बोर : जैवविविधतेचं जंगल

बोर : जैवविविधतेचं जंगल

नियोजनबद्ध व्याघ्रसंरक्षण हे भारताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. जगातील इतर देशांचा विचार केला तर, ज्या देशांत नैसर्गिक निवासस्थानी वाघ आढळतात त्यांत सर्वात जास्त वाघांची संख्या भारतात आहे. त्यामुळे साहजिकच वाघांवर करण्यात आलेला अभ्यास, वेळीच उचललेली कठोर पावलं आणि शासनाचा मिळणारा पाठिंबा यांमुळे व्याघ्रसंवर्धनाबाबत आपण जगासमोर मापदंड ठेवला आहे आणि तरीही आपण व्याघ्रसंवर्धनाबाबत म्हणावे तितके समाधानी नाही. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण, आहे त्या परिस्थितीबद्दल समाधानी असणं हे माणसाला निष्क्रिय करतं. त्यामुळे, निरनिराळ्या प्रयत्नांनी व्याघ्रसंवर्धनासाठीचे नवनवीन पैलू तपासण्याचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा प्रयत्ना आपण आजही करत आहोत. आपल्या शिस्तबद्ध नियोजनाचा भाग म्हणून ‘व्याघ्रप्रकल्प’ ही संकल्पना पुढं आली. सन १९७३ मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ची घोषणा झाल्यावर पहिल्यांदा भारतातील नऊ जंगलांना व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. फेब्रुवारी २०२१ मध्ये ‘श्रीविलीपुथूर-मेगमलई’ या ५१ व्या व्याघ्रप्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि व्याघ्रप्रकल्पांचा आकडा वाढला.

महाराष्ट्राबाबत विचार केला तर आपल्याकडे सहा जंगलांना व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. त्यापैकी एक व्याघ्रप्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात, तर उर्वरित पाच व्याघ्रप्रकल्प पूर्व महाराष्ट्रात. पैकी वर्धा जिल्ह्यातील ‘बोर व्याघ्र प्रकल्प’ हे एक आगळंवेगळं जंगल. आपल्याकडील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी हा सर्वात छोटा व्याघ्रप्रकल्प. सन २०१४ मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळण्यापूर्वी बोर हे केवळ अभयारण्य होतं. मात्र, या जंगलाचं भौगोलिक स्थान आणि व्याघ्रसंवर्धनातील महत्त्व लक्षात घेऊन या जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. तत्पूर्वी, सन १९७० मध्ये या जंगलाला अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. बोर हे जंगल सातपुडा-मैकल पर्वतरांगांमध्ये येतं. हीच सातपुडा-मैकल पर्वतरांग पुढं कान्हा या मध्य प्रदेशातील व्याघ्रप्रकल्पापर्यंत पसरलेली आहे. जंगल आकारानं लहान असलं तरी ते जैवविविधतेनं संपन्न-समृद्ध आहे.

या जंगलाला बोर हे नाव मिळालं ते इथं असलेल्या मुबलक बोरांच्या झाडांमुळे. या जंगलात पळसाची झाडंही भरपूर प्रमाणात आहेत. याशिवाय, इतर झाडंही पुष्कळ आहेत. बोर अभयारण्य प्रामुख्यानं टेकड्या, उंच-सखल भाग आणि गवताळ प्रदेश यांनी तयार झालेलं आहे. शिवाय, इथं पाणीही चांगल्या प्रमाणात आहे. इथं असलेलं बोर धरण हा पाण्याचा मोठा स्रोत आहे. हे धरण सेलू तालुक्यातील बोर या नदीवर बांधण्यात आलं आहे. 

बोर धरणाच्या काठावर वसलेल्या या अभयारण्याला नवीन बोर अभयारण्याचा काही भाग जोडण्यात आला आणि सुमारे १३८.१२ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या कोअर भागाला व्याघ्रप्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. हा कोअर भाग पेंच व्याघ्रप्रकल्पाचा ‘सॅटेलाईट कोअर भाग’ म्हणून ओळखला जातो. म्हणजे या व्याघ्रप्रकल्पाचं व्यवस्थापन पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रसंचालकांच्या कक्षेत येतं.

एवढ्या छोट्या भागाला व्याघ्रप्रकल्प म्हणून मान्यता देण्याचं कारण काय असा प्रश्न अनेक निसर्गप्रेमींच्या मनात असेल. तर याचं उत्तर म्हणजे, या जंगलाचं भौगोलिक स्थान. या अभयारण्यात वाघांचा असलेला वावर हे तर कारण होतंच. वाघ हा मुळात हद्द ‘घोषित’ करून एकट्यानं राहणारा प्राणी आहे. पिल्लं आईजवळ असण्याचा सुमारे दोन वर्षांचा काळ हाच वाघांच्या आयुष्यातील ‘कौटुंबिक’ काळ म्हणता येईल. यानंतर ही पिल्लं आईपासूनही दूर होतात आणि आपली स्वतःची हद्द निर्माण करतात. या कालावधीत हे युवा वाघ आपल्या जन्मस्थानापासून पांगतात. अशा वाघांनी काहीशे किलोमीटरचा प्रवास करून आपली हद्द शोधली आहे. या पांगण्याच्या क्रियेत आणि नवीन हद्द शोधण्याच्या क्रियेत त्यांना सुरक्षित मार्गाची गरज असते. या सुरक्षित मार्गाला ‘कॉरिडॉर’ असं म्हणतात. भारतातील बहुतांशी जंगलं या कॉरिडॉर्सनी एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. इथंच बोर या जंगलाचं महत्त्व अधोरेखित होतं. बोरच्या ईशान्य दिशेला पेंच हा व्याघ्रप्रकल्प आहे, तर पूर्व ईशान्य दिशेला नागझिरा हा व्याघ्रप्रकल्प आहे. पूर्व आग्नेय दिशेला उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आहे, तर आग्नेय दिशेला ताडोबा हा व्याघ्रप्रकल्प आहे. जंगलाच्या पश्चिम वायव्य दिशेला मेळघाट हा व्याघ्रप्रकल्प आहे, तर वायव्य दिशेला सातपुडा हा व्याघ्रप्रकल्प आहे. या सर्व जंगलांना जोडण्यात आणि वाघांच्या पांगण्याच्या क्रियेत बोर हा व्याघ्रप्रकल्प अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सन २०१४ मध्ये या जंगलाला व्याघ्रप्रकल्प म्हणून मान्यता मिळाली होती. आता वनविभागानं या जंगलाच्या सीमा वाढवून सुमारे ६७८.१५ चौरस किलोमीटरचा बफर भाग या जंगलाला जोडला आहे. त्यामुळे जंगलाचं एकूण क्षेत्रफळ सुमारे ८१६.२७ चौरस किलोमीटरपर्यंत वाढलं आहे.

वाघांसाठी आदर्श अधिवास, याचबरोबर बोरनं इतर जैवविविधताही मोठ्या प्रमाणावर जपली आहे. उन्हाळ्यात बहरणाऱ्या पळसाचा मकरंद लुटण्यासाठी नानाविध प्रकारचे पक्षी पळसाच्या झाडांवर गर्दी करतात. याशिवाय, अनेक पाणवठ्यांवरही पक्ष्यांची गर्दी पाहायला मिळते. उन्हाळ्यात या जंगलात पक्षीनिरीक्षक मोठ्या प्रमाणावर येतात ते याचमुळे. उंच-सखल भागामुळे आणि टेकड्यांमुळे इथं बिबट्यांचंही वास्तव्य चांगल्या प्रमाणात आहे. 

मी एकदा कुरई-कुटी या भागात फिरत असताना घडलेला प्रसंग मला आठवतोय. आम्हाला सांबरांच्या धोक्याच्या सूचनेचा आवाज अचानक ऐकू आला. आम्ही या टेकडीवर असणाऱ्या सपाट माळरानावर होतो. गवत सुकलेलं होतं आणि सुकलेल्या गवतात बसलेल्या बिबट्यावर आमच्या मार्गदर्शकाची नजर पडली. बिबट्या आमच्या अगदी समोर बसला होता. आमचा मार्गदर्शक आम्हाला हर तऱ्हेनं तो बसलेली जागा समजावून सांगत होतं. मात्र, आम्हाला काही बिबट्या नजरेस पडत नव्हता. 

इतर जंगलांप्रमाणे इथले मार्गदर्शकही स्थानिक आहेत. त्यांची जंगलावर चांगलीच नजर बसलेली आहे. जंगलाचं उत्तम ज्ञान त्यांना आहे. आम्हाला मात्र काही केल्या बिबट्या बसलेली जागा दिसत नव्हती. अखेर थोड्या वेळानं आमच्या अगदी समोर बिबट्या उभा राहिला आणि गवतातून चालू लागला. आमच्या नजरेवरची शहरीपणाची झापडं उघडली आणि अखेर आम्हाला बिबट्या दिसला!

जंगलाचा छोटा आकार आणि तरीही त्यात सामावलेली जैवविविधता यामुळे बोर हे जंगल निराळंच सुख देऊन जातं. एकदा या जंगलाला भेट दिली की त्याच्या प्रेमात न पडणारा जंगलप्रेमी आढळणार नाही. केवळ वाघ बघायचाय एवढीच अपेक्षा ठेवून या जंगलात कधीच जाऊ नये. व्याघ्रदर्शनाबरोबरच जंगलाच्या इतर सौंदर्याचाही आनंद लुटला की बोरचं निराळेपण जाणवतं आणि मग दरवर्षी एकदा तरी पावलं बोरच्या दिशेनं वळतातच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कसे जाल? 
पुणे/मुंबई-वर्धा-बोर किंवा पुणे/मुंबई-नागपूर-वर्धा-बोर

भेट देण्यास  उत्तम कालावधी :   ऑक्टोबर ते मे

काय पाहू शकाल? 
सस्तन प्राणी : वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचिचुंद्री, तीनपट्टी खार, मुंगूस, उदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, रानससा, वानर, कोल्हा, रानकुत्रे, खोकड, चांदी अस्वल, रानडुक्कर, अस्वल, रानमांजर, चितळ, सांबर, भेकर, नीलगाय, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर, इत्यादी.

पक्षी : कबरा, चिपका, हरियाल, हळद्या, टकाचोर, भृंगराज, सोनेरी पाठीचा सुतार,  सातभाई, राखी वटवट्या, जंगलवटवट्या, यलो-आईड् बॅबलर, शिंपी, मोर, तिसा, शिक्रा, चष्मेवाला, स्वर्गीय नर्तक, नाचरा इत्यादी.

सरपटणारे प्राणी : कासव,  सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धूळनागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, नाग, फुरसं, मण्यार, घोणस इत्यादी.

वृक्ष : साग, आंबा, सालई, मोवई,  करू, ऐन, अर्जुन, जांभूळ, कुंभ, बहावा, रोहन, धावडा, शिवण, उंबर, वड, पिंपळ, भेरा, आवळा, बेहडा, हिरडा, गराडी, हल्दू, खैर, बिजा, कुसुम, सावर, पळस, बेल, मोह, तेंदू इत्यादी.
 

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com