
Maharashtra Transport
Sakal
ढिंग टांग
आदरणीय परिवहन मंत्री रा. रावसाहेब यांना कोण ओळखत नाही? महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेला गावोगाव हिंडता यावे, यासाठी त्यांनी परिवहन सेवेत अक्षरश: क्रांती घडवली. ‘गाव तेथे यष्टी’ हे घोषवाक्य त्यांना मनातून आवडत नसे. तांबड्या यष्टीचे येवढे काय? गोरगरीब जनतेला उत्तम सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात यासाठी परिवहनमंत्री रावसाहेब रात्रीचा दिवस करत होते. त्या भानगडीत अनेकदा दिवसाची रात्र करावी लागली, तरी त्यांना पर्वा नसे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे नीतिवाक्य आता कालबाह्य झाले. युरोप-अमेरिकेशी स्पर्धा करायची असेल तर आता उच्च राहणी आणि साधी विचारसरणी हेच सूत्र असले पाहिजे, अशी रावसाहेबांची धारणा होती. उच्च राहणी एकवेळ सहज शक्य आहे, पण साधी विचारसरणी अंगिकारणे महाकठीण. पैशाकडे पैसा जातो, लुळीपांगळी गरीबी, आणि धट्टीकट्टी श्रीमंती अशा म्हणी बदलून घेण्याचा काळ आला आहे.