भाष्य : वणवे टाळू, विनाश थांबवू!

वणव्यांमुळे देशात दरवर्षी वनसंपदेची अपरिमित हानी होत असते. वणवे लागण्यापेक्षा लावले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात ही समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे.
wildfire
wildfiresakal

- सचिन ओव्हाळ

वणव्यांमुळे देशात दरवर्षी वनसंपदेची अपरिमित हानी होत असते. वणवे लागण्यापेक्षा लावले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात ही समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे. त्यामुळे नापिकी, पशुधनाची हानी, भूजलपातळी खालावणे असे परिणाम जाणवत आहेत.

महाराष्ट्रात सगळीकडे डोंगरमाथ्यांवर इथून पुढे दीड-दोन महिने वणवे लागलेले दिसायला लागतील. जंगलांना वणवे लागण्याचा काळ म्हणजे प्रामुख्याने जानेवारी ते एप्रिल असा चार महिन्यांचा काळ असतो. पर्यावरणाच्या दृष्टीने वणवा हा अतिशय चिंताजनक विषय आहे. भारतीय वन सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, महाराष्ट्र वणवा लागण्याच्या बाबतीत देशात अव्वल आहे.

फेब्रुवारी व मार्चमधील अवघ्या पाच आठवड्यांत महाराष्ट्रातील अरण्यांच्या दीड हजार ठिकाणी वणवे लागले. ही संख्या देशातील कमी वेळात सर्वात जास्तीच्या आगी म्हणून नोंदवली गेली आहे. भारतीय अरण्य सर्वेक्षण संस्थेच्या (एफएसआय) अहवालानुसार, मागील वर्षी जानेवारीपासून मार्चपर्यंत देशात २२ हजार १२८ वणवे लागले, असे सांगण्यात आले.

याच कालावधीत महाराष्ट्रात दोन हजार ४८८ वणवे लागल्याची नोंद झाली आहे. ‘एफएसआय’च्या माहितीप्रमाणे, यातील बरेचसे वणवे हे मानवाकडूनच लावले गेले आहेत. अरण्यातील दाट झाडींना मुद्दाम आगी लावल्या जात आहेत. वणवा लागणे हा नैसर्गिक पंधरा टक्के आणि मानवनिर्मित पंच्च्याऐंशी टक्के आहे. यातूनच जंगलांबाबतची उदासीनता दिसून येते.

सातारा, कोकण आणि पुणे जिल्ह्यात कुरण क्षेत्र जास्त असून, या भागात मानवनिर्मित वणव्यांचे प्रमाण अधिक आहे. याबाबत अनेक चुकीचे समज आणि अनास्था जाणवते. या भागातील शेतकरी जास्त प्रमाणात वणवे लावत असतात, असे दिसून येते. शेतातील बांधाचे वाढलेले गवत पेटवणे, तरवे अथवा वाफे पेटवणे यांच्यासाठी लावलेल्या आगीतून डोंगरांना वणवे लागत आहेत. परंतु हे लागलेले वणवे विझवणे किंवा डोंगरांना वणवेच लागू नयेत, यासाठी मात्र कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही किंवा उपाय योजले जात नाहीत.

डोंगरांना किंवा कुरणांना लागलेले वणवे हे सहजासहजी विझवणे शक्य नाही. वणवा लागलेल्या भागात उंच डोंगरांवर, आड भागात पोहोचणे अवघड जाते. आग नियंत्रणात आणण्यासाठी काय सामग्री वापरायची, यासाठीच्या साहित्यांसाठीच्या आर्थिक नियोजनाची कमतरता, यामुळे आग विझवणे अवघड होते. त्यामुळे वणवा लागूच नये, यासाठी काम करण्याची प्रकर्षाने आवश्यकता आहे.

नैसर्गिकरित्या वणवे लागणे इतकी आपल्याकडे घनदाट आणि हजारो मैल पसरलेली जंगले आपल्याकडे निश्‍चितच नाहीत. आपल्याकडे डोंगरांना, जंगलांना अनवधानाने आग लागण्याचे प्रमाण कमी आहे. आगीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वाढतो आहे. त्यात भर जागतिक तापमानवाढीने पडत आहे.

जळालेल्या डोंगरांवरून पहिल्याच पावसात प्रचंड प्रमाणात माती दगड-गोटे मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनीमध्ये, शेतांमध्ये वाहून येत आहेत. मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होत आहे. सर्व डोंगर जाळून टाकण्याचा विपरित परिणाम मोठा दिसत आहे. डोंगरावर उगवलेली अथवा शेतकऱ्यांनी, पर्यावरणप्रेमींनी लावलेली नवीन रोपटी जळून खाक होतात.

औषधी वनस्पती, वेली यांचेही मोठे नुकसान होत आहे. हेच चित्र कोकणात पाहिले तर आंब्याच्या आणि इतर फळांच्या बागा मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होत आहेत. क्षणार्धात मोहर आलेली बाग शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळून खाक होताना दिसते. तर वन्यजीवांची होणारी हानी तर भरून न निघणारी आहे. कितीतरी पशू-पक्षी वणव्यात भाजून मृत्यूमुखी पडत आहेत.

अनेक पक्ष्यांची घरटी पिल्लांसकट जळून जात असतील; कदाचित याच कारणामुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजातीही नष्ट झाल्या असाव्यात. याची आपल्याला थोडीही जाण व खंत नाही. वणव्याचा पशुपालनावरही मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होत असल्याचे जाणवते. सततच्या वणव्यानंतर परिसरातील पशूपालन जास्त खालवलेले दिसते. पशुपालनासाठी पुरेसा चारा उपलब्ध होत नाही.

चाऱ्याचा तुटवडा भासतो; परिणामी भाकड जनावरांचे प्रमाण देखील वाढत आहे. पशूपालन अवघड आणि जिकिरीचे होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता वाढत आहे.डोंगर वणव्याने वर पेटतो आहे आणि खाली असलेले लोक ते पाहूनही काहीही करत नाहीत. कोणाला त्याने काहीही फरक पडत नाही. मुलांना पेटता डोंगर पाहून खेळ/गंमत वाटते. याबाबत कोणालाही थोडीही काळजी किंवा खंत वाटत नाही.

वणव्याच्या परिणामांची पर्वा कोणालाही नाही. कितीतरी झाडे, औषधी वनस्पती, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्ष्यी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून त्यांची एक पिढी नष्ट होत असेल. या वणव्यात कितीतरी मोठा संहार होतो, याचा आपण विचारच करत नाही. परंतु याचा उलटा परिणाम पर्यावरणाचा ऱ्हास आणि मानवी जीवनावर होतो आहे. गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.

वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते. शेतातील चारा खाक झाल्याने जनावरांना चारा मिळत नाही. चाऱ्याअभावी जनावरे भटकतात. अशक्त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात. पावसाच्या पाण्यासोबत डोंगर माथ्यावरील माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते. जमिनीची सुपीकता कमी-कमी होत जाऊन ओसाड नापीक मुरूमाड माळरान बनायला लागते. जमिनीची धूप होऊन जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होत जाते.

डोंगरावरून मोठ्या प्रमाणात गाळ, दगड-गोटे शेतात वाहून येतात. शेत नापीक आणि गाळाने भरून जाते. शेतीचे मोठे नुकसान होते. गवत पालापाचोळा जळून गेल्याने पावसाचे पाणी डोंगवरून वेगाने वाहून जाते. शेतात पाणी शिल्लक राहात नाही. भूगर्भातील पाणीपातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात. वणवामुक्त परिसर घडवून आणण्याकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली पाहिजे. संवेदना जागवल्या पाहिजेत.

प्रतिबंधक उपाययोजना

वनात स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे. वनात कोणीही बिडी, सिगारेट ओढून त्याची जळती थोटके इतरत्र फेकू नये. वनातील अथवा वनालगतच्या शेतातील वनोपज गोळा करण्यासाठी त्या झाडाखालील पालापाचोळा जाळू नये. अथवा खबरदारी घ्यावी.

रात्री वनातून जाताना हातात टेंभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. वनालगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये. सरकारी व खासगी जंगलात, वनांमध्ये, कुरणांमध्ये सहा व बारा मीटरच्या जाळरेषा काढाव्यात.

(लेखक पर्यावरणविषयक अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com