
महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांच्याबाबत असेच काहीसे म्हणता येईल.आठवड्यापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आणि त्याच्यासोबत असलेल्या रैनानेही क्षणार्धात धोनीच्या पावलावर पाऊल ठेवले.
राम वनवासात निघाल्यावर लक्ष्मणाने कोणताही विचार न करता त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला. आजही बंधूप्रेमासाठी राम-लक्ष्मणाचे दाखले दिले जातात. काही जण तर प्रत्यक्षात हे नाते साकारतही असतात. महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांच्याबाबत असेच काहीसे म्हणता येईल. आठवड्यापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आणि त्याच्यासोबत असलेल्या रैनानेही क्षणार्धात धोनीच्या पावलावर पाऊल ठेवले. त्या दिवशी धोनीच्या देदिप्यमान यशाचा भावनिक पट सर्वत्र उलगडला जात असताना रैनाकडे मात्र दुर्लक्ष झाले. पण रैनाला त्याचे दुःख नव्हते, कारण धोनी हा त्याच्यासाठी भावनिक कप्पा आहे. सहा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यात धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी रैना स्वतःच्या टी शर्टवर धोनीचे नाव लिहून मैदानात उतरला होता. निवृत्तीच्या घोषणेमुळे धोनीऐवढी रैनाची चर्चा झाली नसली, तरी भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान मोठेच आहे. धोनीचा प्रभाव अभूतपूर्व होता, तसाच रैनाचाही आहे. ‘टीम इंडिया’कडे एकापेक्षा एक आक्रमक शैलीचे फलंदाज होते आणि आहेत, पण भारताकडून ‘ट्वेन्टी-२०’मध्ये पहिले शतक करण्याचा मान रैनाने मिळवलेला आहे. ‘आयपीएल’मध्येही त्याने भारतीयांमध्ये असाच पराक्रम केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रैना हा प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या प्रकारातील भरवशाचा फलंदाज. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय असो वा ‘ट्वेन्टी-२०’साठी; भारतीय संघाची मधली फळी तयार होत आहे. पण अजूनही युवराज आणि रैनासारखे ‘फिनिशर’ सापडलेले नाहीत असे म्हटले जाते. तसे पाहायला गेले तर दोन वर्षांपूर्वी रैना अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, पण अजून त्याची आठवण काढली जाते यातूनच त्याचे महत्त्व सिद्ध होते. अनेकदा रैनाच्या फलंदाजीचे वर्णन ‘रैना बरसे’ अशा शब्दांत केले जायचे, त्याची फलंदाजी किती तुफानी असायची हे लक्षात येते. रैनाने युवराजसह भारतीय संघासाठी चपळ क्षेत्ररक्षणाचा पाया रचला. क्षेत्ररक्षणामुळेही सामने जिंकता येतात, हे त्यांनी सिद्ध केले. रैनाचीही उपयुक्तता ‘मॅचविनर’सारखी होती.