ढिंग टांग : ‘आप’का मसाज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिटिश नंदी

ढिंग टांग : ‘आप’का मसाज!

आ दरणीय स्वामी अरविंदजी, जय हिंद. जय दिल्ली! आपण गुजरातच्या प्रचारात आणि दिल्ली म्युनिसिपाल्टीच्या निवडणुकीत व्यग्र असाल, याची कल्पना आहे. पण तरीही वेळात वेळ काढून आपण माझा समाजमाध्यमांवर फिरत असलेला व्हिडिओ पाहिलात का? टीव्ही वाहिन्यादेखील तो दाखवत आहेत. एक मसाजवाला प्रेमाने माझे अंग रगडतो आहे, असे दृश्य त्यात दिसते. निवडणुकांचे वातावरण असल्याने या चित्रफिती व्हायरल केल्या जात आहेत. प्रचाराची ही किती हीन पातळी आहे!! शी:!! मी तर आम आदमी पक्षाचा साधासुधा सिंपल कार्यकर्ता. माझ्यावर हे बालंट यावे? आज यांनी माझ्या चंपीमालिशचा व्हिडिओ देशवासीयांना दाखवला. उद्या, आपल्यासारखा उच्च कोटीचा नेता विपश्यनेला बंगळुरातल्या पंचतारांकित शिबिरात गेला, तर तेही दाखवतील! राजकारणाचा स्तर खालावत आहे, हेच खरे.

माझे चंपीमॉलिश तिहार तुरुंगाच्या कोठडीत झाले, एवढाच तपशीलाचा किरकोळ फरक आहे. एरवी माणसे काय चंपीमॉलिश करत नाहीत? मुंबईच्या चौपाटीवर तर दिवसाढवळ्या चंपीमालिशवाले गिऱ्हाईकाला चारचौघात आडवा करतात!! सतत लोकसेवा केल्यामुळे मला पाठदुखीचा त्रास जडला आहे. म्हणून डॉक्टरांनी फिजिओथेरपीचा सल्ला दिला. तिहारमध्ये फिजिआथेरपीच्या उत्तम सुविधा आहेत, असे येथील रहिवाशांचेही म्हणणे पडले. येथील रहिवासी अतिशय मनमिळावू आणि मदतीला तत्पर असतात.

माझ्या शेजारच्या कोठडीत राहणाऱ्या रहिवाशाने खूप मदत केली. ‘आम्हाला जाग्रणाची सवय असते’ असे तो विनयाने म्हणाला. दरोडेखोरीचा खोटा आरोप होऊन तो शिक्षा भोगतो आहे. स्वामी अरविंदजी, पक्षस्थापनेपासूनच मी नेहमी तुमच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही झाडू उचलावा, मी कचऱ्याचे सूप हाती घ्यावे, असे आपले ऋणानुबंध. आम आदमीसाठी मी नेहमीच आवाज उठवला. त्यांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी मी तन आणि मन वेचले. (धन दुसऱ्यांना वेचायला लावले.) सतिंदर जैन हा एक देवदूत आहे,

असे तुम्हीच माझ्याबद्दल गौरवोद्गार काढले होते, हे आठवते का? (मी देवदूत क्र. तीन आहे, दुसऱ्या क्रमांकावर आपले सिसोदियासाहेब आहेत…पहिला नंबर कुणाचा हे सारी दिल्ली जाणते!! वंदन!!) दिल्ली महापालिकेच्या निवडणुका लागल्यामुळे भाजपचे लोक माझ्यामागे लागले. ते माझी आणि आपल्या पक्षाची यथेच्छ बदनामी करत आहेत. होय, मी कोठडीत चंपीमालिश करुन घेतली. पण त्या खाजगी क्षणाचा व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर टाकणे नतद्रष्टपणाचे आहे. हा माझ्या खाजगीपणावर सरळ सरळ हल्ला आहे. माझ्या कोठडीत डझनभर मिनरल पाण्याच्या बाटल्या आढळल्या. आम आदमीने मिनरल पाणी पिणे गुन्हा का आहे? माझ्या कोठडीत काही माणसे गप्पा मारताना दिसली. आम आदमीने कुणाशी सुखसंवाद साधूच नये की काय? कोठडीत वेळ जाता जात नाही. गाद्यागिर्द्यांना टेकून सतत टीव्ही बघितल्यामुळे पाठ दुखते. ती दुखल्यामुळे चंपीमालिश करावे लागते. आम आदमीने चंपीमालिशचे सुख भोगूच नये काय?

हा देश का फक्त कोट्यधीश उद्योगपतींचा आहे? हा देश का फक्त श्रीमंत राजकारण्यांचा आहे? हा देश का फक्त त्या कमळवाल्यांचा आहे? चंपीमालिश करणे हा का गुन्हा आहे? या चिखलफेकीपासून मला वाचवावे, ही कळकळीची विनंती.

आपला विनीत, एक साधा कार्यकर्ता. सतिंदर जैन. (मुक्काम : तिहार मसाज पार्लर, दिल्ली.)

ता. क. : मालिशवाला चांगला वाटला. मा. मनिष सिसोदियांकडे धाडतो आहे. अंगाला चांगले तेल लावून घ्या, म्हणावे!! सतिंदर.