सदू : (निर्विकारपणाने) तुमच्या मेळाव्याचं काय ते फायनल ठरु द्या! मग मी आमच्या मेळाव्याचं सांगतो! हाहा!! जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com