Ding Tang
Ding Tangsakal

ढिंग टांग : कुठे गेला लवाजमा...?

शिवसेना शिंदे गटाच्या माननीय आमदार व आदरणीय नेत्यांची शिक्युरिटी काढून घेणेबाबत आदेश जारी झाला असून एका रात्रीत कंप्लीट लवाजमा गायब झाल्याने नेतेमंडळी हवालदिल झाली.
Published on

डिअरम डिअर होम्मिनिष्टर रा. नानासाहेब यांसी म. पो. काँ. बबन फुलपगार (बक्कल नं. १२१२ कदकाठी ५ फू. ५ इं. वजन अदमाशे बुटासकट ४५ , उमर ४५, छाती २७. फुगवून २७, राहनार मौजे बॉम्बे) याचा सॅल्युट. पत्र लिहिणेस कारण कां की, शिवसेना शिंदे गटाच्या माननीय आमदार व आदरणीय नेत्यांची शिक्युरिटी काढून घेणेबाबत आदेश जारी झाला असून एका रात्रीत कंप्लीट लवाजमा गायब झाल्याने नेतेमंडळी हवालदिल झाली आहेत.

साहेब, मी स्वत: एका शिंदेसाहेबांच्या आमदाराच्या शिकुरिटीमध्ये कर्तव्यावर होतो. पण काल सांजच्याला आमदारसाहेबांच्या बंगल्यावर मी असताना बक्कल नंबर १२२२ माझ्या नजदीक आला आनि म्हनाला की ‘बबनराव चंबुगबाळं आवरा, साहेबांचा निरोप घ्यायचा टायम आला!’

मी शांतपने बंगल्यात जाऊन साहेबांच्या समोर हुबा राहिलो. त्यांना बोललो की, ‘साहेब आमचा निरोप घ्यावा, आम्ही चाललो! पुन्ना भेट व्हईल न व्हईल’ त्यावर त्यांनी जबडा वासून इच्यायले, ‘का? काय जहालं?’ मी म्हनलो की, ‘अशानं असं झालं असून आदरनीय होम्मिनिष्टरसाहेबांनी अच्यानक शिवशेनेच्या सर्व्या आमदारांची शिकुरिटी कमती केली आहे. कालपोत्तर आम्ही चार हवालदार आनि जीप ड्रायवर असे पाच जन आपल्या संरक्षनाचे कर्तव्य करत होतो, पन आता वन अँड ओन्ली एकच हवालदार तुमच्यासोबत आसंल! राम राम!’

त्यावर आमदारसाहेबांना घामच फुटला. ते म्हनले, ‘अवो, अवो, अवो, असं काह्याला करता? मान्सानं फिरायचं कसं मंग?’ मी त्यांचा जड अंत:करनाने निरोप घेतला. सदरील आमदारसाहेबांनी शिकुरिटी नसल्यामुळे पुढचे सगळे दौरे रद्द केल्याचे आत्ताच मला कळले. ही जनतेचीच मोठी नुकसानी नाही का?

साहेब, मला फार फार वायट वाटले. आपन असा निर्नय का घेतला? याच शिंदेसेनेच्या आमदारांनी सुरत-गुवाहाटी गाठली तेव्हा त्यांच्या दिमतीला केवडा म्होटा फौजफाटा होता. गुवाहाटीवरुन परत आल्यावर हरेक आमदाराला तीन-तीन गाड्या भरुन पोलिस संरक्षन होते.

पुढे गाडी, मागे गाडी, गाडीमागे पोलिस व्हॅन, वायरलेस असा लवाजमा असे. शिंदेसाहेब सीएम झाल्यावर तोच जामानिमा कंटिन्यू राहिला. आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतसाहेबांना तर मोजून अठ्ठेचाळीस पोलिस कॉन्स्टेबल दिमतीला होते. येवढ्या फौजेनिशी तर युद्ध जिंकता येते साहेब! रोज या कॉन्स्टेबलांची परेड घ्यावी लागत होती.

परेडनंतरच मंत्रीमहोदयांची स्वारी निघत असे. मंत्रिमहोदय दौऱ्यावर निघाले की, रस्त्यावरुन धा-वीस मिनिटे त्यांचा ताफा पास व्हायला लागत होती. वतथापि, आपल्या होम डिपार्टमेंटने सुरक्षेचा आढावा घेऊन सर्व्यांची सुरक्षा कमी करन्याचा डिसिजन घेतल्याचे कळले. या लोकांच्या जिवाला धोका नसल्याच्या कारनाने शिकुरिटी कमी करणेत आल्याचे सांगन्यात आले.

तथापि, त्यांच्या जिवाला धोका होता की त्यांच्यामुळे कमळवाल्यांच्या करिअरला धोका होता, म्हनून त्यांना टाइट शिकुरिटीत ठेवणेत आले होते? हा खरा सवाल आहे. बाकी कायम वाय सुरक्षा घेत वाय वाय फिरनाऱ्या पुढाऱ्याला अचानक एक हवालदार घेऊन फिरायची वेळ आली की संकोचल्यासारखे होनारच.

कार्यकर्त्यांनाही आपला साहेब शिकुरिटीत फिरतो, याचे कवतिक असते. आता एकच एक गार्ड घेऊन फिरावे लागनार असल्याने, सर्व्यांचीच गोची झाली आहे.

साहेब, हल्ली शिवशेना आणि आपले फारसे जमत नाही का? मीडियामध्ये अशीच बोलवा आहे. वड्याचे तेल वांग्यावर काढू ने!! मुंबईसह पालिकेच्या इलेक्शनी होईपर्यंत तरी शिकुरिटी टाइट ठेवावी, अशी रिक्वेष्ट करणेसाठी हे निवेदन नशापानी न करिता होशोहवासमध्ये लिहिले असे. आपला आज्ञाधारक.

बबन फुलपगार (ब. नं. १२१२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com