वंदनीय पंतप्रधान मोदीजींनी स्वत: लक्ष घातल्यामुळे युनेस्कोने महाराष्ट्रातील बारा शिवकालीन गडकोटांना ऐतिहासिक जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित केले. हा निश्चितच महाराष्ट्राच्या शिरपेचातील सन्मानाचा तुरा आहे. त्याबद्दल आम्ही जाहीररीत्या युनेस्कोस थँक यू म्हणत आहो.
तथापि, काही अज्ञ वाचकांसाठी माहिती देणे आवश्यक आहे की, युनेस्को ही एक जागतिक संस्था असून जगभरातील निवडक ऐतिहासिक एवं प्राचीन स्थळांना ती विशिष्ट दर्जा बहाल करुन देखभालीसाठी खर्चवेचही उचलते. त्यासाठीचे निकष अत्यंत कडक आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे असतात. त्या दृष्टीने पाहू गेल्यास मराठी भाषेसोबत समग्र मऱ्हाटी संस्कृती आता सातासमुद्रापार अभिजात दर्जाप्रत पोचली, असे म्हटले तर वावगे होऊ नये.