अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना अचानक पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची चिंता वाटू

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना अचानक पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची चिंता वाटू
अध्यक्ष ज्यो बायडेन
अध्यक्ष ज्यो बायडेन sakal

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना अचानक पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची चिंता वाटू लागल्याचे पाहून आणि ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले असेल, काहींना हायसे वाटले असेल तर काही जण गोंधळात पडले असतील. याचे कारण ‘पाकिस्तान हा सर्वाधिक धोकादायक देशांपैकी एक देश आहे’, असे विधान करणाऱ्या बायडेन यांच्या प्रशासनाने नुकतीच या ‘धोकादायक देशा’ला एफ-१६ लढाऊ विमानांसाठी देखरेख व आनुषंगिक खर्चासाठी भलीमोठी रक्कम दिली. ती दिल्यानंतर भारताने स्वाभाविकपणे स्पष्ट शब्दांत अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली होतीच. या नाराजीवर उतारा म्हणून तर बायडेन यांनी हे विधान केले नाही ना,

अशी शंका घ्यायला जागा आहे. गेल्या जवळपास सात दशकांच्या इतिहासावर नजर टाकली तरी ही महासत्ता या धोका बनलेल्या देशाच्या पाठीशी कायमच राहिली. अनेकदा ‘मी मारल्यासारखे करतो...’ या पद्धतीने तो देश पाकिस्तानची पाठराखण करीत राहिला. पाकिस्तानकडे सुसंगत धोरण व सुरक्षित नियंत्रण यंत्रणा नसल्याने त्या देशाची अण्वस्त्रे हा मोठाच धोका आहे, याचा साक्षात्कार अमेरिकेला आत्ताच का व्हावा? वास्तविक भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याच धोक्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या आपल्या ताज्या दौऱ्यात केला होता. परंतु तेथील अण्वस्त्रांचा प्रश्न आणि पाकिस्तानला मदत या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, असे बोधामृत अमेरिकेने त्यावेळी पाजले. या सगळ्या विसंगती तयार होतात, याचे कारण अमेरिकेला महासत्ता म्हणून मिरवताना नेहेमी एक मुखवटा धारण करावा लागतो आणि साऱ्या जगातील शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य यांची जबाबदारी आपल्यावर आहे,

असे दाखवावे लागते. दुसऱ्या बाजूला त्या देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या काही विशिष्ट गरजा आहेत. पश्चिम आशिया आणि मध्य आशियाशी संबंध ठेवताना पाकिस्तान अमेरिकेला उपयुक्त वाटतो; तर चीनच्या वाढत्या वर्चस्वाला,सामर्थ्याला लगाम घालण्यासाठी भारतमैत्रीची गरज भासते. दोन्ही देशांना,म्हणजे भारत व पाकिस्तानला चुचकारत राहायचे; पण कृती मात्र आपल्याला हवी तशीच करायची, असा अमेरिकेचा प्रयत्न असतो. ती चाल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी बदललेली नाही. त्यांची वेळ चुकली एवढे फार तर म्हणता येईल. युक्रेनच्या विरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला आठ महिने झाले आहेत.

त्याने युरोपसह सारे जग त्रासले आहे. पुरवठा साखळ्या विस्कळित झाल्या असून इंधन टंचाई, अन्न टंचाईसारख्या समस्यांचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. ते थांबावे म्हणून कोणताही राजनैतिक पुढाकार घेणे तर सोडाच;पण युक्रेनला सातत्याने आर्थिक आणि युद्धसामग्रीची मदत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मध्य आशियाला तसेच आशिया-आफ्रिकेतील देशांना युद्धाची मोठी झळ बसते आहे. कोविडनंतर आर्थिकदृष्ट्या सावरण्याच्या त्या देशांच्या प्रयत्नांवर या संघर्षामुळे मोठाच घाव घातला गेला आहे. या सर्व देशांना दिलासा द्यायचा तर अमेरिका युद्ध थांबविण्याच्या प्रयत्‍नांना ठोस दिशा देऊ शकते. पण त्यांना ते करायचे नाही. पण मग निदान शांततेचे आपण उपासक असल्याचा आव तरी अमेरिकेने आणू नये. आमच्या नजरेतून जे अमेरिकेचे राष्ट्रहित आहे, तेच सर्वोच्च मानतो, बाकीच्या गोष्टी त्यानंतर, असा पवित्रा घेतला तर निदान त्यात प्रामाणिकपणा तरी जाणवेल.

बायडेन यांच्या विधानानंतर पाकिस्तानातून जो संताप व्यक्त झाला, त्याचाही समाचार घेणे आवश्यक आहे. पाकिस्तान आगीशी खेळत आहे, ही गोष्ट जगाला आत्ताच कळली अशातला भाग नाही. अनेकदा आणि अनेक प्रसंगांत तेथील जिहादी गटांचा वाढता उपद्रव आणि सामर्थ्य केवळ भारतीय उपखंडासाठी नव्हे, तर जगासाठी संकट ठरेल, असा इशारा भारत देत आला आहे. भारतापाठोपाठ पाकिस्तानने १९९८मध्ये अण्वस्त्र चाचणी केली, तेव्हा या दोन्ही देशांना एकाच मापाने तोलणे गैर होते. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अमेरिकेने तेच केले. याचा परिणाम म्हणजे हे गट अधिकाधिक उन्मत्त होत गेले.

त्यांना आवर घालणे आता पाकिस्तानी राज्यकर्त्यांना जड जात आहे. बायडेन ‘धोकादायक देश’ म्हणाल्याने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असून, अमेरिकी राजदूताला इस्लामाबादेतील परराष्ट्र कार्यालयात बोलावून बायडेन यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. सर्वच राजकीय नेते आता या प्रश्नावरून एकीकडे अमेरिकी अध्यक्षांवर आणि दुसरीकडे परस्परांवर आगपाखड करीत आहेत. पण हे सगळे करण्यापेक्षा थोडे जरी आत्मपरीक्षण केले तरी त्याचा त्या देशाला फायदा होईल.

आपण एका महासत्तेचे प्यादे म्हणूनच का ओळखले जातो, आपल्यावर अमेरिका, चीन, सौदी अरेबिया आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडे सतत हात का पसरावे लागतात, दहशतवादाची झळ बसत असूनही जगातील दहशतवादाचा पुरस्कर्ता ही ओळख पुसून टाकण्यात अपयश का येत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पाकिस्तानी राजकारण्यांनी निदान आता तरी करायला हवा. त्या देशातील अण्वस्त्रांचे नियंत्रण चुकीच्या हातात गेले तर होणारा विध्वंस खुद्द त्या देशालादेखील भस्मसात करेल, हे लक्षात घ्यायला हवे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात एक साधन म्हणून वापरण्याचा हा विषय नाही, याची जाणीव बायडेन यांनीही ठेवली तर बरे.

जगापुढे आपण आपली जी प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न करतो, तसे खरोखर बनण्याचा प्रयत्न करणे, हे चांगले जगण्यासाठी आवश्‍यक असते.

- सॉक्रेटिस, तत्त्वज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com