अलौकिक निसर्गसौंदर्याचं ‘भद्रा’

भद्रा व्याघ्रप्रकल्पातील वाघ.
भद्रा व्याघ्रप्रकल्पातील वाघ.

पश्चिम घाटात निसर्गाच्या प्रत्येक बाबीत विविधता आढळते. गुजरात राज्यात सुरू होऊन केरळ राज्यापर्यंत विस्तार असणाऱ्या या पश्चिम घाटाच्या जंगलांच्या प्रकारातही वैविध्य दिसतं. या पश्चिम घाटाचा बराचसा भाग कर्नाटक या राज्यात येतो, त्यामुळे कर्नाटकाला जैवविविधतेचा वरदहस्त लाभलेला आहे. इथं सापडणाऱ्या काही प्रजाती जगात केवळ पश्चिम घाटातच आढळतात. भद्रा नदीच्या खोऱ्यात असंच एक अप्रतिम जंगल आहे व ते म्हणजे ‘भद्रा व्याघ्र प्रकल्प’. मध्यभागी भद्रा नदीचं खोरं आणि आजूबाजूनं मुळ्ळयनगिरी, गंगेगिरी, बाबा बुदनगिरी आणि हेब्बेगिरी या डोंगररांगांमध्ये पसरलेल्या या जंगलाला पूर्वी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला होता.  शिवमोगा आणि चिकमगळूर या जिल्ह्यांत असलेल्या या जंगलाला सन १९५१ मध्ये अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. 

‘जगारा व्हॅली वन्यजीव अभयारण्य’ म्हणून सुरुवातीला नाव मिळालेल्या या सुमारे ७७.४५ चौरस किलोमीटर जंगलाला म्हैसूर प्रशासनानं अभयारण्य म्हणून मान्यता दिली होती. हे नाव इथं असणाऱ्या ‘जगारा जायंट’ या कर्नाटक राज्यातल्या सर्वात मोठ्या सागाच्या झाडावरून पडलं आहे. या झाडाचा घेर सुमारे ५.१ मीटर असून उंची सुमारे ३२ मीटर आहे. हे झाड ४०० वर्षं जुनं आहे असं सांगितलं जातं. या अभयारण्याच्या निर्मितीनंतर, इथं असणाऱ्या जैवविविधतेचं शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आलं. इथल्या जैवविविधतेचं संरक्षण नजरेसमोर ठेवून सन १९७४ मध्ये या अभयारण्यात आणखी भाग वाढवण्यात आला आणि सुमारे ४९२.४६ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या भद्रा वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली.

या नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या अभयारण्याचं पहिलं पर्यावरणीय सर्वेक्षण प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. उल्लास कारंथ यांनी सन १९८० मध्ये केलं. ‘‘वैध शिकारीला आळा घालणं आणि तर्कसंगतपणे केलेलं वनीकरण यातून अगदी कमीत कमी व्यवस्थापनातही वन्यजीवनासाठी या अभयारण्याचं रूपांतर स्वर्ग म्हणून करता येईल,’’  अशा शब्दांत त्यांनी या अभयारण्याचं महत्त्व अहवालात नोंदवलं आहे. पुढं त्यांच्या या सर्वेक्षणावर आधारित वनविभागानं केलेल्या प्रयत्नांमुळे या अभयारण्याला सन १९९८ मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. आज सुमारे ४९२.४६ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ५७१.८३ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे १०६४.२९ चौरस किलोमीटर भागात पसरलेला हा व्याघ्रप्रकल्प वन्यजीवनसंवर्धनाच्या बाबतीत अनन्यसाधारण महत्त्व टिकवून आहे.

हा व्याघ्रप्रकल्प असला तरी हे जंगल हत्तींसाठीही प्रसिद्ध आहे. सुमारे एक हजार ८७५ मीटर उंचीचं हेब्बेगिरी हे या जंगलातील सर्वात उंच शिखर. डोंगररांगांचा शेजार लाभल्यामुळे या जंगलात काही भागात ‘शोला वन’ही आढळतं. एके काळी दक्षिण भारतात मोठ्या संख्येनं असणाऱ्या डोंगर-दऱ्यांत अडकलेल्या या सदाहरित वर्षावनांचा प्रकार आज अगदी कमी प्रमाणात टिकून राहिला आहे. भद्रा व्याघ्रप्रकल्पाचा हा भाग त्यापैकीच एक. 

‘पाणी’ हा या पृथ्वीतलावर आढळणारी सर्वात मौल्यवान घटक. पाणी धरून ठेवण्याची आणि वर्षभर त्या पाण्याचं व्यवस्थापन करण्याची अद्भुत क्षमता असणारी ही ‘शोला वने’ हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. या ‘शोला वनां’मुळे पश्चिम घाट अधिक समृद्ध झाला आहे. मिश्र वनप्रकारांमुळे भद्रा व्याघ्रप्रकल्प अनेक प्रजातींच्या जिवांचं आश्रयस्थान झाला आहे. भद्रा नदीच्या सुमारे २००० चौरस किलोमीटर जलसंधारणाच्या क्षेत्रफळापैकी एक चतुर्थांश क्षेत्र भद्रा व्याघ्रप्रकल्पाचं आहे. कर्नाटकातील लाखो लोकांची तहान व शेती या परिसरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे आणि इथल्या जैवविविधतेमुळे भद्रा व्याघ्रप्रकल्प ‘बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट’मध्ये गणला जातो.

व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्यानंतर त्या जंगलात असणाऱ्या वाघांना आणि इतर जिवांना कोणत्याही अडथळ्याशिवाय संचार करता यावा यासाठी जंगलात असणाऱ्या गावांचं पुनर्वसन जंगलाबाहेर होणं अत्यावश्यक असतं. भद्रा व्याघ्रप्रकल्पातही वनविभागाचे आणि काही संस्थांचे अथक् प्रयत्न यांमुळे सन २००१ मध्ये जंगलाच्या आत रहिवासाला असणाऱ्या लोकांचं पुनर्वसन सुरू झालं. जंगलाच्या आत राहणाऱ्या सर्व गावांचं जंगलाबाहेर यशस्वीरीत्या पुनर्वसन झालेला भद्रा हा भारतातील पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. मात्र, असं असलं तरी आज या व्याघ्रप्रकल्पाला काही धोके भेडसावत आहेत. 

जंगलाला लागून असणाऱ्या गावांमध्ये वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून जंगलभागावर होणारं अतिक्रमण हा व्याघ्रप्रकल्पासमोरचा मोठा धोका आहे. या लोकांकडे असणारी हजारो गुरं चरण्यासाठी जंगलभागात सोडली जात आहेत. लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलावर अवलंबून आहेत. निरनिराळ्या कारणांसाठी जंगलातील अमूल्य अशा लाकडाची तोड होत आहे. अवैध मासेमारी आणि अवैध शिकार हाही या जंगलासमोरचा आणखी एक मोठा धोका. यातून सुरू झाला आहे. मानव-वन्यप्राणी संघर्ष. याची किंमत निसर्गाला, पर्यायानं वन्यजीवांना चुकवावी लागत आहे.

अलौकिक निसर्गसौंदर्यामुळे या जंगलात फिरताना वेगळीच मजा येते. मार्च ते मे या कालावधीत जंगल बंद असतं. जून ते सप्टेंबर या कालावधीत भरपूर पाऊस पडतो. या कालावधीतही इच्छुकांना जंगलात जाता येऊ शकतं; पण तुफान पाऊस आणि ठिकठिकाणी शरीराला चिकटणाऱ्या जळवा याची सवय मात्र करून घ्यावी लागते. एकदा का आपण सरावलो की भद्रामधली अप्रतिम विविधता अनुभवता येते. या अशा जंगलाचं संवर्धन करण्याची, निसर्गाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. माणूस निसर्गाच्या आधारानं पुढं गेला तरच आपल्याला अपेक्षित असणारी शाश्वत प्रगती आपण साधू शकू. निसर्गाचा आनंद घेण्यासारखं दुसरं सुख नाही हे मी स्वानुभवानं सांगतो. 

कसे जाल? : पुणे-मंगळुरू-भद्रा /पुणे-बंगळुरु-भद्रा.
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मार्च.

काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी :
सुमारे ४० प्रजाती : वाघ, बिबट्या, गवे, रानकुत्रे, सांबर, चितळ, कोल्हा, भेकर, पिसोरी, लाजवंती (स्लेंडर लॉरिस), रानमांजर, लेपर्ड कॅट, अस्वल, हत्ती, मलबार शेकरू. (दुर्मिळ काळ्या बिबट्याचा वावरही इथं नोंदवला गेला आहे.)

पक्षी : सुमारे २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी Grey Junglefowl, Red Spurfowl, Painted Bush Quail, Emerald Dove, Southern Green Imperial Pigeon, Great Black Woodpecker, Malabar Parakeet, Hill Myna, Ruby-throated Bulbul, Shama, Malabar Trogon, Malabar Whistling Thrush, Malabar Pied Hornbill, Racket-tailed Drongo.

सरपटणारे प्राणी : King Cobra, Common Cobra, Russell''s Viper, Bamboo Pit Viper, Rat Snake, Keelback, Common Wolf Snake, Common Indian Monitor, Draco or Gliding Lizards.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com