हौस ऑफ बांबू : मर्ढेकरांची माडी...!

नअस्कार! अमळनेरच्या साहित्य संमेलनाबद्दल काहीतरी वेडंवाकडं लिहीन, असं तुम्हाला वाटलं असेल, तर तुमचा अंदाज साफ चुकलाय!
Hous of bamboo
Hous of bamboosakal

नअस्कार! अमळनेरच्या साहित्य संमेलनाबद्दल काहीतरी वेडंवाकडं लिहीन, असं तुम्हाला वाटलं असेल, तर तुमचा अंदाज साफ चुकलाय! संमेलनाइतकंच महत्त्वाचं काहीतरी माझ्या आयुष्यात (सॉरी, शब्द चुकला...जीवनात) घडलं, म्हणून मी अंतर्मुख, हळवी आणि कावरीबावरी का काय म्हंटात, तशी झाल्येय.

दोन-चार दिसांपूर्वी सातारा तालुक्यातल्या मर्ढे या गावात एक नितांतसुंदर सोहळा पार पडला, त्या सोहळ्यातून मन अजून बाहेर यायला तयार नाही. बाळकृष्ण सीताराम मर्ढेकर हे मराठीतले एक युगप्रवर्तक कवी. ज्यांच्या काव्यपंक्तींचे मुहावरे झाले, कवितांच्या म्हणी झाल्या. ज्यांच्या कवितांनी वर्तमानपत्र-मासिकातल्या अनेक उपसंपादकांच्या पिढ्यांना लेखांचे मथळे पुरवले, असे मर्ढेकर. इतकेच नव्हे तर नव्या कविमंडळींच्या मनातला न्यूनगंड कमी केला, असेही मर्ढेकर.

खरं तर मराठी सारस्वतांच्या पुढल्या अनेक पिढ्यांनी त्यांचं कृतज्ञ असायला हवं. अशा या मर्ढेकरांच्या गावातल्या जीर्णशीर्ण घराचं ग्रामस्थांनी नूतनीकरण केलं, आणि गणपत वाण्याची एक अजरामर माडी तिथं उभी राहिली.

‘मसाप’च्या शाहूपुरी शाखेच्या (सातारा) विनोद कुलकर्णी यांची ही संकल्पना. मर्ढेकरांच्या पुत्रपौत्रांनीही आनंदानं त्या पडीक वास्तुची मुखत्यारकी ‘मसाप’ला देऊन टाकली...ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी दाराची कडी वाजवून त्या माडीत प्रवेश केला. (मर्ढेकरांनी स्वत:च दार उघडलं का, हे मराठी सारस्वताला अजून समजलेलं नाही. पण उघडलं असावं!) दाराला डोअरबेल नव्हती.

मर्ढे हे कवितेचं गाव व्हावं, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे, असं सरपंच सविता शिंगटे यांनी सांगितलं, तेव्हा काय थरारुन गेल्ये म्हणून सांगू? मराठी भाषेचं हे भाग्य नाही तर काय? महाराष्ट्रात अशी कवितेची गावं झाली तर संमेलनांची गरजच उरायची नाही. जाऊ द्या. संमेलनावर लिहायचं नाही, असं ठरलंय ना...

मर्ढेकरांच्या माडीबद्दल विचार करता करता काहीतरी विचित्र घडलं, आणि...आणि-

गणपत वाणी बिडी पिताना

म्हणे खाजवुनि

नुसतीच दाढी

‘‘इरेस पडलो जर बच्चमजी

या जागेवर बांधीन माडी!’’

बिडी पिताना गणपत वाणी

शिलगावे काड्यांवर काडी

दिनस्वप्नाच्या झोपेमाजी

फलाटदादा, चुकली गाडी!

युगामागुनी युगे लोटली

कळिकाळाचा तुटला सांधा

आम्ल साचले शब्दोशब्दी

नशीब वाजे धाधिंधिंधा!

पुन्हा अचानक जुळले हात

पुन्हा विटेवर चढली वीट

गणपत वाण्याच्या स्वप्नांचे

प्लास्टर चढले गा काँक्रिट!

भयाण मरक्या भवतालाचे

फेकून देऊनि जीर्ण जुनेरे

कालजयी ती उभीच माडी

-कडी वाजविती अरुणा ढेरे!

...हे असं घडलं! आता जरा बरं वाटतंय! थँक्यू हं...आणि हो, सॉरी, मर्ढेकर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com