गाय तेने गरबो ने झीले तेने गरबोगरबो गुजरातनी गर्वी मिरात छेघूमे तेने गरबो ने झूमे तेने गरबोगरबो गुजरातनी गर्वी मिरात छे-सुप्रसिद्ध राष्ट्रीय गीतकार श्री. एम नरेंद्र. (एमने एमज!).दिवस दांडियाचे आहेत. रंगीबेरंगी आहेत. सणासुदीचे आहेत. या काळात खबरदारीने राहावे. नेमके हेच दिवस इलेक्शनचेही आले आहेत. तेही रंगीबेरंगी आहेत, आणि काही लोकांसाठी सुगीचे!! अतएव या काळात दुप्पट खबरदारीने वागावे. आम्हाला समाज आणि राजकारण या दोहोंची काळजी वाहावी लागते. त्यामुळे आम्ही आमच्यापुरती तिप्पट खबरदारी घेत आहो..प्राचीन काळी, भरतखंडात गरबा हा गुजराती बांधवांचा सण म्हणून प्राय: ओळखला जात असे. गल्लोगल्ली गरब्याचे मांडव पडत नव्हते, आणि तीन-तीन मजली ध्वनिवर्धकही मांडले जात नव्हते. गरबा मोजक्याच ठिकाणी होत असे व मराठी बंधूभगिनींना रिंगण धरुन बिनदिक्कत गरबानृत्य करण्याचा भारी संकोच वाटत असे. परंतु, नवा भारत बोल्ड अने पोजिटिव झाला आहे. याविषयी आम्ही काही निरीक्षणे-कम-सूचना विचारार्थ विदित करीत आहोत..१. गरबा नृत्य तसे सोपे आहे. दोन अडीच पावले इकडे तिकडे टाकली की मनुष्य पुढे सरकतो. तथापि, काही मराठी नर्तक पावले अचूक टाकतात, पण पुढे मात्र सरकत नाहीत!! इथे भूमी इंच इंच लढवणे शिकून घ्यावे लागते.२. पारंपरिक गरबानृत्यासाठी भगिनीवर्गासाठी अत्यंत दिलखेचक व नेत्रदीपक असे पोशाख उपलब्ध असून त्यास अनेक आरसे, नाड्या आणि चमक्या-गोंडे आदीकरोन सजवलेले असते. हे पोशाख बघण्यासाठी पाठीला डोळे असावे लागतात. असो.३. पारंपरिक गरबानृत्यासाठी पुरुषवर्गासाठी झबलेसदृश गलोते आणि कमरेस घेरा असलेली विजार असा पोशाख मुक्रर केलेला असतो. या पोशाखात फोटो काढून घेऊ नये. मराठी माणसास हा पोशाख तितकासा शोभत नाही, असे आमचे नम्र मत आहे..४. टिपरी हे शस्त्र नव्हे! गरबा पदन्यासाची अडीच पावले पुढेमागे टाकण्याच्या गडबडीत हातातली टिपरी चुकते आणि चुकीच्या ठिकाणी नेम बसून काहीतरी खळ्ळखटॅक होण्याची शक्यता बळावते. एका दांडिया कार्यक्रमात मऱ्हाटी टिपऱ्यांचा असा चुकून प्रसाद मिळून शेकून निघालेले काही अमराठी बांधव आम्ही पाहिले आहेत. परंतु, ही मारामारी अपघाताने झाली नसावी, असे मानून आम्ही हस्तक्षेप केला नव्हता.५. काही गरबे लोकप्रिय असतात, काही रिकामे असतात. लोकप्रिय गरब्यांमध्ये महागडे गरबागीते गाणारे गायकगायिका, सेलेब्रिटी सितारे, महागडे पोशाख, पाणीपुरी, रगडा अने पेटिस आदी खाद्यपदार्थांची रेलचेल असते. (अहियां पावभाजी पण मळशे.) तथापि, आपण देवीमातेच्या नृत्य आराधनेसाठी आलो असून वजनवाढीसाठी नव्हे, याची नोंद घ्यावी..६. रिकामे गरबा मांडव हे प्राय: गल्लीतील लोकप्रिय, नवोदित, उभरत्या नेतृत्वाचा आविष्कार असतो. आजूबाजूच्या पाच-पंधरा दुकानदारांकडे चक्कर टाकून मिळवलेल्या प्रायोजकत्वाच्या जोरावर हे मांडव उभे असतात. इथे फक्त प्रारंभी व शेवटाला आरती होते, आणि मधल्या काळात काही पोरेटोरे गरबा शिकण्याचा खटाटोप करत असतात. काही बुजुर्ग मंडळी लगतच्या खुर्च्यांवर जांभया देत असतात.७. गरबा हल्ली तरुणाईचा सण म्हणून ओळखला जातो. या काळात काही मध्यमवयीन भगिनी-बांधवही आपण अजूनही तरुण असल्यासारखे वागू पाहतात. रंगबिरंगी पोशाख परिधान करुन आपणही हातात दोन टिपऱ्या घेऊन रिंगणात उतरावे, असे कोणास वाटले तर काय हरकत असणार? तथापि, हा सणासुदीचा काळ असला तरी बचतीचाही उत्सव असल्याचे फर्मान दिल्लीहून निघाले आहे, याची संबंधितांनी नोंद घेणे गरजेचे आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.