
रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांना तब्बल तासभर वंदनीय श्रीनमोजींचा सहवास लाभला. या सहवासाने अनुनुनुभूत (जादा ‘नु’ आमचे) आणि अननननवर्चनीय (जाद ’न’ आमचेच!) असा आनंद मिळाला, मनाच्या गाभाऱ्यात सहस्त्र घंटा निदादल्या, आणि त्या अनुनादाने सारे आंतर घुमून उठले, असे या भेटीचे वर्णन पुतिन यांनी नंतर केजीबीच्या एका अधिकाऱ्याकडे केल्याचे समजते. शांघाय सहयोग संगोष्ठीं (हिंदीसक्तीमुळे हिंदी च्यानले बघत बसल्याचा हा परिणाम!) च्या निमित्ताने पुतिन-श्रीनमोजी भेट झाली. तियानजिन नावाचे शहर चीनमध्ये आहे. (आम्ही पहिल्यांदाच ऐकले. खोटे का बोला?) तेथे चिनी सर्वेसर्वा शी जिनपिंग (मोठा माणूस, पण नाव? शी:!!) यांनी त्यांची खातिरदारी केली.