नेहमीप्रमाणे मोठ्या साहेबांच्या तसबिरीला नमस्कार केला, आणि दिवस सुरू केला. पक्षाचा महामेळावा होणार म्हणून गेले कित्येक दिवस नीट जेवलो नव्हतो. आता जे काही होईल ते पुण्यात याच दृढ निश्चयाने पक्षकार्य करत होतो. .जीपगाड्यांमध्ये बसून तडक पुणे गाठलं. बालेवाडीत हेऽऽ भलामोठा मांडव होता. हेऽऽ भलं मोठं स्टेज!! सगळीकडे ओळखीचे चेहरे दिसत होते. एकमेकांना भेटून ‘व्वा, तुम्ही पण हितं का?’’ किंवा ‘‘शेवटपर्यंत पत्ता लागू दिला नाहीत! भले शाब्बास’’ अशी ख्यालीखुशाली विचारणं चाललं होतं. एकानं तर ‘मी कालच आलो’ असं जाहीर केलं. दुसऱ्यानं ‘मी तर आत्ताच येतोय’ अशी त्यावर कडी केली..सुरवातीला इतर पक्षसहकाऱ्यांशी उराउरी भेट झाल्यानंतर हळू हळू भानावर आलो. आपली गल्ली चुकली आहे की काय, अशी शंका आली. पुढ्यातच आदरणीय प्रफुल्लभाई आले, आणि शंकाच फिटली. मला बघून प्रफुल्लभाई छान हसले. मला बरं वाटलं. पण प्रफुल्लभाई सगळ्यांकडे हसूनच बघतात, हे लगेच लक्षात आलं. मन खट्टू झालं..तेवढ्यात आदरणीय दादासाहेब आले. त्यांनी आल्या आल्या प्रेमानं दम भरला. ‘काय रे, हिते कुठे?’’ असं दरडावून विचारलं. मी हैराण! मग हळू हळू ध्यानात आलं की आपण वर्धापन दिनाच्या मेळाव्याला आलोय, पण निशाणा चुकलाय! ही वेगळी पाती आहे. एकदोघे गोंधळलेल्या चेहऱ्याचे लोक होते. त्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘‘अहो, तो थोरल्या साहेबांचा मेळावा वेगळा, हा वेगळा! तो बालगंधर्वला भरलाय. तिथं जायचंय का तुम्हाला? ती बघा, बस उभी आहे!’’.बालेवाडीत चुकून आलेल्या कार्यकर्त्यांना बालगंधर्वला सोडण्यासाठी बससेवा उपलब्ध होती, हे बघून मी भारावून गेलो. कार्यकर्त्यांची किती ही काळजी! मी बसमध्ये बसून ‘बालगंधर्व’ला गेलो. तिथंही ओळखीचे चेहरे होतेच. तिथंही त्याच गप्पा! एकमेकांना भेटून ‘व्वा, तुम्ही पण हितं का?’’ किंवा ‘‘शेवटपर्यंत पत्ता लागू दिला नाहीत! भले शाब्बास’’ अशी ख्यालीखुशाली विचारणं चाललं होतं. एकानं तर ‘मी कालच आलो’ असं जाहीर केलं. दुसऱ्यानं ‘मी तर आत्ताच येतोय’ अशी त्यावर कडी केली. समोरून अमोलराजे कोल्हे आले. मी त्यांना अदबीनं मुजरा केला. त्यावर ताठ मान गर्रकन वळवोन ते म्हणाले, ‘‘मुजरा त्यांना करायचा, ज्यांना निष्ठा वाहिल्या आहेत!’’ मी ‘जी, साहेब’ असं म्हणून बाजूला झालो. हा मेळावा खरं तर आपण बोलावला असून सगळे आपलेच कार्यकर्ते असल्याच्या आविर्भावात निलेश लंके हिंडत होते. मी त्यांनाही मुजरा करून टाकला..स्टेजच्या जवळ आदरणीय पक्षाध्यक्ष जयंत्राव पाटीलसाहेब विचारमग्न चेहरा करून उभे होते. मी त्यांना विचारलं, ‘‘साहेब, स्टेजवर निघालाय, की उतरताय?’’‘‘त्याचाच विचार करतोय!,’’ त्यांनी प्रामाणिकपणानं उत्तर दिलं! ‘टु बी ऑर नॉट टु बी’ हा शेक्सपिअरचा सवाल त्यांच्या चेहऱ्यावर होता.‘‘बरेच लोक बालेवाडीहून आले..,’’ मी त्यांना बातमी दिली.‘‘ते बरंय! इथून बालेवाडीला जाण्यापेक्षा ते बरंय!,’’ ते हसून म्हणाले. मीदेखील मान डोलावली..तेवढ्यात कार्यकर्त्यांच्या घोळक्यापैकी कुणीतरी त्यांना विचारलं, ‘‘बालेवाडीला बस कुठूनशी सुटते हो?’’जयंत्रावांनी एका दिशेकडं बोट दाखवलं. काही कार्यकर्ते बसकडे निघाले. त्यांच्यासोबत नकळत तेदेखील चालू लागले. मी त्यांना हटकलं, ‘‘ साहेब, तिकडं कुठं निघालात? स्टेजवर जायचंय ना?’’‘‘अरे हो, विसरलोच!,’’ असं म्हणून ते जड पावलांनी स्टेजवर चढले.मनात आलं, वाटीतलं ताटात, ताटातलं वाटीत…एकूण एकच!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.