ढिंग टांग : वहाग झाला महाग!

हल्ली जंगल पर्यटन भलते महाग झाले आहे. वहाग तर लईच महाग झाला आहे
dhing tang
dhing tangsakal media

आश्विनातली सकाळ. हवेत छान गारवा होता. ऐन, धावडा, काटेसावरीला हळू हळू जाग येत होती. ही झाडांची नावे आहेत. शिव्या नाहीत. जामूनबोडीच्या पाणवठ्यावर प्राण्यांची वर्दळ वाढत होती. जामूनबोडी म्हंजे प्राणिजगतातला कलानगरचा सिग्नलच आहे जणू! जरा तांबडे फुटले की तिथे वाहने तुंबतात…तसेच हे!

बफर झोनच्या सीमेवर मोहार्ली गेटवर पर्यटकांची गर्दी वाढत चालली होती. त्या गर्दीत एक क्यामेरा घेऊन आलेला सिनीअर म्हंजे मोठा पर्यटक आणि मोबाइल फोन घेऊन आलेला ज्युनियर, म्हंजे छोटा पर्यटकही होता. मोठ्या पर्यटकाने कानटोपी कानावर खेचली, आणि तो छोट्या पर्यटकाला म्हणाला, ‘‘स्वेटर घे हं पूर्ण हाताचा, मचाणावर मच्छर चावतात!’’

छोट्या पर्यटकाने ’यो’ म्हटले. ‘यो’ म्हंजे ‘हो’! (किंवा ‘नाही’ सुद्धा!!) असो. मोहार्ली गेटवर सफारीसाठी जिपा तयार होत्या. पण एका जीपच्या सफारीला आठ हजार रुपये पडतात, हे ऐकून मोठ्या शिकाऱ्याने पाण्याची बाटली तोंडाला लावली.

‘‘आठ हजार? पण वाघ दिसणार याची ग्यारंटी काय?,’’ मोठ्या पर्यटकाने विचारले. त्यावर जंगल गाइड ‘ग्यारंटी काही नाही’, म्हणाला. वर क्यामेरा अलाऊड नाही, असेही त्याने बजावले. मोठ्या पर्यटकाने पुन्हा पाण्याची बाटली तोंडाला लावली.

हल्ली जंगल पर्यटन भलते महाग झाले आहे. वहाग तर लईच महाग झाला आहे. एक शेपूट बघायला एवढे लांब यायचे आणि उगीच वणवण करुन, दोन-चार ढोकऱ्या (हा पक्षी असतो म्हणे.) लावऱ्या (हासुद्धा च्यामारी एक पक्षीच आहे!), आठदहा माळठिसके (हे हरीण असावे, असा वहीम आहे...) साताठ रानकोंबड्या, आणि गबदुलच्या गबदुल माजलेले रानगवे बघून यायचे!! एवढ्यासाठी आठ हजार प्लस येण्याजाण्याचा खर्च, निवासाचे भाडे आणि भोजनाचा भुर्दंड? छ्या!! यापेक्षा आपले बोरिवली नॅशनल पार्क किंवा गेलाबाजार, भायखळ्याची राणीबाग बरी! मोठ्या पर्यटकाच्या मनात नकारात्मक विचारांचे कांग्रेस गवत माजले.

मोठा पर्यटक जाम हैराण झाला! तरीही छोट्या पर्यटकासाठी त्याने पैसे भरुन जीपमध्ये जागा पटकावली. सफारी निघाली…

‘‘हे सरळ झाड कुठलं बॅब्स?’’ छोट्या शिकाऱ्याने विचारले. त्याचे निसर्गविषयक कुतुहल कौतुकास्पदच होते.

‘‘त्याला बांबू म्हणतात बरं का…बांबू!’’ मोठ्या पर्यटकाने त्याला बहुमोल माहिती दिली.

‘बांबूचे उपयोग काय’, हा पुढील संभाव्य सवाल टाळण्यासाठी त्याने क्यामेरा काढून उगीचच जंगलावर रोखला.

जीपमध्ये पुढल्या सीटवर बसलेला जंगल गाईड (याची फी वेगळी द्यायची असते, हे कळल्यावर मोठ्या पर्यटकाने पाण्याची संपूर्ण बाटली संपवली होती.) काटेसावरीचे पूर्ण वाढ झालेले झाड दाखवत होता. ‘‘तुमच्या शेहेरगावात काटेसावरीला काटे असतंत, हिते फक्त फांदोऱ्याले काटे असतंत’’ जंगल गाईड म्हणाला. त्याला काटेरी फोकाने हाणावे, या हिंस्त्र विचारामुळे मोठ्या पर्यटकाचे हात शिवशिवले.

‘‘अहो, उगीच भंकस काटेसावर दाखवू नका! वाघ दाखवा, वाघ!’’ मोठ्या पर्यटकाने आवाज चढवला. छोट्या पर्यटकाने त्याच्यावरही ’यो’ अशी प्रगल्भ प्रतिक्रिया नोंदवली.

‘‘वाघ बघणं सोपं असतंय का, साहेब? ग्यारंटीचा वहाग तुम्हाला बघायचा आसंल तर भायखळ्याला जावा! तिथं दिसतोय वहाग पन्नास रुपयात…वर पेंग्विनसुध्दा!’’ जंगल गाईडने माहिती दिली. तेवढ्यात ‘वाघ, वाघ’ अशी हाकाटी उठली. नेपतीच्या झुडपात एक शेपूट नष्ट होताना अस्पष्ट दिसले. ते वाघाचे आहे, असे जंगल गाइड म्हणाला.

मोठा पर्यटक फोटो काढत होता. शेपूट बघून छोटा पर्यटक म्हणाला, ‘‘यो!’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com