
ब्राझिलिया : हा सुंदरसा मजकूर मी सुंदरशा हॉटेलच्या सुंदरशा खोलीतील सुंदरशा मेजाशी बसून लिहीत आहे. यू ते अमो म्हणजे ब्राझिलियनमध्ये लव्ह यू!
आमचा परदेश दौरा संपत आला आहे. मला बघायला लांब लांबून लोक येतात. मी त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेतो. काढून देतोही!! मला सेल्फी काढायला खूप आवडते. माझ्याकडे शेकडो सेल्फी जमा झाल्या आहेत. सेल्फी काढून मी तातडीने आदरणीय पीएम मोदीजींना पाठवतो. त्यांनी मला तशी सूचनाच केली आहे. ब्राझिलची राजधानी म्हणजे ही ब्राझिलिया. आह! नावच किती सुंदर आहे! इथून समुद्र थोडा दूर आहे. पण मी ‘रिओ द जानिरो किंवा साव पावलोला जाऊन येऊ’ असा आग्रह शिष्टमंडळाच्या बाकीच्या सदस्यांकडे धरला आहे. बघू! यश आले तर समुद्रकिनारी जाऊन ‘हिंसाचाराला थारा देऊ नका’ असा संदेश देईन.