माननीय मुख्यमंत्रीसाहेब, यांसी शतप्रतिशत प्रणाम.
विषय : चहापानानंतर उरलेल्या चहाच्या बिलाबाबत.
महोदय, सत्ताधारी पक्षाने अत्यंत आपुलकीने चहापानाचा कार्यक्रम ठेवावा, आणि विरोधकांनी त्यावर बहिष्कार घालून आपुलकीची ऐशीतैशी करावी, हीच एक दीर्घ परंपरा आता झाली आहे. सलग अठ्ठावीस वेळा विरोधकांनी बहिष्कार घातलेला चहापान कार्यक्रम असा आता नवा विक्रमच घडेल असे दिसते.
कालच सायंकाळी लिम्का की गीनेज (नेमके नाव आठवत नाही) बुकाची माणसे येऊन गेली. रेकॉर्ड एण्ट्री करायची आहे, असे सांगून फोटोबिटो काढून नेले. (पाच जण आठ कप चहा फुकट पिऊन गेले…) चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक हमेशा बहिष्कार टाकतात. मग चहा उरतो! उरलेल्या चहाचे काय करायचे, हा गहनप्रश्न सध्या महाराष्ट्रापुढे उभा आहे. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असून आज-उद्या ‘कॅग’च्या अहवालात यावर ताशेरे आले तर मला जबाबदार धरु नका, ही विनंती.
सत्ताधारी पक्षाचे सगळे आमदार चहापानाला आले. सोबत बिस्किटे ठेवली होती. ती सर्वांनी दणादण उडवली. एक-दोन सदस्यांनी जवळ येऊन कानात ‘भजी सोडा की राव लगेच’ अशी गळ घातली. मी त्यांना बजेटमध्ये तरतूद नसल्याचे खरे कारण सांगितले. सध्याचे अधिवेशन हे अर्थसंकल्पी अधिवेशन आहे.
चहापान कार्यक्रमात असॉर्टेड भजी (कांदा, बटाटा, ढोबळी मिरची, नुसती मिरची, वांगी, फुलवर, कोबी, पालक…वाजवी दरात घाणा काढून मिळेल.) ठेवण्यासाठी भरीव तरतूद करावी, अशी माझी विनंती आहे.
चहापान कार्यक्रमापेक्षा त्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम अधिक गाजतो. किंबहुना हा कार्यक्रम बहिष्कार घालण्याचाच आहे, अशी ठाम समजूत अनेकांची झाली आहे. मधल्यामध्ये आमच्यासारख्या साध्या सिंपल चहावाल्याचा चोथा होतो. यावेळी विरोधकांची संख्या कमी होती, त्यामुळे चहा फारसा उरला नाही हे कबूल; पण नुकसान व्हायचे ते झालेच.
जो चहा प्यायलाच गेला नाही, त्याचे बिल कसले लावता? असे मला माननीय अर्थसचिवांनी (मीच नेऊन दिलेला चहा पीत) सुनावले. मी काय बोलणार? उरलेला चहा पीत मी आणि माझ्या कुटुंबीयांनी पुढला दिवस रेटला, हे कुठल्या तोंडाने सांगू?
माझ्या मते या कार्यक्रमाचे नाव बदलण्यात यावे. पेय बदलण्यात यावे. जोडीला काही चांगलेचुंगले खाण्याचे पदार्थ ठेवावेत. मुख्य म्हणजे वेळ बदलण्यात यावी!! टाइम टाइम की बात होती है, साहेब! उदाहरणार्थ रात्रीभोजनाचा बेत ठेवला तर बहिष्काराचे प्रमाण बरेच कमी होईल, असे वाटते. हल्ली जेवण कोण सोडतो?
मीदेखील आताशा चहावाल्याचा व्यवसाय बंद करुन फुलटाइम केटरिंगच्या व्यवसायात उतरायचा विचार करतो आहे. चहावाल्याचे भविष्य उज्ज्वल असते, असे मलाही काही काळ वाटले होते. पण सगळेच चहावाले नशीब काढत नाहीत, हे उघड आहे. असो.
पुढील वेळेस चहापानाचा कार्यक्रम ठेवणारच असाल तर आधी सर्व निमंत्रितांना ‘आरएसव्हीपी’ निमंत्रणे पाठवावीत. तुम्ही नक्की येणार का? हे कन्फर्म करुन घ्यावे. पुण्यात असे काही ठिकाणी चालते! खोटे वाटत असेल तर कृपया चौकशी करावी. उरलेला चहा संपवण्यासारखी दुसरी शिक्षा नाही, साहेब! सोबत चहाचे बिल जोडले आहे.
ते कृपया विशेष बाब म्हणून मंजूर करावे, ही विनंती. या टर्ममध्ये (तरी) थकबाकी ठेवू नये, येवढीच अपेक्षा आहे. आणखी काय लिहू? गिऱ्हाईक खोळंबले आहे. चुलीवर चहा चढवणे हेच माझे प्राक्तन आहे. काही अधिक़उणे लिहिले असल्यास माफी करावी.
आपला. एक
बहिष्कारपीडित चहावाला.
ता. क. : ग्रीन टी नावाच्या भिक्कार पेयावर बंदी आणावी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.