sakal ding dang article ganesh ustav maharashtra politics
sakal ding dang article ganesh ustav maharashtra politicssakal

ढिंग टांग : बाप्पा मोरया...!

बाप्पा मोरया!!...कस्सलेही आवाज काढले तरी बरोब्बर ओळखतोस हं!! चतुर आहेस!!
Published on

दादू : (न राहवून फोन लावत सावधपणे) म्यांव म्यांव म्यांव म्यांव...!

सदू : (एक सुस्कारा टाकत) दादूराया, तुझा रिंगटोन आता बदल!! बाप्पा मोरया!

दादू : (कौतुकाने) बाप्पा मोरया!!...कस्सलेही आवाज काढले तरी बरोब्बर ओळखतोस हं!! चतुर आहेस!!

सदू : (थंडपणाने) किती मोदक खाल्लेस?

दादू : (तीन बोटे दाखवत) दोन! तू किती खाल्लेस?

सदू : (पाच बोटे दाखवत) एक! मी हल्ली पथ्य पाळतो!!

दादू : (गंभीर होत्साते...) मोदक आवडले म्हणून जास्त खाऊ नये! बाधतात!! तीन-चार वर्षांपूर्वी मी एकदम एकवीस मोदक खायचा प्रयत्न केला होता, पचले नाहीत!!

सदू : (हताश सुरात) मला कधी एकाच्या वर मोदक मिळालेच नाहीत! नाशिकमध्ये मोदक खायचा प्रयत्न केला होता, पण तिथं मोदकाऐवजी तिखट मिसळ पुढ्यात आली...जाऊ दे!

दादू : (चपळाईने विषय बदलत)...सदूराया, मी यंदा एकवीस गणपतींचं दर्शन करायचं ठरवलंय! -चौदा झालेसुद्धा!! तूसुद्धा असंच कर! सध्या तुला नि मला भरपूर वेळ आहे! नाही का?

सदू : (अतिथंडपणाने) परवा बघितलं तुला अंबानींच्या घरच्या गणपतीला!

दादू : (निरागसपणाने) तो तिसऱ्या नंबरचा होता!

सदू : (हेटाळणीच्या सुरात) तिथे आरती म्हणतानाही नीट टाळी वाजवत नव्हतास! कधी जमणार तुला टाळी?

दादू : (आश्चर्यानं) तूसुद्धा होतास की काय त्यांच्या आरतीला? कमालच झाली!!

सदू : (त्रोटकपणाने) मी नेहमीच असतो! सगळेच असतात! माझ्या बाजूला टाळ वाजवत नानासाहेब फडणवीसही होते!!

दादू : (नाक मुरडून) हॅ...! मी असल्या लोकांकडे पाहातसुद्धा नाही!!

सदू : (छद्मीपणाने) बाकीचे फिल्मस्टारही होते!

दादू : (भक्तिभावाने) माझं लक्ष फक्त बाप्पाकडे होतं!!

सदू : (तोऱ्यात) मीही असल्या लोकांकडे पाहात नाही म्हणा, कारण सगळे माझ्याकडेच पाहात असतात ना!!

दादू : (सावध होत) भारी गमजा मारतोस! लहानपणापासूनच तू-

सदू : (घाईघाईने विषय बदलून) बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं घराबाहेर पडायला लागलास, हे काय कमी आहे?

दादू : (रागारागाने) माझ्या घरात बसण्याच्या सवयीवर आणखी किती दिवस टोमणे मारणार आहात? मी आता बदललोय, सदूराया! मी हल्ली भरपूर फिरतो! फिरल्याशिवाय जग समजत नाही, हे कळलंय मला!

सदू : (आणखी एक टोमणा मारत) काही लोक म्हणतात की दीड वर्षापूर्वी मिळालेल्या जालीम इंजेक्शनमुळे तू हिंडायला लागलास!!

दादू : (त्वेषाने) लोक गेले चुलीत! मला इंजेक्शन देणारा अजून पैदा व्हायचाय!

गद्दार, फितुरांची औलाद, खोकेबहाद्दर...!

सदू : (काडी घालत) बाप्पाकडे काय मागितलंस?

दादू : (संतापाने बेभान होत) या गद्दारांच्या सरकारचं विघ्न नष्ट करा, माझ्या मऱ्हाटी दौलतीला लागलेलं ग्रहण सोडवा, असं साकडं घातलंय मी!

सदू : (शांतपणाने) त्यांनी असंच काहीसं साकडं गुवाहाटीच्या देवीला घातलं असणार!

दादू : (फुत्कार टाकत) सदूराया, कळतात बरं मला हे टोमणे!! तूसुद्धा त्या कमळवाल्यांच्या नादी लागून बिघडणार आहेस!

सदू : (चतुराईने)...पुढे काय करायचं ठरवलं आहेस?

दादू : (डब्बल चतुराईने) तुझं सांग आधी!

सदू : (मखलाशी करत) माझं काय? माझा हात हमेशा पुढेच आहे!! जो देईल त्याची टाळी घेणार!

दादू : (बेरकीपणाने) मी...मी किनई...कसं सांगू?

सदू : (उत्सुकतेने) सांग की! शेवटी काही झालं तरी मी तुझा भाऊ आहे ना?

दादू : (झाकली मूठ...) मी...मी...किनई, उरलेल्या सात गणपतींचं दर्शन घेणार आहे! जय महाराष्ट्र!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com