कोल्हापूर निकालाचा उत्तरार्ध

कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. कारण, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज्यात झालेली विधानसभेची ही तिसरी पोटनिवडणूक होती.
कोल्हापूर निकालाचा उत्तरार्ध
Summary

कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. कारण, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज्यात झालेली विधानसभेची ही तिसरी पोटनिवडणूक होती.

कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. कारण, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज्यात झालेली विधानसभेची ही तिसरी पोटनिवडणूक होती. आघाडी सरकारच्या अस्तित्वावर भाष्य करणारी ठरेल अशी आणि शिवाय पाच राज्यांच्या निकालानंतर ही पहिलीच निवडणूक होत होती. काँग्रेस विरूद्ध भाजप अशी देगलूरपाठोपाठ कोल्हापुरातही लढत होती. कोल्हापूर उत्तरमध्येही शिवसेनेने पारंपरिक हक्काची जागा आघाडीधर्म पाळत काँग्रेसला दिली. पोटनिवडणुकीत भाजपने प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबवत शिवसेनेच्या मतदारांना आणि शिवसैनिकांना थेट भावनिक आवाहन केले. त्यामुळे या निकालाचेच नव्हे; तर प्रचार पद्धतीचे परिणामही येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आणि विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीवरही अपेक्षित आहेत.

शिवसेनेची तडजोड

विधानसभेच्या २०१९ च्या निकालात भाजप-शिवसेनेची निवडणुकीदरम्यान युती होती. शिवसेनेने १२६ जागांवर निवडणूक लढवली. यापैकी ११३ जागांवर शिवसेनेची लढत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झाली. १२६ पैकी ५६ जागांवर शिवसेनेला विजय मिळवता आला. शिवसेनेने २५ जागांवर काँग्रेसचा पराभव केला. त्यापैकी १५ जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. २९ जागांवर शिवसेनेने राष्ट्रवादीचा पराभव केला. त्यापैकी १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. काँग्रेसने जिंकलेल्या ४४ पैकी (१४७) २४ जागांवर शिवसेनेचा पराभव झाला, त्यापैकी १७ जागांवर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ पैकी (१२१) २८ जागांवर शिवसेनेवर विजय मिळवला होता. त्यापैकी २१ जागांवर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. देगलूर आणि कोल्हापूर उत्तर या दोन्ही जागांवर काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत केले होते. पोटनिवडणुकीत देगलूरपाठोपाठ कोल्हापूर उत्तरमध्येही शिवसेनेने युतीत दोन वेळेपेक्षा अधिक वेळा जिंकलेली जागा आघाडी धर्म पाळत काँग्रेसला दिली.

कोणत्याही प्रकारच्या युती किंवा आघाडीत जागा वाटपाची तडजोड असतेच. शिवाय मुंबईपट्टा वगळता इतरत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना ताकदीने लढत नाही, अशी कबुली खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच २३ जानेवारीला दिली होती. त्यामुळे स्थानिक बलाबल हा निकष जागावाटपात लावला तर ‘महाविकास’मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे शिवसेनेपेक्षा नेहमीच जड असेल, ही वस्तुस्थिती आहे. येत्या काळात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या नवीन रचनेत निवडणुकांसाठीच्या आघाडीत शिवसेनेची माघार कायम राहिली तर शिवसेनेपुढे पक्ष विस्ताराचे आवाहन अधिक खडतर होईल, हे कोल्हापूर उत्तरच्या जागा वाटपात आणि नंतर निकालातही दिसले.

प्रचारात ‘‘हिंदुत्व’’

कोल्हापूर उत्तरच्या प्रचारात प्रखर हिंदुत्वाचा भाजपचा सूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटच्या प्रचार सभेत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सनातन धर्माचा जयघोष करत भगव्या हिंदुत्वाची पताका फडकवत शिवसैनिकाला थेट साद घातली. हिंदुत्व केवळ भाजपच्याच प्रचाराचा भाग होता, असं नाही. गुढीपाडवा, रामनवमीच्या निमित्ताने निघालेल्या सर्वपक्षीय ‘शोभा यात्रा’ म्हणजे समाजामध्ये आणि परिणामी राजकारणात ठळक होत जाणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांचे प्रकटीकरण होते. मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांनंतरची शिवसेनेची हिंदुत्वाविषयीची संभ्रमावस्था उघड दिसते आहे. शिवसेनेने पुन्हा प्रखर हिंदुत्व अवलंबिले तर महाविकासमधील ''सेक्युलर'' काँग्रेसची भूमिका काय असेल हा प्रश्न येत्या काळात महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे भाजपविरोधात पुरोगामित्वाचा दिंडोरा पिटणाऱ्या पक्षांना येत्या काळात विचारधारा आणि त्यावर आधारित प्रचार याबाबतीतही अधिक सुस्पष्टता आणावी लागेल. याउलट प्रत्येकाने हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला तर निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा म्हणून हा मुद्दा बोथट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा संकेत ‘कोल्हापूर उत्तर’ने राज्याला दिला.

प्रादेशिक पक्ष आणि भाजप

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप १९८९ पासून तीन दशके युतीमध्ये राहिले. विधानसभेची २०१९ ची निवडणूकही शिवसेना-भाजपने एकत्र लढवली. भाजपसोबत विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान केलेली युती तोडून शिवसेना महाविकास आघाडीत सामील होऊन सत्तेत सहभागी झाली. शिवसेनेचा भाजपविरोध कोल्हापूर उत्तरामध्येही कायम राहिला. शिवसेनेच्या विरोधाचं हे सूत्र गृहीत धरून महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी भाजपला आखणी करावी लागणार आहे. देगलूरपाठोपाठ कोल्हापूर उत्तरची निवडणूक पूर्ण ताकदीने लढून भाजपने यासाठीची आपली तयारी स्पष्ट केली. महाराष्ट्रात सुमारे ४८ विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी लढत झाली. २०१९ला युती असल्यामुळे या सर्व मतदारसंघात भाजपची स्वतंत्र ताकद आजमावण्यात आलेली नाही. त्यामुळे जिथे यापूर्वी भाजपने निवडणूक लढवलेली नाही अशा मतदारसंघात निवडणुकीतून पक्षाचं अस्तित्व निर्माण करणे, हिंदुत्व आणि भ्रष्टाचार याभोवतीची प्रचार यंत्रणा राबविणे, मतांचा टक्का वाढविणे अशा प्रयोगांना भाजपने सुरुवात केलेली दिसते.

भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नियोजन सुरु असते. राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात घेतल्या तर एकमेकांना पूरक (आणि अनुकूल) असणारी ही जोडगोळी येत्या काळातही भाजपचं निवडणुकीसाठीचं नेतृत्व आणि नियोजन करेल हेही स्पष्ट आहे. आक्रमक फडणवीस यापूर्वीही विधिमंडळात महाविकास आघाडीला डोईजड झालेले दिसले. दुसरीकडे एकेकाळी ठरविक वर्तुळापलीकडे ठाऊक नसलेले चंद्रकांत पाटीलही सातत्याने माध्यमातून चर्चेची एकही संधी न दवडता (सततच्या प्रसिद्धीच्या नकारात्मक परिणामांची पर्वा न करता) राज्यभर अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी झालेले दिसतात. प्रसिद्धीचं हेच सूत्र आघाडीच्या स्थापनेच्यावेळी संजय राऊत यांनीही वापरलं होतं. भाजपच्या या रणनीतीकडे दुर्लक्ष करणं आघाडीला मारक ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com