आदरणीय दादासाहेब बारामतीकर,
अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य.
शतप्रतिशत नमश्कार! तुम्ही अर्थमंत्री आहात, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या कमरेला आहेत, म्हणून तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. तुम्हाला हे माहीतच असेल की, देशभरातील विविध राज्यांमधून आणि केंद्रामधून अंदाज समित्यांचे जवळपास सहाशे सदस्य मुंबईत येऊन गेले.
अंदाज समित्यांचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत भरले होते. दोन दिवस आम्ही तुमचा पाहुणचार झोडून नुकतेच परतलो. तुम्हा सर्वांना आमचे पोटभर आशीर्वाद आहेत! महाराष्ट्र सरकारने आपली बडदास्त जबरदस्त ठेवली, यात शंका नाही. मुंबईतील ऐश्वर्य बघून माझे डोळे, जीभ आणि पोट दिपले!!